कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणी ताजी माहिती समोर आली असून त्यानुसार पुण्यात आयोजित एल्गार परिषदेचे आयोजक आणि दलित लेखक सुधीर ढवळे यांना त्यांच्या मुंबईतील गोवंडी येथील घरातून पुणे पोलिसांकडून पहाटे अटक करण्यात आली. त्याचबरोबर वकिल सुरेंद्र गडलिंग आणि महेश राऊत यांना नागपूरातून तर रोना विल्सन यांना दिल्लीतून अटक करण्यात आली आहे. यापूर्वी पुण्यातील हिंदू एकता आघाडीचे मिलिंद एकबोटे यांच्यावर अटकेची कारवाई झाली आहे. या तिघांचाही या हिंसाचारात हात असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

कोरेगाव भीमा प्रकरणी पुणे पोलिसांकडून तपास सुरु असून दोन महिन्यांपूर्वी पोलिसांनी या तिघांच्याही कार्यालयांवर छापे टाकले होते. त्याचबरोबर पुण्यातील कबीर कला मंचच्या दोन कार्यकर्त्यांची चौकशीही करण्यात आली होती. त्यानंतर आज त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली.

३१ डिसेंबर २०१७ रोजी पुण्यातील शनिवार वाडा येथे एल्गार परिषद झाली होती. या परिषदेत चिथावणीखोर भाषणे आणि गाणी गायली होती. त्यामुळेच १ जानेवारी २०१८ रोजी कोरेगाव भीमा येथे दंगल झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे या परिषदेचे आयोजक सुधीर ढवळे यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. तसेच नागपूर येथील वकिल सुरेंद्र गडलिंग हे नक्षलवाद्यांचे वकिल म्हणून ओळखले जातात. नक्षलवाद्यांचे खटले ते लढवतात, ते देखील या हिंसाचार प्रकरणात पोलिसांच्या रडारवर असून त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर, महेश राऊत हे मुळचे गडचिरोलीचे असून सध्या नागपूरमध्ये राहतात. त्याचे मुंबईतील टाटा इन्स्टिट्युट ऑफ सोशल सायन्सेस (टिस) या नामांकित संस्थेतून शिक्षण झाले आहे. इथून बाहेर पडल्यानंतर ते नक्षलवाद्यांच्या संपर्कात आल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचबरोबर दिल्लीतील नक्षलवादी चळवळीशी संबंधीत असलेल्या प्रा. साईबाबा याची जागा चालवणारा नक्षलवादी समर्थक रोना विल्सन याला देखील पुणे पोलिसांनी दिल्लीतून अटक केली आहे.

दरम्यान, कोरेगाव भीमा हिंसाचारातील आरोपी संभाजी भिडे यांना अद्याप अटक झालेली नाही. मात्र, एल्गार परिषदेचे आयोजक सुधीर ढवळे यांना अटक करण्यात आल्याच्या निषेधार्थ त्यांच्या समर्थकांनी गोवंडीतील देवनार पोलीस स्थानकाबाहेर गर्दी केल्याचे सुत्रांकडून कळते.

दरवर्षीप्रमाणे, १ जानेवारीला पुणे जिल्ह्यातील कोरेगाव भीमा येथे असलेल्या विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर आंबेडकरी समाज येथे दाखल झाला होता. दरम्यान, काही समाजकंटकांनी आंबेडकरी जनतेवर दगडफेक करीत जाळपोळही केली होती. या हिंसाचारात एकाचा मृत्यूही झाला होता. दरम्यान, या हिंसाचारामागे हिंदू एकता आघाडीचे मिलिंद एकबोटे आणि शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेचे संभाजी भिडे या दोघांची चिथावणी असल्याचा आरोप करण्यात आल्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला. याप्रकरणी मिलिंद एकबोटेंना अटक झाली आहे. तर संभाजी भिडेंना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. त्यानंतर एकबोटे आणि भिडे समर्थकांनी या हिंसाचारामागे एल्गार परिषदेचे आयोजकच जबाबदार असल्याचा आरोप केला होता. या परिषदेत चिथावणीखोर भाषणे केल्याचे आरोपकर्त्यांचे म्हणणे आहे.