आज माझ्या छकुलीला न्याय मिळाला, अशी भावना कोपर्डी प्रकरणातील निर्भयाच्या आईने व्यक्त केली. यावेळी त्यांनी तपास अधिकारी, न्यायाधीश, मुख्यमंत्री आणि समाजाचे आभार मानले. ‘शाळेतील लहान लहान मुलांनी त्यांच्या ताईसाठी मोर्चे काढले. आज त्या मुलांच्या ताईला न्याय मिळाला,’ या भावना व्यक्त करताना त्यांना अश्रू अनावर झाले. यापुढे असा अत्याचार कोणावरही होऊ नये, असेही त्या म्हणाल्या.

‘पोलिसांनी अतिशय मनापासून या घटनेचा तपास केला. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी अतिशय व्यवस्थितपणे आमची बाजू न्यायालयासमोर मांडली. त्यामुळे त्यांचे खूप खूप धन्यवाद. न्यायालय आणि न्यायाधीश यांच्यावर आमचा विश्वास होता. तो विश्वास आज सार्थ ठरला. त्यामुळे न्यायाधीशांचेही आभार,’ अशा शब्दांमध्ये कोपर्डी प्रकरणातील निर्भयाच्या आईने तिच्या भावना व्यक्त केल्या.

यावेळी पीडित मुलीच्या आईने मराठा समाज, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भैय्यू महाराज यांचेही आभार मानले. ‘मुख्यमंत्र्यांनी दुर्घटनेनंतर आमची भेट घेऊन सांत्वन केले होते. तुमच्या मुलीला न्याय मिळवून देऊ, असा शब्द त्यांनी दिला होता. यासोबतच मराठा समाजदेखील माझ्या मुलीसाठी रस्त्यावर उतरला. माझ्या मुलीला न्याय मिळवून देण्यात त्यांनीही मोठी भूमिका बजावली,’ अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. यावेळी त्यांनी मोर्चे काढणाऱ्या चिमुरड्यांचेही आभार मानले. ‘शाळेत जाणाऱ्या लहान लहान मुलांनी त्यांच्या ताईसाठी मोर्चे काढले. त्यांच्या ताईला आज न्याय मिळाला. त्यांनी त्यांच्या ताईला न्याय मिळवून दिला,’ असे म्हणताना कोपर्डी प्रकरणातील निर्भयाच्या आईच्या रडू कोसळले.

संपूर्ण राज्याला हादरवून सोडणाऱ्या कोपर्डी बलात्कार आणि हत्या प्रकरणातील तिन्ही दोषींना नगरच्या सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. कोपर्डीतील १५ वर्षांच्या मुलीवरील बलात्कार आणि हत्याप्रकरणी जितेंद्र उर्फ पप्पू बाबुलाल शिंदे (२५), संतोष भवाळ (३०) आणि नितीन भैलुमे (२३) या तिघांना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी सरकारी वकिलांनी केली होती. न्यायाधीशांनी अवघ्या काही मिनिटांतच शिक्षेची सुनावणी केली. तिन्ही दोषींना बलात्कार व हत्येचा कट रचल्याप्रकरणी दोषी ठरवत फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.