पावसाअभावी पश्चिम महाराष्ट्रातील तळ गाठलेल्या जलसाठय़ांमध्ये गेल्या ३६ तासांतील दमदार पावसामुळे भर पडली आहे. कोयना धरणाच्या पाणलोटात जोरदार पर्जन्यवृष्टी सुरू असून, पुणे जिल्ह्यातील पवना, पाणशेत व वरसगाव धरणक्षेत्रातही पावसाने जोर धरला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील दूधगंगा, सातारा जिल्ह्यातील धोम, धोम-बलकवडी, उरमोडी, तारळी या धरणक्षेत्रात दमदार पाऊस सुरू आहे.

शासकीय दप्तरी पावसाळय़ाचा महिना संपल्यानंतर कालपासून सर्वत्र जोरदार व दमदार पाऊस कोसळू लागला आहे. त्यामुळे धरणांचे साठे काहीसे वाढताना, बळिराजासह सामान्य जनतेला दिलासा मिळाला आहे. कोयना धरणाच्या पाणलोटात संततधार सुरू असून, धरणाच्या पाणीसाठय़ात जवळपास २ टीएमसीची वाढ होताना, पाणीसाठा १३.६५ टक्के आहे. कोयनेचा पाणीसाठा १४.३७ टीएमसी असून, गेल्या ३६ तासांत पाणलोटातील कोयनानगरला १४३ एकूण ६००, महाबळेश्वरला २१३ एकूण ६७७ तर, नवजाला १७० एकूण ७८२ मि.मी. पाऊस कोसळला आहे. कोयनेच्या धरणक्षेत्रात येणाऱ्या पाथरपुंजला दिवसभरात ५७ एकूण सर्वाधिक १२६८ मि.मी. पाऊस झाला आहे. पाठोपाठ कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा येथे ३६ एकूण ११६५ मि.मी. पावसाची नोंद आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील धरणांचा पाणीसाठा टीएमसीमध्ये व त्याची कंसात टक्केवारी – कोयना १४.३७ (१३.६५), वारणा ८.७० (२५), धोम २.७८ (२०.६२), कण्हेर १.९२ (१९.२२), राधानगरी २.०७ (२५), दूधगंगा २.२१ (९), तारळी १.०७ (१८.३१), धोम-बलकवडी ०.३७ (१३.८१), उरमोडी ३.६२ (३६.३९), वीर ०.५९ (६.३३), नीरा देवघर ०.२६ (२.२६), भाटघर १.७३(७.३८), पवना १.०३ (१२.१९), खडकवासला १.५० (२२.४६), पानशेत १.३९ (१०.१३), उजनी उणे २८.५३ (उणे ५३.५७).

****************

सांगलीत पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस

वार्ताहर, सांगली</p>

धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असून यामुळे कोयना, चांदेली धरणाच्या पाणीसाठय़ात दीड ते पावणेदोन टीमएसी वाढ झाली असल्याची माहिती जलसंपदा विभागातून शनिवारी सायंकाळी देण्यात आली. कोयना धरणातील पाणीसाठा ११.२६ वरून १३.६६ तर चांदोलीचा ७.८८ वरून ८.६४ झाला आहे. संततधार पावसामुळे नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने कालपासून कोयना व चांदेली धरणातील विसर्ग थांबविण्यात आला आहे.

गेल्या दोन दिवसांपासून धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस होत असून गेल्या २४ तासांत सर्वाधिक पाऊस कोयना येथे १७५ मिलीमीटर नोंदला गेला. महाबळेश्वर येथे १६९, नवजा येथे १२५ आणि चांदोली येथे ५३ मिलीमीटर पाऊस झाला आहे. चांदोली धरणक्षेत्रात आज दिवसभर पावसाचा जोर थोडा ओसरला असला तरी शुक्रवापर्यंतच्या २४ तासांत अतिवृष्टीची नोंद करीत ८६ मिलीमीटर पाऊस नोंदला गेला.

कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी, दूधगंगा धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही मुसळधार पाऊस कोसळत आहे. राधानगरीत ९८, तर दूधगंगा धरणाच्या ठिकाणी ७७ मिलीमीटर पाऊस नोंदला गेला. यामुळे धरणाच्या पाणीपातळीत झपाटय़ाने वाढ होत आहे. पावसाचे पाणी ओढय़ा-नाल्यांमुळे नदीपात्रात येत असल्याने कोयना व चांदोली धरणातील विसर्ग शुक्रवारपासून पूर्णपणे  थांबविण्यात आला असल्याचे जलसंपदा विभागातून सांगण्यात आले. जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाने जोर धरला असला, तरी पूर्व भाग मात्र अद्याप पावसाच्या प्रतीक्षेत आहे. आज दिवसभर तुरळक सरी सांगली मिरज शहरापर्यंतच आल्या. दिवसभर ढगाळ हवामान आणि जोरदार गार वारे मात्र वाहत आहेत.

****************

साताऱ्यात पावसास जोमदार सुरुवात

वार्ताहर, सातारा</p>

गुरुवारपासून साताऱ्यात पावसास सुरुवात झाली. जून महिन्यात पडणाऱ्या पावसाच्या सरासरीपेक्षा कमी पाऊस जरी असला तरी संततधार पावसाने शेतकऱ्याला निश्चितच दिलासा दिला आहे.

आज साताऱ्यात १३.७ मिमी पावसाची नोंद झाली असून आज अखेर साताऱ्यात एकूण ९८.९ मिमी पाऊस पडला आहे. हा पाऊस पेरणी झालेल्या शेतीला पोषक असून शेतकऱ्यांना अजून दमदार पावसाची अपेक्षा आहे. या पावसामुळे शेततळी, बंधारे व जलशिवार योजनेच्या माध्यमातून तयार झालेल्या विहिरी यांच्या पातळीमध्ये वाढ झाली आहे. या पावसामुळे ज्यांच्या पेरण्या खोळंबल्या होत्या, त्यांनी बियाणे मिळवण्यासाठी दुकानात गर्दी केल्याचे दृश्य बघायला मिळते. तसेच खते, कीटकनाशके हे घेण्यासाठी सुद्धा बळिराजाची लगबग सुरू आहे. साताऱ्यात जरी या काळात धुवाधार पाऊस पडला नसला, तरी या भिजपावसाने शेतकरी उत्साहाने कामाला लागला आहे. या पावसाने काही प्रमाणात शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कास तलावाची पाण्याची पातळी वाढली आहे.

****************

महाबळेश्वरमध्ये आठ इंच पाऊस

वार्ताहर, वाई

महाबळेश्वर, पाचगणी, वाई परिसरात  पावसाने हजेरी लावली. दिवसात काही वेळ झालेल्या पावसाने महाबळेश्वर येथे आठ इंच पावसाची नोंद झाली. वेण्णा लेकची पाणीपातळी चार फुटांनी वाढली.

परिसरात शुक्रवारी रात्रीपासून पावसाला सुरुवात झाली. पावसाने महाबळेश्वरातील ओढे-नाले भरभरून वाहू लागले. हा पाऊस कोयना, धोम बलकवडी धरणांसाठी फारच महत्त्वाचा आहे. धरणांच्या पर्जन्य क्षेत्रात हा पाऊस झाला असला तरी धरणांच्या पाणी पातळीत लगेचच फरक पडणार नाही. हा पाऊस आठपंधरा दिवस राहील, असा अंदाज वर्तविला जात आहे. या परिसरातील पेरण्या पूर्ण झाल्या आहेत.