पुण्यात एल्गार परिषदेचे आयोजन करुन हिंसाचारास चिथावणी दिल्याच्या आरोपावरुन अटक झालेल्या प्रा. शोमा सेन यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने धक्का दिला आहे. विद्यापीठाने सेन यांना निलंबित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या विद्यापीठातील इंग्रजी विभागाच्या प्रमुख म्हणून कार्यरत होत्या.

भीमा- कोरेगाव येथे पाच महिन्यांपूर्वी झालेल्या हिंसाचारप्रकरणी पोलिसांचा तपास सुरु आहे. भीमा-कोरेगाव हिंसाचारापूर्वी पुण्यात एल्गार परिषदेचे आयोजन करून हिंसाचारास चिथावणी दिल्याच्या आरोपावरून रिपब्लिकन पँथर्सचे सुधीर ढवळे यांच्यासह अ‍ॅड. सुरेंद्र गडलिंग, महेश राऊत आणि शोमा सेन यांना ६ जून रोजी अटक करण्यात आली होती.

दोन महिन्यांपूर्वी या सर्वांच्या घरावर पोलिसांनी छापे टाकले होते. तेथून काही पुस्तके आणि भित्तिपत्रके जप्त करण्यात आली होती. या दस्तावेजातून अॅड. गडलिंग, महेश राऊत आणि शोमा सेन यांचे माओवाद्यांशी संबं असल्याचे उघड झाले होते.६ जून रोजी अटक करताना पोलिसांनी शोमा सेन यांच्या घरातून संगणकाची हार्डडिस्क आणि इतर माओवादी साहित्य जप्त केले होते.

शोमा सेन या पूर्वी पासून माओवादी विचारांशी जुळल्या असून त्यांचे पती तुषारकांती भट्टाचार्य हे पूर्वीचे जहाल नक्षलवादी आहेत. शोमा सेन यांच्या अटकेनंतर कुलगुरू डॉ. सिद्धार्थ काणे यांनी कायदेतज्ज्ञांचे मत मागवले होते. या आधारे विद्यापीठाने आता शोमा सेन यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याचा निर्णय घेतला.