जिल्ह्यत बहुतांश गावांमध्ये दुष्काळाचे चित्र जाणवत असले, तरी गंगाखेड तालुक्यातील सुप्पा व कौडगाव या दोन गावांत मात्र वेगळी स्थिती आहे. या दोन्ही गावांमध्ये गेल्या काही वर्षांपासून रिलायन्स फाऊंडेशनद्वारे चालू असलेल्या जलसंधारणाच्या कामांमुळे डोंगराळ भागातील या गावांना अजून तरी टँकरची गरज भासत नाही.
रिलायन्स फाऊंडेशनच्या वतीने सुप्पा खालसा येथे सहा बंधारे बांधण्यात आले. त्याद्वारे नदीचे खोलीकरण करुन नदीपात्र विस्तारण्यात आल्याने या ठिकाणी पाणी अडले. त्यामुळेच संबंधित नदीच्या दोन्ही बाजूंनी विहिरींच्या पाणीपातळीत वाढ झाली. परिणामी या गावांमध्ये दुष्काळाची गडद छाया जाणवत नाही. गंगाखेड तालुक्यातील ३८, तर पालम तालुक्यातील ३४ गावांमध्ये फाऊंडेशनचे उपक्रम सध्या सुरू आहेत.
ग्रामीण भागात शेतकऱ्यांना प्रशिक्षण देऊन शेतीची उत्पादकता वाढावी, तसेच शेतकऱ्यांत उद्योजकता निर्माण व्हावी, असेही प्रयत्न अजंठा सेल्फ रिलायन्ट फार्मर्स प्रोडय़ुसर कंपनी लि. गंगाखेड या शेतकऱ्यांनी स्थापन केलेल्या कंपनीकडून सुरू आहेत. शेतकरी या कंपनीच्या माध्यमातून सामूहिक शेतीक्षेत्रात क्रांतिकारी बदल करीत आहेत. या सर्वाना तज्ज्ञांचे मार्गदर्शन देण्यापासून ते कोणत्याही प्रकल्पाच्या तांत्रिक माहितीची पूर्तता करण्यापर्यंत सर्व कामे फाऊंडेशनच्या वतीने करण्यात येतात.
कौडगाव येथे शेतकऱ्यांनी अशी कंपनी स्थापन केली. शेतीत उत्पादकता वाढविण्यापासून ते बाजारपेठेच्या तंत्रज्ञानापर्यंत सर्व काही या कंपनीद्वारे पाहिले जाते. तब्बल २३ गावांची भागिदारी या कंपनीसाठी असल्याचे फाऊंडेशनच्या वतीने सांगण्यात आले. उत्पादन खर्च कमी करणे, जास्तीत जास्त उत्पादन घेणे, आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतीक्षेत्रात बदल घडवून आणणे, बियाण्यांच्या बाबतीत शेतकऱ्यांनी स्वावलंबी व्हावे, या साठी त्यांना प्रवृत्त करणे असे उपक्रम कौडगाव आणि परिसरातील गावांमध्ये घेतले जातात. त्याचा परिणाम म्हणून गतवर्षी एकाही शेतकऱ्याने सोयाबीनचे बियाणे विकत घेतले नाही. कौडगावमध्ये मोठय़ा प्रमाणावर शेततळे घेण्यात आले. त्यामुळे या गावचा परिसर दुष्काळातही हिरवा दिसतो. ३६ शेततळ्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी पाण्याचे महत्त्व काय, ते दाखवून दिले. याच गावात मुलींच्या जन्माचे स्वागत उत्साहात केले जाते. महिलांची आरोग्य तपासणी, तसेच अन्य उपक्रम राबवले जातात. सुप्पा खालसा गावात एका सामूहिक विहिरीद्वारे गावकऱ्यांची तहान भागवली जाते. गावाभोवती विस्तीर्ण डोंगररांगा आहेत. त्यात जागोजागी खोल चर खोदण्यात आले आहेत. डोंगरमाथ्यावर पडणारे पाणी अडवले जाते. परिसरात हे पाणी झिरपते. फाऊंडेशनने तीन वर्षांपूर्वी हे काम केले. त्यामुळेच गावात पाण्याची अडचण आज जाणवत नाही. भूगर्भातील या गावातील पाण्याची पातळी वाढली. संपूर्ण गंगाखेड तालुक्यात अनेक गावे दुष्काळग्रस्त असताना सुप्पा गावात मात्र पाण्याचे दुíभक्ष्य जाणवत नाही. गावात पाण्याचे दुíभक्ष्य नसल्यामुळे गावकरी समाधानी आहेत.
सुप्पा खालसाचे रहिवाशी लहु जाधव म्हणाले की, गावातील हातपंप आणि विहिरी डिसेंबर किंवा जानेवारीतच कोरडय़ा पडायला लागतात; पण रिलायन्स फाऊंडेशनने पावसाचे वाहून जाणारे पाणी अडवून जिरवण्यासाठी जे उपक्रम राबवले, त्यामुळे अजूनही विहिरीत पाणी उपलब्ध आहे. मे महिन्यातही आम्हाला पाण्याचे दुíभक्ष्य जाणवणार नाही. पाणी अडवा पाणी जिरवा या सूत्राद्वारे आम्ही ते साधले आहे.