खा. मोहिते-पाटील यांची मागणी
राज्यात सर्वत्र जोरदार पाऊस पडत असताना सोलापूर जिल्ह्य़ात मात्र पावसाने पार निराशाच केली आहे. शेजारच्या सांगली, कोल्हापूर भागात पडलेल्या मुसळधार पावसाचे पाणी कर्नाटकात वाहून गेले. कृष्णा नदीत हे पाणी अडवून भीमा खोऱ्यात सोडणे ही काळाची गरज आहे. त्याशिवाय दुष्काळाचा प्रश्न सुटणार नाही. त्यासाठी महायुती शासनाने कृष्णा-भीमा स्थिरीकरण प्रकल्प मार्गी लावण्यासाठी पुढाकार घ्यावा आणि मंत्रिस्तरावर बैठक बोलवावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते, खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांनी केली.
सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने देण्यात येणारा पत्रमहर्षी रंगा वैद्य स्मृती राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार सुरेश द्वादशीवार (नागपूर) तर बाबूराव जक्कल स्मृती जिल्हास्तरीय पत्रकारिता पुरस्कार अविनाश व्यं. कुलकर्णी यांना प्रदान करण्यात आला. त्यावेळी खासदार मोहिते-पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचीही प्रमुख उपस्थिती होती. खासदार मोहिते-पाटील व सहकारमंत्री देशमुख यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण झाले.
डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृहात आयोजिलेल्या या समारंभाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समाजवादी नेते पन्नालाल सुराणा हे होते. सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे यांनी स्वागत तर सरचिटणीस विजय देशपांडे यांनी प्रास्ताविक केले. रंगा वैद्य स्मृती पुरस्काराचे स्वरूप २५ हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह, शाल व श्रीफळ असे होते, तर जक्कल स्मृती पुरस्काराचे स्वरूप १५ हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह, शाल व श्रीफळ असे होते. पुरस्काराचे यंदाचे पाचवे वर्ष होते.
खासदार मोहिते-पाटील यांच्या मागणीला प्रतिसाद देत, सहकारमंत्री देशमुख यांनी, सोलापूरच्या विकासासाठी भरपूर वाव असून त्यादृष्टीने सोलापूर-मुंबई विमानसेवा येत्या महिनाभरात सुरू होण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे सांगितले. कृष्णा-भीमा स्थिरीकरण प्रकल्पाबाबतही त्यांनी सकारात्मकता दाखवली.
सध्याच्या पत्रकारितेच्या वाटचालीवर निराशाजनक सूर लावताना पुरस्काराचे मानकरी सुरेश द्वादशीवार यांनी, संपादकांवर जनतेचा विश्वास राहिला नाही, असे नमूद केले. पत्रकारितेचा दर्जा आणि प्रतिष्ठा आपणच घालविली. उलट, छोटय़ा वृत्तपत्रांनी थोडीफार प्रतिष्ठा जपली, असा अभिप्राय त्यांनी दिला. अध्यक्षीय भाषणात पन्नालाल सुराणा यांनी भांडवलशाहीचा पत्रकारितेवर होणारा परिणाम गंभीर असल्याचे मत मांडले. भांडवलशाहीमुळे चंगळवाद, नफेखोरी आणि स्वार्थाधता वाढली. त्यातून आपली चांगली संस्कृती बिघडली. त्यासाठी भांडवलशाहीचे दुष्परिणाम रोखण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. श्वेता हुल्ले यांनी सूत्रसंचालन केले.