कोशेसरी ते सोलशेतमधील ग्रामस्थांच्या नशिबी बोटीने प्रवास

नितीन बोंबाडे, डहाणू

पालघर जिल्ह्यातील आदिवासींचे हाल अद्यापही संपलेले नाहीत.  डहाणू तालुक्यातील धामणी नदीच्या किनारी वसलेल्या कोशेसरी गावाला पुराचा मोठा फटका बसत आहे. गावातील मुलांना शाळेत पोहोचण्यासाठी आणि गर्भवतींना दवाखान्यात जाण्यासाठी बोटीचा वापर करावा लागत आहे. यात ग्रामस्थांच्या जिवाचा लोकप्रतिनिधी वा प्रशासनाने केलेला नाही. छोटय़ा होडय़ांमधून जीवघेणा प्रवास करावा लागत आहे.

त्यामुळे ग्रामस्थांमध्ये सरकारबाबत मोठय़ा प्रमाणात नाराजी आहे. पालघरसारख्या विकसित होत जाणाऱ्या जिल्हयाच्या डहाणू तालुक्याच्या कोशेसरी भवाडी या  दुर्गम भागात पाहील्यावर  विकासाची गंगा पोहोचलीच नसल्यामुळे  स्थानिकांतून नाराजी व्यक्त होत आहे. डहाणू तालुक्यातील कोशेसरी भवाडी कासा बुद्रुक सोलशेत बेटावरील गावकरी विद्यार्थी, रुग्ण, गरोदर मातांना  बोटीनेच प्रवास करावा लागत आहे. तालुक्यात अनेक गावे  नद्यांवर पूल बांधून  रस्त्यांनी जोडले आहे. डहाणू तालुक्यात कोशेसरी ते सोलशेत  असा सुमारे १५० मीटरचा प्रवास कवडास ,कासा बुद्रुक,कोशेसरी ग्रामस्थ बोटीनेच  करत आहेत.

सूर्या नदीच्या तीरावर असलेल्या अलिकडे डहाणू तालुक्यातील कोशेसरी भवाडी आणि पलिकडे  विक्रमगड तालुक्यातील सोलशेत  ग्रामस्थांचा बोटीने प्रवास सुरू आहे. कोशेसरी भवाडी  ग्रामपंचायतीची लोकसंख्या तीन हजारांच्या घरात असून येथील ग्रामस्थांना  शिक्षण रोजगार कामासाठी सागरी मार्गाने जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. तर विक्रमगड तालुक्यातील सोलशेत बेटाचीही हीच अवस्था आहे. शाळकरी विद्यार्थी, रोजगार, आरोग्याच्या समस्यांसाठी सूर्या नदी ओलांडण्यासाठी लाकडी होडीचा वापर करत कोशेसरी ते सोलशेत असा १५०  मीटर  अंतर बोटीचे हेलकावे खात पार करावे लागत आहे. त्यामुळे लवकरात लवकर सुर्या नदीवर पुल  बांधावा अशी ग्रामस्थ मागणी करीत आहेत.

धामणी धरणातुन पाण्याचा विसर्ग झालेले पाणी सुर्या नदीतून वाहून नेले जाते. सूर्या नदीमुळे डहाणू आणि विक्रमगड तालुक्याच्या सीमा अधोरेखीत केल्या आहेत.कोशेसरी ग्रामस्थांना सूर्या नदीवर पलिकडे डहाणू नाशिक राज्यमार्गावर जाण्यासाठी बोटीने प्रवास करून  जावे लागते. या नदीच्या वाहतुकीवर  डहाणू तालुक्यातील एकूण महसूल गावे २९ व विक्रमगड तालुक्यातील १७ महसूल गावे जोडली  आहेत. त्यामुळे  दळणवळणासाठी पुला अभावी गैरसौय होत आहे. सायवन , उधवा, दादरा नगर हवेली, दिवशी, दाभाडी, किन्हवली, सायवनहून गांगोडी, शेणसरी मार्गे विक्रमगड हा जवळचा संपर्क पुला अभावी तुटलेला आहे परिणामी  सायवन राज्यमार्गाने  विक्रमगड, वाडा, भिंवडी, जव्हार, मोखाडा, नाशिक, येथे जाण्यासाठी कासा येथून३० कि.मी वळसा घालून अंतर पार करावे लागत आहे. दळणवळणाच्या बाबतीत सदर बाब खुप स्वर्चिक व वेळकाढू ठरणारा आहे.

दोन्ही तालुक्यांना जोडणारा हा महत्वाचा पुल असुन या पुलामुळे दळणवळण वाढुन या भागाचा विकास होऊ शकेल.सध्या स्थितीत पुला अभावी लोकांचे हाल होत आहेत.

-शैलैश करमोडा, उपसभापती डहाणू पंचायत समिती

सूर्या नदीवरील कोशेसरी येथील हा पुल अंदाजे १५० मीटर लांबीचा पुल असुन त्याची मोजमाप घेतले गेले आहे. त्यासाठी अंदाजे सहा कोटींहून  अधिक निधी लागणार असुन  हे काम नाबार्ड मध्ये सुचवले आहे.

-धनंजय जाधव,  उप अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग