News Flash

खासदार निधी गोठवला असताना कुमार केतकर पैसे कसे देऊ शकले?

हा मुद्दा गैरसमजातून निर्माण झाला असावा असे जिल्हाधिकारी कार्यालयातील सूत्रांनी सांगितले

काँग्रेसचे खासदार कुमार केतकर यांच्या खासदार निधीमधूनच ठाणे जिल्ह्यातील आरोग्य विभागाच्या दहा रुग्णालयांना अडीच कोटी रुपयांचा निधी मिळणार असून यातील एक कोटी ३० लाख रुपयांची कामे निविदा काढून तात्काळ सुरु केली जातील असे ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील सूत्रांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करोनाच्या लढाईसाठी देशातील सर्व खासदारांना मिळणारा निधी वापरण्याचे जाहीर केले असताना खासदार केतकर हे कुठल्या खासदार निधीमधून पैसे उपलब्ध करून देणार असा सवाल सोशल मीडियावर करण्यात येत आहे. गेल्या आठवड्यात खासदार केतकर यांनी जिल्ह्याधिकारी राजेश नार्वेकर यांची भेट घेऊन ठाणे जिल्ह्यातील आरोग्य विभागाच्या दहा रुग्णालयांसाठी अडीच कोटी रुपयांचा निधी सुपूर्द केला. यानंतर सोशल मीडियावर कुमार केतकर खासदार निधी देऊच कसा शकतात असा प्रश्न विचारला जात आहे. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालय तसेच खासदार केतकर यांच्या कार्यालयाकडे विचारणा केली असता २०१९- २० सालामधील त्यांच्या शिल्लक निधीमधून पहिल्या टप्प्यात एक कोटी ३० लाख रुपये पाच रुग्णालयांसाठी व उर्वरित निधी केंद्राकडून उपलब्ध झाल्यावर वापरला जाईल असे सांगण्यात आले.

वाचा मूळ बातमी: ठाणे जिल्ह्यातील आरोग्य विभागाच्या १० रुग्णालयांसाठी खासदार कुमार केतकरांनी दिला अडीच कोटींचा निधी!

खासदार म्हणून केतकर यांना दरवर्षी पाच कोटी रुपये निधी उपलब्ध होतो. २०१८ साली राज्यसभेवर खासदार म्हणून त्यांची नियुक्ती झाली. त्यावर्षीचा म्हणजे २०१८- १९ चा निधी हा त्यांनी आरोग्य, शिक्षण व वाचनसंस्कृती वाढविण्यासाठी खर्च केला. एप्रिल २०१९ ते मार्च २०२० या वर्षातील निधीमधून त्यांनी कामे करण्यासाठी वेगवेगळे प्रस्ताव ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाला सादर केले होते. त्यातील काही कामे सुरुही झाली आहेत तर काही कामे केंद्र सरकारकडून निधी न आल्यामुळे प्रस्तावित होती. लोकसत्ताचे पत्रकार संदीप आचार्य यांनी ठाणे जिल्हा रुग्णालयाला तसेच जिल्ह्यातील आरोग्य विभागाच्या दहा ग्रामीण रुग्णालयांना प्रत्येकी २५ लाख याप्रमाणे निधी मिळाल्यास करोना काळात मोठी मदत होईल असा प्रस्ताव खासदार केतकर यांच्याकडे मांडला. सद्यस्थितीत आरोग्य व्यवस्था बळकट होणे अत्यंत गरजेचे असल्यामुळे खासदार केतकर यांनी त्यांच्या निधीमधून हे प्रस्ताव मंजूर करण्यास जिल्हाधिकारी नार्वेकर यांची समक्ष भेट घेऊन सांगितले. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.

यावेळी खासदार केतकर यांचा २०१९-२० मधील शिल्लक निधीची माहिती घेण्यात आली असता, एक कोटी ३० लाख रुपये शिल्लक असल्याचे व उर्वरित निधी केंद्राकडून येणार असल्याचे सांगण्यात आले. शिल्लक निधीमधून पाच रुग्णालयांची कामे तात्काळ हाती घेता येतील, असे जिल्हाधिकारी नार्वेकर यांनी स्पष्ट केले. त्यानुसार ठाणे जिल्हा रुग्णालय, ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयासह पाच रुग्णालयांची कामे तात्काळ केली जावी, असे कुमार केतकर यांनी सांगितले. उर्वरित शिल्लक निधी मिळण्याबाबत दिल्लीतील संबंधित विभागाकडे विचारणा केली असता लवकरच हा निधी दिला जाईल, असे सांगण्यात आल्यानंतरच अडीच कोटी रुपयांचा निधी देण्यात आल्याचे खासदार केतकर यांच्या कार्यालयाने सांगितले.

करोनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जो खासदार निधी ताब्यात घेतला आहे तो २०२०-२१ व २०२१-२२ सालासाठीचा आहे. त्यामुळे खासदार केतकर कोणत्या निधीमधून दहा रुग्णालयांसाठी निधी उपलब्ध करून देणार हा मुद्दा गैरसमजातून निर्माण झाला असावा असे जिल्हाधिकारी कार्यालयातील सूत्रांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 10, 2021 9:04 am

Web Title: kumar ketkar mp fund thane hospitals
टॅग : Coronavirus
Next Stories
1 …यावर आता भाजपाची गोबेल्स यंत्रणा काय बोलणार?; शिवसेनेचा सवाल
2 म्युकोरमायकॉसिस या बुरशीजन्य संसर्गाचे चंद्रपुरात १० रूग्ण मिळाले
3 Coronavirus : महाराष्ट्रात रुग्णघट
Just Now!
X