News Flash

कोपर्डी अत्याचार खटला : गुन्हय़ातून वगळण्याचा आरोपीचा अर्ज फेटाळला

दोषारोप निश्चिती दिवाळीनंतरच? पुढील सुनावणी दि. २७ ला

दोषारोप निश्चिती दिवाळीनंतरच? पुढील सुनावणी दि. २७ ला

कोपर्डीत (ता. कर्जत, जिल्हा नगर) अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिचा निर्घृण खून केल्याच्या प्रकरणातील आरोपी नितीन गोपीनाथ भैलुमे याचा आपल्यावरील आरोप  वगळण्यासाठी केलेला अर्ज गुरुवारी न्यायालयाने फेटाळला. दरम्यान, न्यायालयाच्या या निर्णयावर दि. २७ ऑक्टोबपर्यंत उच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे पुढील सुनावणी दि. २७ रोजी होईल. त्याच दिवशी भैलुमे याने दाखल केलेल्या जामीन अर्जावरही सरकारी वकिलांना म्हणणे सादर करण्यासाठी मुदत दिली .

दरम्यान, न्यायालयाला दि. २८ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर दरम्यान दिवाळीची सुट्टी असल्याने कोपर्डीच्या खटल्याची दोषारोप निश्चितीवर ७ नोव्हेंबरला सुनावणी होण्याची शक्यता आहे. गुन्हय़ातून वगळण्याच्या निर्णयावर उच्च न्यायालयात प्रकरण दाखल केले की नाही, याबद्दलचा निर्णय दि. २७ पर्यंत कळवावा, असेही न्यायालयाने आरोपी भैलुमेचे वकील प्रकाश आहिरे यांना निर्देश दिले.

कोपर्डी खटल्याचे प्राथमिक कामकाज सध्या जिल्हा सत्र न्यायाधीश सुवर्णा केवले यांच्या पुढे सुरू आहे. भैलुमे याने दोषमुक्त करावे, यासाठी दोन दिवसांपूर्वीच अर्ज केला आहे. नितीन भैलुमे विज्ञान विषयाचा पदवीधारक आहे, तो पुण्यातच राहतो. त्याचे एमपीएससी करून अधिकारी होण्याचे स्वप्न होते. केवळ कागदपत्रे व दाखला मिळवण्यासाठी तो गावी, कोपर्डीत आला होता. त्याचा गुन्हय़ाशी संबंध नसताना केवळ राजकीय दबावातून त्याला गोवण्यात आले. पोलिसांनी सुरुवातीला त्याच्याकडे चौकशी केली होती, नंतर सोडूनही दिले होते. फॉरेन्सिक प्रयोगशाळा व पोलिसांच्या अहवालातही त्याचा कोठे उल्लेख नाही. मुलीच्या शरीरावरील चावेही आरोपी जितेंद्र शिंदे याचेच असल्याचे निष्पन्न झाले आहे. जे साक्षीदार सांगत आहेत, ते मुलीचे नातेवाईकच आहेत, शाळेतील मैत्रीणही नातेवाईकच आहे. त्यामुळे ते विश्वासार्ह नाहीत. छेडछाडीची माहिती मैत्रिणीने शाळेतील शिक्षकांना सांगितली नाही की त्याची पोलिसांकडे तक्रारही केली नाही, छेडछाडीची घटना म्हणजे पोलिसांची ‘स्टोरी’ आहे, असा युक्तीवाद वकील आहिरे यांनी केला. त्यावर विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांना म्हणणे सादर करण्यासाठी अर्धा तास वेळ देण्यात आला. नंतर निकम यांनी युक्तिवाद करताना सांगितले, की घटनेपूर्वी चार ते पाच दिवस आधी जितेंद्र शिंदे याने मुलीची छेडछाड केली. त्या वेळी नितीन भैलुमे व संतोष भवाळ त्याच्या समवेतच होते. दोघेही त्या वेळी हसत होते. ‘आपण हिला नंतर कामच दाखवू’ असेही उद्देशपूर्ण नितीन बोलला. त्यामुळे मुलगी दोन दिवस भीतीने शाळेतच आली नाही, याची नोंद शाळेत आहे. त्यानंतरही तिघांनी तिच्या वस्तीच्या रस्त्यावर टेहाळणी केली, हे पाहणारे साक्षीदार आहेत.

दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर भैलुमे याचा गुन्हय़ातून वगळण्याचा अर्ज फेटाळण्यात आला. त्याला उच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी दि. २७ पर्यंत मुदत देण्यात आली. त्याच दिवशी सरकारी पक्षाला जामीन अर्जावर म्हणणे सादर करण्यासाठी मुदत दिली.

तेढ निर्माण करू नका

आरोपी भैलुमे याचे वकील आहिरे यांनी युक्तिवाद करताना, भैलुमे गरीब आहे. मागासवर्गीय आहे. तो केवळ जितेंद्र शिंदे याचा नातेवाईक आहे, हाच त्याचा दोष ठरला आहे. पोलिसांनी त्याला चौकशी करून सोडले होते. परंतु बाहेर समाजात जे वातावरण निर्माण झाले आहे, प्रकरणाला वेगळे वळण देण्यासाठी त्याला गोवले गेले, याकडे लक्ष वेधले. त्यावर बाहेरचे काही बोलू नका, खटल्यापुरते बोला, असे सांगत न्यायालयाने त्यांना रोखले. विशेष सरकारी वकील निकम यांनीही, खटला संवेदनशील आहे, बोलताना भान ठेवा. आरोपींच्या वकिलांनी भावनिक न होता सत्य मांडावे, तेढ निर्माण होईल, असे वक्तव्य करू नये. गुन्हेगाराला जात, पंथ नसतो, हे लक्षात ठेवावे, अशी भूमिका मांडली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 21, 2016 1:24 am

Web Title: kopardi rape case hearing 27 october
Next Stories
1 जनावरांनाही मिळणार राष्ट्रीय ओळख!
2 नगररचना विभागाकडून सावंतवाडी शहराचा चुकीचा आराखडा
3 जाग आलेले ग्रामविकास मंत्रालय बचतगटांचा अर्थपुरवठा वाढविणार
Just Now!
X