आपचे माजी नेते आणि प्रसिद्ध कवी कुमार विश्वास यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल नेटवर्किंगवर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. पुण्यामधील एका कार्यक्रमामध्ये विश्वास यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासाठी एक कविता सादर केली.

काय म्हणाले कुमार विश्वास

पुण्यामध्ये काही दिवसांपूर्वी झालेल्या एका कार्यक्रमामध्ये कुमार विश्वास सहभागी झाले होते. यावेळी भाषण देताना त्यांनी कवितांच्या माध्यमातून राजकीय टोलेबाजी केली. यामध्ये त्यांनी अगदी भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि स्वत: ज्या पक्षाचे नेते होते त्या आपचीही फिरकी घेतली. याच भाषणाचा व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे.

अजित पवार आणि फडणवीस यांना टोला

२३ नोव्हेंबरच्या रोजी अजित पवारांच्या पाठिंब्याने सरकार स्थापन करणाऱ्या फडणवीसांनाही कुमार यांनी कव्यात्मक टोला लगावला आहे. सत्ता स्थापन केल्यानंतर चारच दिवसामध्ये अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाचा तर फडणवीसांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. या सर्व गोंधळानंतर अजित पवार फडणवीसांना काय ऐकवतील असं म्हणत कुमार यांनी पुढील ओळी सादर केल्या.

जख्म इतने मिले फिर सिले ही नही
दिप ऐसे बुझे फिर जले ही नही
व्यर्थ किस्मत पे रोने से क्या फायदा
सोच लेना की हम तूम मिले ही नही

असा आहे संदर्भ…

ऑक्टोबरमध्ये राज्यातील विधानसभेच्या निवडणुका पार पडल्यानंतर राज्यामध्ये मुख्यमंत्री पद अडीच अडीच वर्ष वाटून घेण्यावरुन युतीमध्ये भाजपा आणि शिवसेना या मित्रपक्षांमध्ये वाद झाला आणि तो विकोपाला गेला. त्यानंतर शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीला बरोबर घेऊन सत्ता स्थापनेची तयारी सुरु केली. मात्र अचानक २३ नोव्हेंबरच्या सकाळी राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसच्या मदतीने राज्यात सत्ता स्थापन करण्यास आतुर झालेल्या शिवसेनेला जोरदार धोबीपछाड देत देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे २८ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. तर राष्ट्रवादीचे बंडखोर नेते अजित पवार उपमुख्यमंत्रिपदी विराजमान झाले. यानंतर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर चारच दिवसांमध्ये हे सरकार पडले. यावरुनच महाराष्ट्राची सत्ता केंद्रस्थानी ठेवत जो मेरा हो नहीं पाया, वो तेरा हो नहीं सकता, असं पवार फडणवीस यांना म्हणाले असतील असा टोला कुमार विश्वास यांना लगावला आहे.

पवार काका-पुतण्यांबद्दल काय म्हणाले?

विश्वास यांनी आपली लोकप्रिय कविता सादर करताना दिलेल्या माहितीमध्ये, “आता पुढील कविता असं समजा की शरद पवार साहेब अजित पवारांबद्दल देवेंद्र फडणवीस यांना समजावत आहेत,” अशी सुरुवात केली. त्यानंतर विश्वास यांनी “यह आंसू प्यार का मोती है , इसको खो नहीं सकता… मेरी चाहत को दुल्हन तू बना लेना, मगर सुन ले…” या दोन ओळी म्हटल्या. कविता सादर करताना परत थांबून, ‘पुढच्या ओळी ऐकून पवारांना कळलं पाहिजे की मी पुण्यात काय सादर केलं,’ असं म्हणत पुढील ओळ सादर केली. “जो मेरा हो नहीं पाया, वो तेरा हो नहीं सकता,” अशी ओळ सादर केली आणि सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला.

“योग्य वेळ आल्यास चेंडू टोलवू”

दिल्लीत निवडणूक तोंडावर आली असताना आपल्याला देशातील सर्व मोठय़ा पक्षांनी विविध प्रलोभनासह प्रवेशाचा प्रस्ताव दिला असून निर्णयाचा चेंडू मी माझ्या कोर्टातच ठेवलेला आहे. याबाबत कोणताही विचार केला नाही. योग्य वेळ आल्यास तो चेंडू टोलवू, अशी प्रतिक्रिया विश्वास यांनी मागील महिन्यात गोंदिया येथील कविसंमेलन काव्यांजली कार्यक्रमामध्ये माध्यमांशी संवाद साधता व्यक्त केली होती.