कोकणचे सुपत्र शहीद मेजर कौस्तुभ राणे यांची पत्नी कनिका रावराणे यांची लष्करात जाण्याची इच्छा पूर्ण झाली आहे. कनिका यांनी लष्कर आधिकारी पदाच्या परीक्षेत यश मिळवले आहे. ऑक्टोबर महिन्यात चेन्नई येथे त्यांच्या प्रशिक्षणाला सुरूवात होणार आहे. पतीचे अर्धवट स्वप्न पूर्ण करण्यासाठी कनिका लष्करात दाखल होणार आहेत. नितेश राणे यांनी ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. मेजर कौस्तुभ राणे यांच्या प्रथम स्मृतीदिनी विरपत्नी यांना लष्कराकडून नियुक्ती पत्र देण्यात आले आहे.

सात ऑगस्ट २०१८ रोजी उत्तर काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना वैभववाडी तालुक्यातील सडुरेचे सुपुत्र मेजर कौस्तुभ प्रकाश राणे (रावराणे) (२९) यांना वीरगती आली होती. पती शहीद झाल्यानंतर न खचता लष्करात दाखल होत कनिका यांनी एक आदर्श निर्माण केला आहे. कनिका रावराणे सध्या एका कंपनीत प्रोजेक्ट मॅनेजर पदावर काम करीत आहेत.

मुंबईतील एका कार्यक्रमात कनिका रावराणे यांनी सैन्य दलात जाऊन सीमेवर मला लढायचे आहे अशी इच्छा व्यक्त केली होती. सैन्य दलाविषयी आवड, देशाविषयी प्रेम आपुलकी वाटावी म्हणून आपण सैन्य दलात जायची तयारी केली आहे, असे त्यानी सांगितले होते.