पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २ ऑक्टोबर या गांधी जयंतीचे औचित्य साधून दिलेल्या स्वच्छ भारत निर्माणच्या हाकेला प्रतिसाद देत भाजपा व हिंदू एकता आंदोलनातर्फे आज बुधवारपासून कृष्णा नदी व कृष्णाकाठ शुद्धीकरणाची व्यापक मोहीम प्रभावीपणे हाती घेण्यात आली. हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांबरोबरच शाळकरी मुले, महाविद्यालयीन युवावर्ग तसेच, विविध सेवाभावी संस्था संघटनांच्या कार्यकर्त्यांनी या मोहिमेस मोठा प्रतिसाद दर्शविला.
आज मंगलप्रभात समयी मोहिमेस उत्साहात प्रारंभ झाला. त्यात कृष्णा घाट परिसर व कृष्णा नदीपात्राची स्वच्छता करण्यात आली. शहर परिसरातील विद्यार्थी, शिक्षक तसेच हिंदुत्ववादी व सेवाभावी कार्यकर्ते हातात झाडू घेऊन काटेकोर स्वच्छता करीत असल्याचे सुखद चित्र होते. कृष्णा नदीचा काही भाग, ऐतिहासिक पंताचा कोट व बालाजी सांस्कृतिक भवनपर्यंतचा रस्त्यावरील व अडगळीतीलही कचरा कटाक्षाने काढण्यात आला. तब्बल ७ ट्रक कचरा येथील कचरा डेपोत नेऊन डंप करण्यात आला. या वेळी सहभागी कार्यकर्ते, विद्यार्थी व नागरिकांनी स्वच्छता राखण्याची तसेच त्या संदर्भात प्रबोधन व प्रत्यक्ष योगदान देण्याची प्रतिज्ञा घेतली. प्रत्येक आठवडय़ाला प्रामाणिकपणे स्वच्छता अभियान राबवण्याचा एकमुखी निर्धार करण्यात आला. या व्यापक मोहिमेत सर्व समाजघटकांनी कर्तव्याच्या भावनेतून सहभागी व्हावे असे आवाहन या वेळी करण्यात आले.
हिंदू एकताचे जिल्हाध्यक्ष, नगरसेवक विक्रम पावसकर म्हणाले, की कराड शहरातील सांडपाणी नदीपात्रात मिसळत असल्याची बाब गांभीर्याने घेऊन हा प्रश्न कायमस्वरूपी निकाली निघावा म्हणून राज्य शासनाच्या वतीने विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. आरोग्याच्या दृष्टीने सर्व ते उपाययोजना व्हाव्यात म्हणून पालिकेकडे आपण सदैव पाठपुरावा करू, अशी ग्वाही त्यांनी दिली.  
पेंढारकर म्हणाले, की हे अभियान अभ्यासपूर्ण नियोजनातून यशस्वी करण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे. मात्र, संबंधित प्रशासनाकडून अपेक्षित सहकार्य मिळण्याबाबत साशंकता असल्याने ठिकठिकाणचा कचरा झाडूने हटवताना नदीपात्रापर्यंत वाहणारी गटारगंगा व अन्य माध्यमातून कृष्णानदी दूषित होत असल्याबाबत प्रशासनाला जाग आणण्यासाठी स्वतंत्र मोहीम राबवावी लागणार असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. परंतु, सर्व त्या पातळय़ांवर लढा देत मोदींनी दिलेली स्वच्छ भारत निर्माणची हाक प्रत्यक्षात उतरवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
स्वच्छ व सुंदर कराडच्या अभियानात सर्वश्री मुकुंदराव कुलकर्णी, शिरिष गोडबोले, विद्याताई पावसकर, ए. आर. पवार, मिलिंद शिंदे, रत्नाकर शानभाग, बापू चिवटे, गणेश कापसे, सुरेश सारडा तसेच, शिवम् प्रतिष्ठान, राजस्थानी मंडळ, स्टेशनरी बुक सेलर्स असोसिएशनचे पदाधिकारी, विद्यार्थी व कराडकर नागरिक सहभागी झाले होते.