उस्मानाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्रातील प्रयोगशाळेसाठी आवश्यक असलेले सर्व साहित्य दाखल झाले आहे. पुणे आणि औरंगाबाद येथील तज्ज्ञ अभियंत्यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रयोगशाळेच्या प्रत्यक्ष उभारणीला सुरुवात झाली आहे. पुढील दोन दिवसांत हे काम पूर्ण होईल. उपकेंद्रातील सूक्ष्म जीवशास्त्र विभागातील पाच पदव्युत्तर विद्यार्थ्यांचे प्रशिक्षणही पूर्ण झाले आहे. त्यामुळे आगामी आठवड्यापासून करोनाची तपासणी उस्मानाबाद येथे सुरू होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी दिपा मुधोळ-मुंडे यांनी दिली.

भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषदेने उस्मानाबाद येथील प्रयोगशाळा सुरू करण्यासाठी आवश्यक असलेली परवानगी यापूर्वीच दिली आहे. त्यानुसार नाशिक येथील आरोग्य विद्यापीठाकडे प्रयोगशाळा सुरू करण्याबाबत ना हरकत मिळावी यासाठी अधिकृत प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात उत्कृष्टपणे प्रयोगशाळा उभी करणाऱ्या यंत्रणेच्या मार्गदर्शनाखाली हा प्रस्ताव सादर करण्यात आल्याने त्याला तात्काळ अनुमती मिळेल असा उपकेंद्रातील विश्वास सुक्ष्म जीवशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. प्रशांत दीक्षित यांनी व्यक्त केला.

उस्मानाबाद शहरात उभारण्यात आलेली प्रयोगशाळा कार्यान्वित होण्याचा मार्ग आता सुकर झाला आहे. ही प्रयोगशाळा उस्मानाबाद जिल्हा आणि परिसरातील नागरिकांसाठी महत्वपूर्ण ठरणार आहे. शासनाकडून एक रुपयाही निधी न घेता, जिल्ह्यातील दानशूर व्यक्ती आणि संस्थांच्या मदतीने ही प्रयोगशाळा साकारण्यात आली आहे. नॅचरल शुगर, विठ्ठलसाई सहकारी साखर कारखाना, बालाजी अमाईन्स, उस्मानाबाद जनता सहकारी बँक, त्याचबरोबर जिल्ह्यातील विविध बँका, पतसंस्था आदींनी या प्रयोगशाळेसाठी सहकार्य तब्बल ८० लाख रुपयांचा निधी उभा केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने इमारत आणि २० लाख रुपयांची मदत त्यासाठी केली आहे.

डॉ. दीक्षित यांच्या मार्गदर्शनाखाली उपकेंद्रातील सुक्ष्म जीवशास्त्र विभागातील पाच पदव्युत्तर विद्यार्थ्यांनी करोना तपासणीचे प्रशिक्षण पूर्ण केले आहे. औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयातील तपासलेले नमुने पुन्हा तपासणीसाठी येथील प्रयोगशाळेत पाठवले जाणार आहेत. त्याद्वारे उपकेंद्रातील प्रयोगशाळेची एकंदरीत चाचणीच घेतली जाणार आहे. त्यानंतरच प्रत्यक्षात संशयीत रुग्णांच्या नमुन्यांची तपासणी प्रक्रिया हाती घेतली जाणार आहे. तपासणीसाठी पहिल्या टप्प्यात आवश्यक असलेल्या एक हजार किट उपलब्ध झाल्या आहेत. प्रयोगशाळा उभारणीच्या तयारीचा जिल्हाधिकारी दिपा मुधोळ मुंडे स्वतः आढावा घेत आहेत. त्यामुळे कामाला गती आली असल्याचेही डॉ. दीक्षित यांनी सांगितले.

राज्यात केवळ एकदोन ठिकाणीच शासकीय रुग्णालय किंवा वैद्यकीय महाविद्यालयाविना अशी प्रयोगशाळा सुरू केली जात आहे. त्यात उस्मानाबाद जिल्ह्याचा समावेश आहे. पुढील आठवड्यात निश्चित येथून अहवालाची प्रत्यक्ष चाचणी सुरू होईल. शासनाचा निधी खर्च न करता समाजातील दानशूर नागरिक आणि विविध संस्थांचे सहकार्य व प्रयत्नातून ही प्रयोगशाळा पूर्ण झाली आहे. आयसीएमआरच्या निर्देशानुसार सर्व साहित्य या ठिकाणी उभारण्यात आले आहे. उच्च दर्जाची प्रयोगशाळा यानिमित्ताने कायमस्वरूपी अस्तित्वात आली असल्याचे समाधान आहे, असे यावेळी जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी सांगितले.