कोपर्डी येथे अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिची निर्घृणपणे हत्या केल्याप्रकरणी शनिवारी अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालयाने जितेंद्र शिंदे, संतोष भवाळ आणि नितीन भैलुमे या तिघांना दोषी ठरवले. गेल्या आठवड्यात या खटल्याचा अंतिम युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर आज न्यायालय काय निकाल देणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते.

सकाळी सव्वा अकराच्या सुमारास न्यायालयीन कामकाजाला सुरूवात झाली. त्यानंतर काही वेळातच न्यायाधीश सुवर्णा केवले यांनी खटल्याचा निकाल दिला. त्यानुसार जितेंद्र शिंदे, संतोष भवाळ आणि नितीन भैलुमे या तिनही आरोपींना दोषी ठरवण्यात आले. कट रचून मुलीवर अत्याचार करणे, हत्या करणे, बालकांच्या लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार त्यांना दोषी ठरवण्यात आले आहे. येत्या २१ आणि २२ तारखेला या खटल्याची पुढील सुनावणी होईल. दोषींच्या शिक्षेवर युक्तिवाद केला जाणार असून त्यांना शिक्षा काय होणार याचा निकाल २२ नोव्हेंबरला दिला जाणार आहे.

अहमदनगरमधील कर्जत तालुक्यातील कोपर्डी गावात १३ जुलै २०१६ रोजी नराधमांनी अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन तिची निर्घृण हत्या केली होती. याप्रकरणी जितेंद्र शिंदे, संतोष भवाळ आणि नितीन भैलुमे या तिघांना अटक करण्यात आली होती. या घटनेमुळे राज्यभरात मोठी खळबळ उडाली होती. राज्यभरात काढण्यात आलेल्या मराठा मूक क्रांती मोर्चाच्यावेळी कोपर्डी प्रकरणातील दोषींना फाशी देण्यात यावी, अशी प्रमुख मागणी लावून धरण्यात आली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही कोपर्डी बलात्कार प्रकरणातील आरोपींना फाशीपर्यंत पोहोचवू, असे आश्वासन दिले होते. त्यामुळे २१ तारखेला न्यायालय आरोपींना फाशी किंवा जन्मठेप यापैकी नक्की कोणती शिक्षा सुनावणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

जिल्हा व सत्र न्यायाधीश सुवर्णा केवले यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी सुरू होती. गेल्या गुरुवारीच या खटल्याचे अंतिम युक्तिवादाचे कामकाज पूर्ण झाले. या खटल्याचा निकाल जलदगतीने लागावा यासाठी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी सलग तीन दिवस अंतिम युक्तिवाद केला होता. जिल्हा सत्र न्यायालयात शनिवारी आणि रविवारी सुट्टी असूनही खटल्याचे कामकाज झाले. तीन दिवसीय युक्तिवादात निकम यांनी मुख्य आरोपी जितेंद्र शिंदे, संतोष भवाळ आणि नितीन भैलूमेने कटकारस्थान करुन अत्याचार आणि हत्या केल्याचा युक्तिवाद केला. या खटल्यात सरकारी पक्षाकडून ३१ साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली आहे. यात मृत मुलीची मैत्रिण, आई, बहिण, चुलत आजी, आजोबा, दंतवैद्यकीय डॉक्टर, दोन तपासी अधिकारी, पंच साक्षीदार असे महत्वाचे साक्षीदार आहेत. तर आरोपी संतोष भवाळच्या वतीने उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार एक बचावाचा साक्षीदार तपासण्यात आला आहे. तसेच न्यायालयात २४ परिस्थितीजन्य पुरावेही सादर करण्यात आले. अंतिम युक्तिवादाचे ऑडिओ रेकॉर्डिंगही करण्यात आले आहे.