सिंहस्थ आणि साधू-महंत यांच्यातील वादाची परंपरा यंदाही कायम राहणार असल्याचे अधोरेखित होत असून शहरात उभारलेल्या फलकांमुळे त्याची ठिणगी पडली आहे. अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत ग्यानदास महाराज यांचे छायाचित्र असणाऱ्या या फलकांवर नाशिकच्या सिंहस्थासाठी येण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
    या फलकांना आखाडा परिषदेच्या नवनिर्वाचित अध्यक्षांसह त्र्यंबकेश्वरमधील शैवपंथीय आखाडय़ांनी आक्षेप घेतला आहे. सिंहस्थाचे मूळस्थान असणाऱ्या त्र्यंबकेश्वरला वगळून या फलकांवर केवळ नाशिकचा उल्लेख करण्यात आला असून ग्यानदास महाराज हे अध्यक्ष असल्याचा अपप्रचार करण्यात आल्याची तक्रार त्यांनी केली आहे. हे वादग्रस्त अनधिकृत फलक प्रशासनाने न हटविल्यास नागा साधू ते उखडून टाकतील, असा इशारा संबंधितांनी दिला आहे. यामुळे राज्य शासन आणि प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे.
कुंभमेळ्यातील वादावरुन सव्वा दोनशे वर्षांपूर्वी वैष्णवपंथीयांनी नाशिक येथे तर शैव पंथीयांनी त्र्यंबकेश्वर येथे स्नान करावे असा निर्णय झाला होता. तेव्हापासून नाशिक आणि त्र्यंबकेश्वर या दोन ठिकाणी कुंभमेळा भरण्यास सुरुवात झाली. मात्र,  परस्परांमधील वाद आजही कायम आहेत. दोन महिन्यांनी नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे सिंहस्थ कुंभमेळ्यास सुरूवात होत आहे.