नवनिर्मित कुडाळ नगर पंचायत निवडणुकीची आजपासून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. यासाठी १७ एप्रिलला मतदानाची तारीख निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे शिमगोत्सवातच राजकीय शिमगा सुरू होणार आहे.
कुडाळ ग्रामपंचायतीचे नगर पंचायतीत रूपांतर करण्यात आले होते. राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक वेळापत्रक घोषित करून आचारसंहिता जारी केली आहे. या ठिकाणी शिवसेना, भाजप, काँग्रेस- राष्ट्रवादी व मनसे उमेदवार उभे करणार आहे.
कुडाळ नगर पंचायतीसाठी २२ मार्चपर्यंत नामनिर्देशितपत्र स्वीकारण्यात येणार आहेत. नामनिर्देशित छाननी २३ मार्च तर नामनिर्देशनपत्र अपील नसेल तेथे ४ एप्रिलपर्यंत मागे घेण्याची अंतिम तारीख आहे. मतदान १७ एप्रिल तर मतमोजणी १८ एप्रिल रोजी होणार आहे.
कुडाळ नगर पंचायत निवडणुकीत राजकीय रंग निर्माण झाला असतानाच डंपर व्यावसायिक राजकारणाने उसळी घेतली. त्यामुळे डंपर आंदोलनाचे पडसाद आरोप-प्रत्यारोपाने येथे दिसतील. या निवडणुकीदरम्यान शिमगोत्सव येत असल्याने निवडणुकीत राजकीय शिमगा मात्र घडणार आहे.
कुडाळ नगर पंचायत जिंकण्यासाठी काँग्रेसचे नेते माजी मुख्यमंत्री नारायण राणे, शिवसेनेचे खासदार विनायक राऊत, पालकमंत्री दीपक केसरकर, शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार वैभव नाईक आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार, प्रदेश चिटणीस राजन तेली, माजी जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर व मनसेचे प्रदेश सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी रणनीती तयार ठेवली आहे.
कुडाळ नगर पंचायतीसाठी शिवसेना-भाजप युती आणि काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडी होईल, अशी शक्यता आहे. शिवसेना व भाजपला स्वबळाची खुमखुमी असल्याने ते स्वबळावर लढले तर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला स्पष्ट बहुमतासाठी मोठी कसरत करावी लागणार नाही, असे बोलले जात आहे.