बारावी परीक्षेच्या पाठोपाठ दहावीच्या परीक्षेतही कोकणातील विद्यार्थ्यांनी उत्तीर्णतेचे प्रमाण ९६.५४ टक्के राखत अव्वल स्थान पटकावले आहे. सिंधुदुर्ग व रत्नागिरी या दोन जिल्ह्य़ांचा समावेश असलेल्या कोकण विभागीय मंडळातर्फे दहावीचा निकाल सोमवारी जाहीर करण्यात आला. त्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील ९६.९४ टक्के, तर रत्नागिरी जिल्ह्य़ाचा निकाल ९६.३४ टक्के लागला आहे. याही परीक्षेत मुलींनीच बाजी मारल्याचे निकालावरून स्पष्ट होत आहे. कोकण विभागीय मंडळातून परीक्षेला बसलेल्या ३९ हजार ७८७ विद्यार्थ्यांपैकी ३८ हजार ४०९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यात सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील १२ हजार ९५० पैकी १२ हजार ५५४, तर रत्नागिरी जिल्ह्य़ातील २६ हजार ८३७ पैकी २५ हजार ८५५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. रत्नागिरी जिल्ह्य़ातून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांपैकी सुमारे ६ हजार विद्यार्थ्यांनी विशेष श्रेणी, तर ९ हजार विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी मिळवली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात या दोन श्रेणींमधून प्रत्येकी सुमारे ४ हजार विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तसेच या दोन जिल्ह्य़ांमधील मिळून २७२ शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे.
रायगडचा दहावीचा निकाल ९३.५० टक्के
 महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च २०१५ मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत रायगडचा निकाल ९३.५० टक्के इतका लागला. गतवर्षीच्या तुलनेत यंदा रायगडचा निकाल वाढला आहे.
गतवर्षीचा निकाल ८९.७९ टक्के इतका होता. यावर्षीदेखील उत्तीर्ण होण्यात मुलींनी मुलांना मागे टाकले आहे.
यावर्षी रायगड जिल्ह्य़ातील ३८ हजार २२७ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी अर्ज भरले होते. ३८ हजार १५४ विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेला बसले, त्यापकी ३५ हजार ६७४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे शेकडा प्रमाण ९३.५० इतके आहे. यावर्षी १८ हजार १६७ मुले, तर १७ हजार ५०७ मुली उत्तीर्ण झाल्या. उत्तीर्ण मुलांची टक्केवारी ९२.४८, तर मुलींची टक्केवारी ९४.५९. इतकी आहे.
७ हजार ११० विद्यार्थी विशेष श्रेणीत, १२ हजार ४४८ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, १२ हजार ५७१ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत, तर ३ हजार ५४४ विद्यार्थी तृतीय श्रेणीत उत्तीर्ण झाले. यावर्षीही रायगडचा निकाल भरघोस लागला असला तरी ११वी प्रवेशाची कोणतीही अडचण नाही. जिल्ह्य़ातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये ११वीच्या पुरेशा जागा उपलब्ध असून केवळ पनवेल तालुक्यासाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचा अवलंब करण्यात आला आहे, असे रायगड जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.
तालुकावार निकाल :  पनवेल-  ९४.५२, उरण –  ९४.७१, कर्जत – ९१.५०, खालापूर –    ९०.२६, सुधागड -८९.४०, पेण – ९५.१७, अलिबाग-९३.८०, मुरुड- ९६.५४, रोहा- ९३.५०, माणगाव-९४.९४, तळा  –     ९२.६३, श्रीवर्धन -९०.५५, म्हसळा -८९.८८, महाड – ९३.१५, पोलादपूर -९५.८८, एकूण  – ९३.५०