News Flash

आता कृषी सहायक शेतकऱ्यांसाठी कायम उपलब्ध

ग्रामसेवक व तलाठी या पूर्णवेळ ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांसोबतच आता कृषी सहायक हा देखील पूर्णवेळ कर्मचारी म्हणून शेतकऱ्यांच्या सेवेत उपलब्ध राहणार आहे.

| February 14, 2015 03:33 am

ग्रामसेवक व तलाठी या पूर्णवेळ ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांसोबतच आता कृषी सहायक हा देखील पूर्णवेळ कर्मचारी म्हणून शेतकऱ्यांच्या सेवेत उपलब्ध राहणार आहे. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या पथदर्शी योजनेस मान्यता दिली असून, वर्धा जिल्ह्य़ातील अंमलबजावणीनंतर राज्यभरातील ग्रामपंचायत भवनात कृषी सहायकाचे पद पूर्णवेळ कार्यरत होईल. ही व्यवस्था राज्यात प्रथमच वर्धा जिल्ह्य़ात सुरू होणार आहे. 

सध्या कृषी विभागाअंतर्गत कृषी सहायक हे पद अस्तित्वात आहेच, पण शेतीक्षेत्रासाठीच उपयुक्त ठरणाऱ्या या पदाकडून नियमित सेवा ग्रामीण भागात उपलब्ध होत नाही. शासनाच्या कृषीविषयक योजनांची शेतकऱ्यांना माहिती देण्याचे प्रमुख काम या कर्मचाऱ्याकडून होते. शिवाय, कृषी शिबिरांचे आयोजन, माती परीक्षण, गरजेनुसार शेतीपिकांची पाहणी व अहवाल, अशाच कामांची जबाबदारी या कृषी सहायकावर असते. ही कामे कृषी सहायकाकडून केले जात असल्याने अनेक गावांतील शेतकऱ्यांना त्याचे दर्शनही होत नाही, पण या कर्मचाऱ्याविषयी ओरडही होत नाही. कारण, शेतकरी या पदाकडून होणाऱ्या कार्याबाबत अनभिज्ञच आहे. या पाश्र्वभूमीवर कृषी सहायकास आठवडय़ातून दोन दिवस ग्रामपंचायतीत पूर्णवेळ ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. आठवडय़ातील सहाही दिवस तो वेगवेगळ्या वेळापत्रकानुसार दोन दिवस बसेल. तो असतांना त्याच्याकडून शेतकरी योजनेबाबतही माहिती घेऊ शकणार आहे. त्याबाबत लाभ घेण्यासाठीही कृषी सहायक आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करेल.
जिल्हा कृषी अधीक्षक भाऊसाहेब बऱ्हाटे म्हणाले की, जिल्ह्य़ात किमान अडीचशे कृषी सहायक असतात. त्यामुळे आठवडय़ात गावानुसार त्यांचे वेळापत्रक ठरेल. त्याच वेळी ग्रामसेवक तलाठी उपस्थित असल्याने कोणत्याही कृषी योजनेचा लाभ घेतांना या तीनही कर्मचाऱ्यांची एकाच वेळी मदत मिळू शकेल. ज्या ठिकाणी ग्रामपंचायत भवन
आहे अशा ठिकाणी त्याचा स्वतंत्र कक्ष ठेवला जाईल. ही बाब राज्यात प्रथमच वर्धा जिल्ह्य़ात सुरू होत आहे. गावपातळीवर केवळ ग्रामसेवक व तलाठी हेच दोन कर्मचारी गाव व शासनातील दुवा आहेत, पण त्यांची कामे प्रशासकीय स्वरूपाची आहेत.
शेतकऱ्यांच्या जीवनमरणाचा प्रश्न असणाऱ्या शेतीबाबत
कृषी सहायक पूरक ठरतो. मात्र, नव्या ग्रामपंचायत कारभारात कृषी सहायकही आवश्यक ठरल्याने गावात एकाच वेळी तीन शासकीय कर्मचारी उपलब्ध होतील.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 14, 2015 3:33 am

Web Title: krushi sahayak for farmers
टॅग : Farmers
Next Stories
1 ..तर मुंबईचे पाणी तोडू – पिचड
2 नगरकरांचे पुण्यातील उपोषण स्थगित
3 ‘महिला बचत गटांसाठी नवीन योजना आणणार’
Just Now!
X