नांदेड जिल्हा परिषदेतील ‘असंस्कृत’ प्रकार

स्थानिक निवडणुकांच्या प्रचारात सुसंस्कृतपणाची भाषा करणाऱ्या काँग्रेसी नेत्यांच्या स्थानिक शिलेदारांनी नांदेड जिल्हा परिषदेत २०१२ ते २०१७ या पाच वर्षांच्या काळात नरहर कुरुंदकर पुरस्कारासाठी राखून ठेवण्यात आलेली पुरस्काराची रक्कम चक्क अन्यत्र उडवून टाकल्याची बाब समोर आली असून, आता केवळ २०१७-१८ सालचा पुरस्कार प्रदान करून हरवलेली सुसंस्कृत वृत्ती जपण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे.

ही माहिती जि.प. अध्यक्ष शांताबाई जवळगावकर यांचे पुत्र माधवराव जवळगावकर यांनीच समोर आणली. विख्यात विचारवंत नरहर कुरुंदकर यांच्या नावाने मराठवाडय़ातील लेखकास दरवर्षी एक पुरस्कार देण्याची योजना नांदेड जि.प.च्या शिक्षण समितीतर्फे मागील सुमारे २५ वर्षांपासून राबविली जाते. त्यासाठी अर्थसंकल्पात दरवर्षी ५० हजार रुपयांची तरतूद करण्यात येते, पण २०१२-१७ या काळातील अध्यक्ष आणि सभापतींनी ही योजना गुंडाळून टाकली, कुरुंदकर आणि सावित्रीबाई फुले यांच्या नावाने असलेला पुरस्कार कोणालाही देण्यात आला नाही. त्यासाठी अर्थसंकल्पात असलेली तरतूद अन्यत्र खर्च करण्यात आली. या प्रकारावर कोणाही सदस्याने कधी प्रश्न विचारला नाही किंवा आक्षेप नोंदविला नाही.

गुरुगौरव पुरस्कारांच्या बाबतीतही अशीच अनास्था दाखविण्यात आल्यानंतर २०१७-१८ हे आíथक वर्ष अखेरच्या तिमाहीत आल्यानंतर जि.प. तील कारभाऱ्यांना सर्वच पुरस्कारांचे स्मरण झाले असून, या महिन्याच्या अखेरीस गुरुगौरव तसेच कुरुंदकर व सावित्रीबाई पुरस्कारांचे वितरण करण्याचे ठरत आहे, असे सांगण्यात आले.

जिल्ह्यतील एक लेखिका डॉ. मथू सावंत १९९२-९७ या दरम्यान जि.प. सदस्य होत्या. या काळात त्यांनी कुरुंदकर पुरस्काराची योजना मान्य करवून घेतली.

पहिला पुरस्कार प्रकाशक-लेखक बाबा भांड यांना देण्यात आला. त्यानंतरच्या काळात ना. धों. महानोर, शेषराव मोरे, के. रं. शिरवाडकर, तु. शं. कुळकर्णी, भु. द. वाडीकर, लक्ष्मीकांत तांबोळी, सुधाकर डोईफोडे, नागनाथ कोत्तापल्ले प्रभृतींचा या पुरस्काराने गौरव करण्यात आला. मागील काळात या पुरस्कार योजनेत अनियमितता झाली, पण कधी एका वेळी चौघांना, तर कधी दोघांना पुरस्कार प्रदान करून अर्थसंकल्पीय तरतुदीचा विनियोग करण्यात आला.

मात्र, आता २०१२ ते २०१७ या काळात वितरित न झालेले पुरस्कार रद्द समजून २०१७-१८च्या अर्थसंकल्पातील तरतुदीनुसार एका साहित्यिकाला वरील पुरस्काराने गौरविण्यात येणार असून, याच वेळी सावित्रीबाई फुले पुरस्कारही एका महिलेला प्रदान केला जाणार आहे, असे सांगण्यात आले.

या पाश्र्वभूमीवर मागील ५ वर्षांच्या पुरस्कारांचे काय, असा प्रश्न विचारला असता, त्यासाठी तरतूद नसल्याचा खुलासा अध्यक्ष पुत्र माधवराव जवळगावकर यांनी केला. त्या त्या वर्षांतील रक्कम अन्यत्र खर्च करण्यात आली, असे सांगण्यात येत असून जिल्हा परिषदेतील या प्रकारावर साहित्यिक वर्तुळात तीव्र पडसाद उमटण्याची शक्यता आहे. नांदेड जि.प. आणि नांदेड मनपाचा कारभार चांगल्या पद्धतीने चालावा, अशी काँग्रेस नेते खासदार अशोक चव्हाण यांची भूमिका असली, तरी कारभारी चांगल्या योजना गुंडाळून टाकत आहेत.

धबडग्यातच लेखकांचा सन्मान

नरहर कुरुंदकर व सावित्रीबाई फुले पुरस्कारांच्या मानकऱ्यांची निवड करण्यासंदर्भात जि. प. पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांशी गेल्या आठवडय़ात चर्चा केली. काही नावांवर विचार केल्यानंतर ज्येष्ठ कथालेखक प्राचार्य रा. रं. बोराडे यांचे नाव निश्चित करण्यात आले. सावित्रीबाई फुले पुरस्कारासाठी लेखिका मलिका अमरशेख यांचे नाव विचाराधीन आहे. या ज्येष्ठ लेखकांचा सन्मान स्वतंत्र, सुनियोजित कार्यक्रमात करण्याऐवजी गुरुगौरव पुरस्काराच्या धबडग्यातच उरकण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.