सेंद्रिय काजू बोंडापासून पेप्सी कंपनी उत्पादन बनविण्याच्या विचारात आहे. या कंपनीने रत्नागिरी जिल्ह्य़ासोबतच सिंधुदुर्ग जिल्ह्य़ाचाही विचार करावा असा आपला प्रयत्न आहे, असे राज्यमंत्री तथा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले. तर कोकणचे पाणी पळविणाऱ्यांचे विचार उधळून लावत लहरी निसर्ग व पर्यावरण यांचा धोका कसा परतवून लावता येईल याचे पुढील दहा वर्षे डोळ्यासमोर ठेवून संशोधन कृषी विभागाने करावे, असे आवाहन आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी केले.
काजू व कोको विकास निदेशालय व कृषी-पणन विभागाच्या हॉर्टकिल्चर फेअर, फील्डडे, सेंद्रिय महोत्सव व सेंद्रिय काजू उत्पादन प्रशिक्षण कार्यशाळेत ते बोलत होते.
डी. के. टुरिझममधील या कार्यशाळेचे उद्घाटन पालकमंत्री दीपक केसरकर व डॉ. दीपक सावंत यांच्या हस्ते झाले. यावेळी आमदार वैभव नाईक, सेंद्रिय शेती धोरण अध्यक्ष डॉ. शंकर राऊत, कृषी विभागीय सहसंचालक एस. एल. जाधव, सभापती प्रमोद सावंत, वेंगुर्ले सभापती सुचिता वजराटकर, प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार, प्रकाश परब, कृषी उपविभागीय अधिकारी आर. जी. पाठक, कृषी भूषण एम. के. गावडे, शास्त्रज्ञ गजभिये, प्रशांत नायकवाडी, अमोल गुलगंध व जिल्हा ग्रामोद्योग संस्थाध्यक्ष बाजीराव झेंडे उपस्थित होते.
यावेळी सुरुवातीला कृषी उपविभागीय अधिकारी आर. जी. पाठक यांनी सेंद्रिय काजू निर्माण क्षेत्र चार तालुक्यांत पाच हजार हेक्टर असल्याचे सांगत काजूबाबत सविस्तर माहिती कथन केली.
यावेळी बोलताना राज्यमंत्री दीपक केसरकर म्हणाले, सेंद्रिय शेतीला प्राधान्य द्या, असे आवाहन करून जिल्ह्य़ात पर्यटन, उद्योग, पर्यावरण दक्षता, बंदरे, मच्छिमारी बंदरे, फळ प्रक्रिया उद्योग अशा प्रत्येकाला प्राधान्य देताना सेंद्रिय शेती व प्रोजेक्टला मोठे स्थान देण्याचा विचार स्पष्ट केला. दर्जेदार सेंद्रिय हापूस आंबा देश-विदेशात पोहचला पाहिजे. यासाठी आंबा, काजूवर कल्स्टर बनविण्याचा विचार व्यक्त केला.
सेंद्रिय काजू बोंडूचा रस पेप्सी कंपनी घेऊन सेंद्रिय काजू बोंडू उत्पादन निर्माण करणार आहे. रत्नागिरीसोबतच सिंधुदुर्गचा समावेश व्हावा म्हणून प्रयत्न आहे. काजू बोंडूला त्यामुळे चांगला भाव मिळेल असे राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी सांगून जिल्ह्य़ातील शेतकरी सुखी-समृद्धी व्हावा म्हणून शेतकऱ्यांच्या जमिनीत योजना पोहचायला हव्यात, तसेच मार्केटिंगची व्यवस्था व्हायला हवी म्हणून वखार महामंडळामार्फत सिंधुदुर्गात गोदाम निर्माण व्हावं म्हणून प्रयत्न आहे. काजू प्रक्रियेला आर्थिक मदत दिली पाहिजे तसेच काजूच्या झाडाला पाणी घातल्यास उत्पादन वाढत असते, त्यासाठी शेततळीसारखे प्रकल्प आणायला हवेत, असे. ना. दीपक केसरकर म्हणाले.
हवामानात होणारे बदल, अवेळी कोसळणारा पाऊस अशा लहरी निसर्ग ऋतुचक्रातून आंबा, काजूचे संरक्षण कसे होणार त्याचा पुढील दहा वर्षे गृहीत धरून कृषी विभागाने संशोधन करायला हवे, तसेच जमिनीची धूप, खालावलेली प्रत त्याचा अभ्यासही झाला तरच शेतकरी बचावेल, असे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत म्हणाले.
आंबा, काजू प्रक्रिया उद्योग निर्माण झाल्यावर लहरी हवामानाचा फटका बसून उद्योग अडचणीत आल्यास शेतकऱ्यांसमोरील पर्यायही शोधले जाण्याची गरज डॉ. सावंत यांनी व्यक्त करून पुढील दहा वर्षांचे पर्यावरणीय बदलाच्या दृष्टचक्रातून शेतकऱ्याला वाचविण्यासाठी अभ्यास व्हावा, असे डॉ. सावंत म्हणाले.
महाराष्ट्रात बळीराजा संकटात आहे. त्याच्या बचावासाठी प्रयत्न करतानाच पर्यायही शोधावे लागतील असे डॉ. दीपक सावंत म्हणाले. कोकणचे पाणी पळविणाऱ्यांचा प्रयत्न हाणून पाडला पाहिजे. हे पाणी कोकणचा आत्मा आहे ते वाया जाऊ देता कामा नये.भूस्तरीय पाणी पातळी वाढली पाहिजे, असे डॉ. दीपक सावंत म्हणाले.