भीमा कोरेगाव येथील हिंसाचारात समाजकंटकांनी घर जाळल्यामुळे बेघर झालेल्या सुरेश सकट यांच्या कुटुंबावर रविवारी दुःखाचा डोंगरच कोसळला. शनिवारपासून बेपत्ता असलेल्या पूजा सकट या १९ वर्षांच्या तरुणीचा मृतदेह परिसरातील विहिरीत सापडला. तिचा मृत्यू कसा झाला, याचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

भीमा कोरेगाव येथे १ जानेवारी रोजी हिंसाचार झाला होता. या हिंसाचारात १३० वाहनं जाळण्यात आली होती. तर ३० घरांमध्ये समाजकंटकांनी जाळपोळ केली होती. या हिंसाचारात सुरेश सकट यांचे घरही जाळण्यात आले आणि त्यामुळे त्यांचे हक्काचे घरही हिरावले होते. सध्या सकट कुटुंबीय शिक्रापूर येथील पुनर्वसन केंद्रात राहत आहेत. सुरेश सकट यांची १९ वर्षांची मुलगी पूजा ही शनिवारपासून बेपत्ता होती. रविवारी दुपारी तिचा मृतदेह परिसरातील विहिरीत सापडला. तिने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. शवविच्छेदनानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले.

तर सकट कुटुंबीयांनी पूजाने आत्महत्या केली नसून ही हत्याच आहे, असा आरोप केला. जागेच्या वादातून आम्हाला धमक्या येत होत्या. माझ्या घराशेजारचा भूखंडा एकाने खरेदी केला होता. या वादातूनच आम्हाला धमक्या येत होत्या. २ जानेवारीला आमचे घरही याच लोकांनी जाळले होते. आता माझ्या मुलीची त्यांनी हत्या केली, असा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.