बोईसर : टाळेबंदीत औद्य्ोगिक क्षेत्रातील कारखाने बंद असल्याने कामगरांवर उपासमारीची वेळ आली आहे. टाळेबंदीत वेतन तर सोडाच कामगरांना फेब्रुवारी महिन्याचा पगारही एका कंपनीने दिला नसल्याने शेकडो कामगार औद्य्ोगिक क्षेत्रातील कामगार उपायुक्त यांच्या कार्यालयाबाहेर जमा झाले होते. मात्र पगार दिला जाईल असे सांगत पोलिसांनी त्यांना घरी जाण्यास सांगितले.

तारापुर औद्य्ोगिक क्षेत्रातील बॉम्बे रेयॉन या कारखान्यातील कामगारांचा पगार थकवाला गेला हा विषय आता नेहमीचाच झाला आहे. प्रत्येक चार महिन्यात येथील कामगार रस्त्यावर उतरून आंदोलने करत असतात असाच प्रकार टाळेबंदीतही झाला आहे. गुरुवारी सकाळी शेकडो कामगार चित्रालय भागात जमा झाले होते. टाळेबंदीत कामगारांना घरी असतानाही पगार देण्याच्या सूचना सरकारने केल्या असतानाही  बॉम्बे रेयॉन कंपनी व्यवस्थापने फेब्रुवारीचा पगार थकविला आहे. त्यामुळे कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. अचानक जमा झालेल्या कामगारांना बोईसर पोलीस एकमेकांपासून दूर थांबण्यास सांगून कामगार उपायुक्तांची भेट घेतली.

पोलिसांच्या मध्यस्थी नंतर कामगार उपायुक्त यांनी कारखाना व्यवस्थापकाला तातडीने कामगारांना पगार देण्याचे दूरध्वनीवरून सांगण्यात आले. त्यानंतर पोलीस सर्व कामगारांना घरी जाण्याच्या सूचना दिल्या.

बॉम्बे रेयॉन कारखान्यात वारंवार कामगारांची पिळवणूक होत असतानाही कामगार विभाग अशा कारखान्यावर कोणत्याही प्रकारची ठोस कारवाई करत नसल्याचा आरोप कामगारांक़डून केला जात आहे. यामुळे टाळेबंदीत कामगारांचा पगार थकविणाऱ्या कारखानदारावर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. याबाबत अधिक माहिती साठी बाँम्बे रेयॉन कारखान्यांचे कारखाना व्यवस्थापक प्रकाश माळी यांच्याशी अनेकदा संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.