अपेक्षित पावसाअभावी पाणीसाठय़ात घट

सांगली : पावसाचा हंगाम सुरू होऊन दहा दिवसांचा अवधी झाला असताना कोयना धरणामध्ये २७.३४ तर चांदोलीमध्ये ३९.५६ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. पश्चिम भागात अद्याप अपेक्षित पाऊस सुरू नसल्याने धरणातील पाणी कमी होत आहे.

जिल्ह्य़ातील चांदोली धरणामध्ये एक जून रोजी पाणीसाठा १४.७५ टीएमसी होता. गेल्या पंधरा दिवसांत यापैकी १.१४ टीएमसी पाणी कमी झाले आहे. धरणातून रोज पायथा विद्युतगृहाद्वारे १ हजार ५१५ क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्याचे जलसंपदा विभागातून सांगण्यात आले. तर १०५.२५ टीएमसी क्षमतेच्या कोयना धरणात मंगळवारी सकाळी सात वाजता २८.७१ टीएमसी पाणीसाठा होता.

मंगळवारी सकाळी विविध धरणातील पाणीसाठा व साठवण क्षमता कंसात टी.एम.सी. प्रमाणात पुढीलप्रमाणे. धोम ४.९५ (१३.५०), कन्हेर २.१८ (१०.१०), दूधगंगा ७.७४ (२५.४०), राधानगरी २.० (८.३६), तुळशी १.७० (३.४७), कासारी ०.८३ (२.७७), पाटगांव १.५५ (३.७२), धोम बलकवडी ०.७० (४.०८), उरमोडी ५.७४ (९.९७), तारळी २.८० (५.८५), अलमट्टी  २३.९२ (१२३).  धरणातून होत असलेला विसर्ग क्युसेकमध्ये पुढीलप्रमाणे. कण्हेर २४, दूधगंगा १००, राधानगरी १२६२, तुळशी ३००, कासारी २५०, पाटगाव ३००, उरमोडी ४०० व अलमट्टी धरणातून ४५१ क्युसेक विसर्ग सुरू आहे.

मिरज, कवठेमहांकाळमधील कालच्या दमदार पावसानंतर मंगळवारी सकाळी व सायंकाळी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. मात्र दुपारी उन्हाचा कडाकाही होता. आज सकाळी सात वाजता संपलेल्या २४ तासांमध्ये जिल्ह्य़ात सरासरी १३.६ मिलीमीटर पाऊस झाला असून कवठेमहांकाळ तालुक्यात ३०.४ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.  जिल्ह्यात गेल्या २४ तासांत पडलेला पाऊस व कंसात १ जून पासून आतापर्यंत पडलेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मि. मी. मध्ये पुढीलप्रमाणे. मिरज २२.४ (९७.२), जत ४.९ (१०७.१), खानापूर-विटा १४.७ (३४.१), वाळवा-इस्लामपूर ११.८ (५७.९), तासगाव १४ (८४.७), शिराळा ११.९ (९३.६), आटपाडी ३.९ (५७.२), कवठेमहांकाळ ३०.४ (८०.७), पलूस १०.७ (९१.६), कडेगाव १०.९ (६५.८).