X

…मग २०२२ला येणारा कुंभमेळा २०२१मध्ये का घेतला?; आव्हाडांनी उपस्थित केली शंका

"महाराष्ट्रातील वारकऱ्यांचे अभिनंदन..."

करोचा प्रादुर्भाव झालेला असतानाच आयोजित करण्यात आलेल्या कुंभमेळ्यावरील वाद अजूनही थांबलेला नाही. राजकीय नेत्यांसह सिन कलाकारांनीही कुंभमेळ्याच्या आयोजनावर टीका करत नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर कुंभमेळा प्रातिनिधिक स्वरूपात होत असून, राज्याचे गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी कुंभमेळ्याच्या आयोजनाबद्दल शंका उपस्थित केली आहे.

उत्तराखंडमधील हरिद्वारमध्ये कुंभमेळ्याचं आयोजन करण्यात आलं. मात्र, कुंभमेळा सुरू होण्याच्या तोंडावरच देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेचा उद्रेक झाला. त्यामुळे कुंभमेळा रद्द करण्याचीही मागणीही झाली. मात्र, त्याला कारणं देत नकार देण्यात आला. अखेर कुंभमेळ्यात करोनाचा शिरकाव झाल्यानंतर अनेक आखाड्यांनी समाप्त झाल्याची घोषणा केली. तर पंतप्रधानांच्या आवाहनानंतर प्रातिनिधिक स्वरूपात कुंभमेळा पार पडला.

दरम्यान, कुंभमेळ्याच्या आयोजनावरूनच राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. आव्हाडांनी यांनी ट्विट करत या शंका उपस्थित केल्या आहेत. तसेच पंढरपूरच्या वारीसह इतर वाऱ्या घरी राहून पार पाडल्याबद्दल महाराष्ट्रातील वारकऱ्यांचं अभिनंदन केलं आहे. “कुंभ हा दर १२ वर्षांनी येतो… मग २०२२ला येणारा कुंभमेळा २०२१ मध्ये का घेतला…? केंद्र सरकारने व राज्य सरकारने त्याला मान्यता का दिली….? करोनाच्या झालेल्या प्रसाराची व त्यामुळे झालेल्या मृत्यूंची जबाबदारी घेणार का…?,” असा केंद्राला सवाल करत ‘महाराष्ट्रातील वारकऱ्यांचे अभिनंदन…,” अशा भावना व्यक्त केल्या आहेत.

या ट्विटमध्येच आव्हाडांनी नेपाळच्या पूर्वीचे राजे ज्ञानेंद्र वीर विक्रम शाह देव आणि राणी कोमल यांना करोना झाल्याचं म्हटलं आहे. ते हरिद्वामधील कुंभमेळ्याला महाकुंभमेळ्याला उपस्थित होते, असंही आव्हाड यांनी सांगितलं. या ट्विटमध्ये आव्हाडांनी राजे ज्ञानेंद्र यांचा फोटोही पोस्ट केला आहे.

सोनू निगमनेही केली होती टीका

सोनू निगमनेही काही दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट करत करोनाच्या काळात कुंभमेळा आयोजित करायला नको होता, असं म्हटलं होतं. “मी दुसऱ्यांविषयी काही म्हणू शकत नाही. पण, एक हिंदू म्हणून हे निश्चितच सांगू शकतो की, कुंभमेळा व्हायला नको होता. असो चांगलं झालं थोडी सुबुद्धी झाली आणि याला प्रातिनिधिक स्वरूपात करण्यात आलं. मी श्रद्धा समजू शकतो. पण, मला वाटतं सध्या लोकांच्या जिवांपेक्षा जास्त महत्त्वाचं काहीही नाही,” असं सोनू निगम म्हणाला होता.

23
READ IN APP
X