‘कृषी वसंत’ प्रदर्शनाच्या समारोपात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे भाषण सुरू होताच काही शेतकऱ्यांनी गोंधळ घातल्याने पोलिसांची धावपळ उडाली होती. यावेळी काहीजणांना धक्काबुक्कीही झाली.
केंद्रीय व राज्य कृषी खाते तसेच भारतीय उद्योग महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वर्धा मार्गावरील केंद्रीय कापूस संशोधन केंद्राच्या परिसरात आयोजित ‘कृषी वसंत’ प्रदर्शनाचा गुरुवारी समारोप झाला. केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार या कार्यक्रमास उपस्थित राहू शकले नाहीत. पृथ्वीराज चव्हाण यांचे भाषण सुरू होत असतानाच सभा मंडपात बसलेला एक वृद्ध शेतकरी हळूहळू काहीतरी बोलत व्यासपीठाकडे सरकू लागला. व्यासपीठाच्या काही अंतरावर आला असतानाच तो मोठय़ाने बोलू लागला. ते पाहून सुरक्षा यंत्रणेचे तिकडे लक्ष गेले. पोलिसांनी त्या शेतकऱ्याला समजावण्याचा प्रयत्न केला.
कापसाला जाहीर केलेला भाव मिळाला नाही, चंद्रपुरात वीज तयार होते मात्र ती मुंबईतच जास्त दिली जाते, असे हा वृद्ध शेतकरी मोठय़ाने बोलत होता. पोलीस यंत्रणेने त्याला समजावत बाहेर नेणे सुरू केले, तर पोलीस त्याला जाण्यास मज्जाव करू लागले. ते दिसताच  मांडवात गोंधळ उडाला. यावेळी तेथे धक्काबुक्की झाली. नंतर पोलिसांनी या शेतकऱ्यास तेथून बाहेर काढले.