News Flash

कुणकेरीच्या हुडा उत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद

कुणकेरीच्या हुडा उत्सवाला शेकडो भाविकांनी उपस्थिती दर्शविली. त्याशिवाय रोंबाट, घोडेमोडणी आणि १०५ फूट उंचीच्या हुडय़ावर चढणाऱ्या संचारावर भाविकांच्या दगडफेकीत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला

| March 24, 2014 02:40 am

कुणकेरीच्या हुडा उत्सवाला शेकडो भाविकांनी उपस्थिती दर्शविली. त्याशिवाय रोंबाट, घोडेमोडणी आणि १०५ फूट उंचीच्या हुडय़ावर चढणाऱ्या संचारावर भाविकांच्या दगडफेकीत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कुणकेरी हुडा उत्सवाला आज जत्रोत्सवाचे रूप आले होते.
होळी सणाच्या काळात कुणकेरीचा शिमगा सात दिवसांचा असतो. सातव्या दिवशी हुडा उत्सवाचा थाट आकर्षण व भक्तीचा एक मेळाच ठरतो. शिमगोत्सवाच्या काळातील रोंबाट घरोघरी फिरविले जाते. कुणकेरीच्या श्री देवीभावईच्या भेटीला शेजारी कोलगावचा श्री देव कलेश्वर व आंबेगावचा श्री देव क्षेत्रपालेश्वर भेटीला तरंग काठीसह पालखीतून वाजतगाजत येतो. श्रीदेवी भावई म्हणजे या शेजारी दोन्ही देवांची बहीण मानली जाते.
आज दुपारनंतर हुडा उत्सवाची रंगत सुरू झाली. हुडा उत्सवस्थळी भाविक जमा होऊ लागले. कुणकेरीचे रोंबाट गावात घातले जात होते. संध्याकाळी आंबेगाव व कोलगाव येथील देव सीमेवर आले असता त्यांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर हुडा उत्सवाच्या ठिकाणी देवतांचा मांड असतो तेथे गाऱ्हाणे, ओटी भरणे, नवस फेडणे व करण्याला भाविकांनी गर्दी केली होती. संध्याकाळी १०५ फूट उंचीचा सागवानी हुडाच्या ठिकाणी रोंबाट दाखल झाले. त्या वेळी जोरदार फटाक्यांची आतषबाजी सुरू झाली. त्याच वेळी घोडेमोडणी, वाघ खेळ सुरू झाले. तसेच एक होळीचा दगड उचलण्यासाठी तरुणांनी एकच गर्दी केली होती.
होळी सणाची पूर्वपरंपरा ४०० वर्षांपासून सुरू आहे. निसर्गाचे व वन्यप्राण्यांचे रक्षण आणि पर्यावरण संवेदनशील राखणाऱ्या सणाचा संदेश देणारी परंपरा या ठिकाणी सुरू झाली. मंदिरात, मांडावर दर्शन घेऊन हुडय़ाभोवती भाविकांनी गर्दी केली होती. वाजतगाजत तरंग काठीसह पालखीमधून श्रीदेवीचे आगमन झाले.
अवसारी संचारानी मांडावरील पूजा आटोपल्यावर हुडय़ावर चढण्याच्या परंपरेला सुरुवात केली.
१०५ फूट उंचीच्या हुडय़ावर झटपट एकामागोमाग एक असे तीन संचार चढत होते. उंच हुडय़ावर चढण्याचा हा संचारांचा वर्षांतून एकदाचा प्रसंग विलक्षण आनंद देणारा असतो. हुडय़ावर देव संचाररूपी अवसार झटपट चढत असताना सुमारे शंभर फूट उंचीवर हे अवसार पोहोचल्यावर खालून भाविकांनी अवसारावर दगडफेक सुरू केली.
या भक्तांनी संचारावर मारलेला दगड बसला तर या भक्तांचे भविष्य उजाडते त्याला चांगला लाभ होतो अशी या भक्तांची श्रद्धा आहे. हुडा उत्सवाला नातेवाईक व जवळपासच्या गावचे शेकडो लोक येतात. त्यामुळे शेकडोंची गर्दी होते.
यानिमित्ताने हुडा उत्सव सण म्हणजे जत्रोत्सव असतो. त्यामुळे या उत्सवाला जत्रोत्सवाचे रूप येते. त्यामुळे कुणकेरी, आंबेगाव व कोलगावमध्येही उत्सवाचा आनंद असतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 24, 2014 2:40 am

Web Title: kunkeris huda festival sawantwadi
Next Stories
1 सिंधुदुर्गात निवडणुकीसाठी चौकशी सुरू, गोवा बनावटीच्या मद्यावर नजर!
2 सिंहस्थासाठी केंद्राकडून अद्याप निधी नाही -राज्याचे मुख्य सचिव
3 बदलाचे मतलबी वारे थंडावले!
Just Now!
X