अकोला मेडिकल कॉलेजला सर्वाधिक फटका

भारतीय वैद्यक परिषदेने (एमसीआय) विदर्भातील पाच शासकीय व खासगी संवर्गातील वैद्यकीय महाविद्यालयांतील काही विषयांच्या पदव्युत्तर जागांना कात्री लावली आहे. या महाविद्यालयांनी एमसीआयच्या नियमानुसार आवश्यक पायाभूत सुविधा न उभारल्याचा त्यांना फटका बसला आहे.

देशात लोकसंख्येच्या मानाने आजही पदव्युत्तर डॉक्टरांची संख्या कमी आहे. त्यामुळे केंद्र सरकारने शासकीय व खासगी वैद्यकीय महाविद्यालयात या जागा वाढवण्याची घोषणा केली होती. त्यानुसार एमसीआयने विदर्भातील सर्व महाविद्यालयांना वाढीव जागांबाबत प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना केल्या. नागपुरातील मेडिकल, मेयोसह इतरही महाविद्यालयांनी प्रस्ताव दिले. आवश्यक पायाभूत सुविधा व शिक्षकांची पदे भरण्याबाबत एमसीआयने केलेल्या सूचनांकडे वरील पाच महाविद्यालयांनी दुर्लक्ष केले. त्यामुळे पदव्युत्तरचे विविध अभ्यासक्रम सुरू असलेल्या किंवा नवीन प्रस्तावित असलेल्या वेगवेगळ्या विषयांच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांना एमसीआयने कात्री लावली आहे.

त्यात नागपूरचे एन. के. पी.  साळवे वैद्यकीय महाविद्यालय, सेवाग्रामचे जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेज, अमरावतीचे डॉ. पंजाबराव देशमुख मेमोरियल कॉलेज, यवतमाळचे वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोलाचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय या सर्व महाविद्यालयांचा समावेश आहे.

अकोला, यवतमाळला एमआरआय यंत्र नाही

एमसीआयच्या निरीक्षणात अकोलातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमआरआय तपासणी यंत्र नसणे, चार प्राध्यापक, सात सहयोगी प्राध्यापकांसह इतर काही शिक्षकांची पदे रिक्त असणे यासह अनेक त्रुटी आढळल्या. यवतमाळच्या वैद्यकीय महाविद्यालयातही एमआरआय उपकरण नसणे, सहा सहयोगी प्राध्यापकांसह १० सहाय्यक प्राध्यापकांची पदे रिक्त असल्याचे आढळले आहे. या महाविद्यालयांत सर्वाधिक गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबातील विद्यार्थी शिक्षण घेतात, हे विशेष.

पदव्युत्तर जागा वाचवण्याचे प्रयत्न सुरू

एमसीआयने अकोलासह इतर काही वैद्यकीय महाविद्यालयातील पदव्युत्तर अभ्यासक्रमाला  मान्यता नाकारली असली तरी या जागा वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहे. त्याकरिता वैद्यकीय शिक्षण विभागाकडूनही मदत केली जात आहे. अकोलात बऱ्याच प्रकल्पांचे बांधकाम सुरू असून ते उच्च न्यायालयात नमूद तारखेपर्यंत करण्यात येणार असल्याने हे अभ्यासक्रम सुरू होण्याची आशा आहे.  – डॉ. राजेश कार्यकर्ते, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, अकोला.