२१ व्या शतकातील दुसऱ्या कुंभमेळ्यातील पहिले शाही स्नान शनिवारी नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे होणार असून त्याची जय्यत तयारी प्रशासनाने केली आहे. दोन्ही ठिकाणी भल्या पहाटे साधू-महंतांची शाही मिरवणूक निघणार असून त्यानंतर शाहीस्नान होईल. या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
साधू-महंतांच्या शाही स्नानासाठी नाशिकचे रामकुंड व त्यालगतचे नदीपात्र तसेच त्र्यंबकचे कुशावर्त मध्यरात्रीपासून भाविकांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. गतवेळच्या कुंभात शाही मिरवणुकीवेळी चेंगराचेंगरीची दुर्घटना घडली होती. तसे पुन्हा काही घडू नये म्हणून पोलिसांनी विविध पातळीवर खबरदारी घेतली आहे. मिरवणुकीत घातक शस्त्र बाळगण्यास अथवा त्याचे खेळ करण्यास मनाई, फटाके व ज्वालाग्राही पदार्थ बाळगण्यास प्रतिबंध, प्रसाद व नाणे उधळण्यास बंदी घालण्यात आली आहे. शाही स्नानासाठी नाशिक येथे सकाळी सहा ते दहापर्यंत तर त्र्यंबकेश्वर येथे पहाटे चार ते दुपारी बारा वाजेपर्यंतची वेळ निश्चित करण्यात आली आहे. देशभरातुन येणाऱ्या भाविकांच्या खासगी वाहनांना शहरात प्रवेश बंद आहे. बाह्णा वाहनतळावरून वाहने उभी करून त्यांना एसटी बसगाडीने अंतर्गत वाहनतळावर येता येईल. त्यासाठी एसटी महामंडळाने तब्बल तीन हजार बसचा ताफा सज्ज ठेवला आहे. देशभरातुन येणाऱ्या भाविकांसाठी रेल्वेने विशेष गाडय़ा सोडल्या आहेत. शहरात वेगवेगळ्या महामार्गावरून व रेल्वेने येणाऱ्या भाविकांना वेगवेगळ्या घाटांवर नेण्याचे नियोजन आहे.

बाहेरगावाहून नाशिकमध्ये येणाऱ्या भाविकांसाठी स्नानाची व्यवस्था
मुंबई व त्र्यंबकेश्वरकडून येणाऱ्याकरीता लक्ष्मीनारायण रामघाट
’ त्र्यंबकेश्वरकडून पायी येणाऱ्यांसाठी गौरी पटांगण
’ इंदूर, धुळ्याकडून आग्रारोडने येणारे – नांदूर-मानूर रामघाट
’ दिंडोरीकडून येणारे- टाळकुटेश्वर रामघाट
’ औरंगाबादकडून येणारे – नांदूर-मानूर व टाकळी संगम रामघाट
’ पुण्याकडून येणारे – दसक रामघाट
’ गिरणारे, दुगाव, पेठकडून येणारे – गांधी तलाव रामघाट.

त्र्यंबकेश्वर येथील स्नानाची व्यवस्था
’ मुंबई, घोटीकडून येणाऱ्यांसाठी नवनाथ घाट
ठाणे, जव्हारकडून येणारे- अहिल्या घाट
’ नाशिक, गिरणारे व रोहिलेकडून येणारे – आचार्य श्रीश्रीचंद घाट