News Flash

कोपर्डी बलात्कार व हत्याप्रकरण: दोषींच्या शिक्षेचा फैसला २९ नोव्हेंबरला

कमी शिक्षेसाठी दोषींची याचना

कोपर्डीत राहणाऱ्या १५ वर्षांच्या मुलीची १३ जुलै २०१६ रोजी जितेंद्र शिंदे, संतोष आणि नितीन या तिघांनी बलात्कारानंतर हत्या केल्याची घटना घडली होती.

कोपर्डीतील १५ वर्षांच्या मुलीवरील बलात्कार आणि हत्याप्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयात दोषींच्या शिक्षेबाबत युक्तीवाद संपला आहे. जितेंद्र उर्फ पप्पू बाबुलाल शिंदे (२५), संतोष भवाळ (३०) आणि नितीन भैलुमे (२३) या तिघांना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी सरकारी वकिलांनी केली आहे. शिक्षेबाबत न्यायालय २९ नोव्हेंबरला निकाल देणार आहे.

कोपर्डीत राहणाऱ्या १५ वर्षांच्या मुलीची १३ जुलै २०१६ रोजी जितेंद्र शिंदे, संतोष आणि नितीन या तिघांनी बलात्कारानंतर हत्या केल्याची घटना घडली होती. या घटनेचे पडसाद राज्यभरात उमटले होते. नराधमांना फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी मराठा समाजाच्या वतीने राज्यभरात मोर्चे काढण्यात आले होते. शनिवारी विशेष जिल्हा सत्र न्यायालयाच्या न्या. सुवर्णा केवले यांनी तिघाही आरोपींना दोषी ठरवले होते. या तिघांच्या शिक्षेबाबत मंगळवारपासून सुनावणीला सुरुवात झाली.

बुधवारी भैलुमेचे वकील तसेच विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम युक्तिवाद केला. सुमारे सव्वातास युक्तिवाद सुरु होता. दोषींना मृत्युदंडाची शिक्षा व्हावी यासाठी निकम यांनी १३ कारणे दिली. जितेंद्रने पीडितेवर बलात्कार केला आणि तिची हत्या केली. बलात्कारानंतर जितेंद्रने त्याच्या साथीदारांना मिस कॉल दिला होता. घटना घडली तेव्हा हे दोघेही जवळच दबा धरुन बसले होते. संतोष भवाळ आणि नितीन भैलुमे हे पडद्यामागचे सूत्रधार आहेत. त्यांना फाशीची शिक्षा द्यावी, असे निकम यांनी न्यायालयात सांगितले. इंदिरा गांधींची हत्या आणि संसदेवरील हल्ला या प्रकरणांमध्ये सूत्रधारांना फाशीची शिक्षा झाली होती, याकडेही निकम यांनी लक्ष वेधले. बचावपक्ष आणि सरकारी वकिलांचा युक्तिवाद संपल्यानंतर न्यायालयाने २९ नोव्हेंबर रोजी पुढील सुनावणी होणार असे सांगितले. याच दिवशी न्यायालय शिक्षेबाबत निकाल देण्याची शक्यता आहे.

बचावपक्षाने केलेला युक्तिवाद

मंगळवारी शिंदे याच्यावतीने वकील योहान मकासरे व भैलुमेच्यावतीने वकील प्रकाश आहेर यांनी युक्तिवाद करताना कमीत कमी शिक्षा देण्याची विनंती केली होती. आरोपी निर्दोष आहेत, खटल्यात प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नाही, १२० ब (कट कारस्थान रचणे) व १०९ (गुन्ह्य़ाला प्रोत्साहन देणे) हे कलम लागूच होत नाही. भैलुमे हा सराईत गुन्हेगार नाही, पूर्वी त्याच्यावर गुन्हेही दाखल नाहीत. तो बीएससीचे शिक्षण घेत आहे. तो दलित आहे. कुटुंबाचा आधार आहे. त्याची आई आजारी असते. तिच्यावर नुकतीच शस्त्रक्रिया झाली आहे. वडील मजुरी करतात. त्यामुळे कमीत कमी शिक्षा करावी, असा युक्तीवाद आरोपीचे वकील आहेर यांनी केला. शिंदे याच्या वतीने युक्तिवाद करताना वकील मकासरे यांनी, ही घटना दुर्मिळात दुर्मिळ नाही, आरोपी तरुण आहे, गुन्हेगार नाही. त्याला पत्नी आहे, असे सांगत फाशीऐवजी जन्मठेपेची शिक्षा देण्याची विनंती केली होती.

या कलमांखाली ठरवले होते दोषी
न्यायालयाने आरोपींना भारतीय दंड विधानातील कलम ३०२ (हत्या), ३७६- २ ब (बलात्कार करुन जखमी करणे), १२० ब (फौजदारी स्वरुपाचा कट रचणे), १०९ (गुन्ह्याला प्रोत्साहन देणे), ३५४ (छेड काढणे), बालंकाचे लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायदा कलम ६, ८, १६ अन्वये दोषी ठरवण्यात आले आहे. या कलमांखाली दोषींना जन्मठेप किंवा फाशीची शिक्षा दिली जाऊ शकते.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 22, 2017 10:31 am

Web Title: kopardi rape murder case live updates ahmednagar court punishment death penalty life imprisonment ujjwal nikam
Next Stories
1 शरद पवार, सुप्रिया सुळेंबद्दल आक्षेपार्ह ट्विट करणाऱ्या तरुणाला नागपूरमधून अटक
2 नर्मदा परिक्रमा यात्रा ही आत्मचिंतनाची उत्तम संधी!
3 सोयीच्या राजकारणामुळे महावितरणपुढे पेच!
Just Now!
X