कोयना धरण पाणलोट क्षेत्रात सलत दहा दिवसांपासून पाऊस सुरू आहे. धरणाचा पाणीसाठा ८८ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. आज दुपारी वीस हजार क्युसेक पाणी नदी पात्रात सोडण्यात येत आहे. धरणाचे पायथा वीजगृह कार्यान्वित करण्यात आले असून त्यासाठी धरणातून दोन हजार शंभर क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे. आज सकाळी धरणात ८८ टीएमसी पाणीसाठा झाला असून पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी धरणाचे सहा वक्र दरवाजे उघडून कृष्णा नदीच्या पात्रात वीस हजार क्युसेक पाणी सोडण्यात येणार आहे.

कोयना धरण परिसरात मुसळधार पाऊस सुरू असल्याने कोयना धरण परिसरातील संपर्क व्यवस्था विस्कळीत झाली आहे. अनेक गावांशी संपर्क तुटला आहे. पूर नियंत्रण आणि आपत्ती व्यवस्थापन कोलमडले आहे.

कोयना धरणातून आज दुपारी एक वाजता कोयना नदीत २० हजार क्यूसेक इतका पाण्याचा विसर्ग चालू करण्यात येणार आहे. पुढील पर्जन्यमानानुसार विसर्गामध्ये आवश्यकतेनुसार बदल करण्यात येतील. धरणाच्या खालील भागातील नदीकाठची शहरे, गावे, वाड्या ,वस्त्यामध्ये राहणाऱ्या नागरीकांनी सुरक्षेच्या कारणास्तव नदीपात्रामध्ये प्रवेश करू नये. नागरिकांनी सतर्क रहावे. पुलावरून पाणी वाहत असल्यास पूल आलोंडू नये. वीजेवरील मोटारी, इंजिने शेती अवजारे अथवा तत्सम साहित्य तसेच पशुधन यांच्याही सुरक्षेची काळजी घेऊन कोणत्याही प्रकारे जिवीत व वित्त हानी होणार नाही याची दक्षता घ्यावी असे आवाहन सातारा जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले.

कोयना परिसर अंधारात; दूरध्वनी सेवाही ठप्प
कोयना धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसाने हाहाकार उडवला आहे. कोयना परिसरातील वीज वितरण व्यवस्था कोलमडल्यामुळे कोयना धरणासह कोयना परीसर अंधारात आहे. यातच भारत संचार निगमच्या अनागोंदी कारभारामुळे दूरध्वनी सेवा बंद झाल्यामुळे कोयना धरण व परिसर संपर्कहीन झाला आहे.

महानिर्मिती  कंपनीने कोयना धरण परीसरात भारनियमनचा ‘ भार ‘ देवून विज पुरवठा खंडित केला आहे.यामुळे कोयना धरण व कोयना परिसर अंधारात गेला आहे. दूरध्वनी सेवा कोलमडल्यामुळे कोयना धरणाचे आपत्ती व्यवस्थापन कोलमडल्यामुळे कोयना प्रकल्पाने भारत संचार निगमवर कारवाई करावी अशी मागणी कोयना प्रकल्पाने जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.