|| आसाराम लोमटे

अधुनमधून जनजीवन उद्ध्वस्त करणारा महापुराचा फटका, अपरिमित वाळू उपशाने झालेली रस्त्यांची चाळणी आणि दोन्ही किनाऱ्यालगतची जमीन पाण्याने व्यापल्याने ज्वलंत बनलेला स्मशानभूमीचा प्रश्न.. मराठवाडय़ात गोदाकाठावर असलेल्या २७४ गावांना अशा असंख्य प्रश्नांचा सामना करावा लागतोय. गोदाकाठच्या गावांची ही प्रश्नांची अंतहीन मालिका वर्षांनुवष्रे तशीच असून त्यांच्या दीर्घकालीन सोडवणुकीऐवजी एखादी समस्या उद्भवल्यानंतर काही वेळ हातपाय हलविणारी यंत्रणा आणि पुन्हा पहिले पाढे पंचावन्न असेच चित्र गोदाकाठची जनता कायम अनुभवत आहे.

नाशिक जिल्हय़ातील त्र्यंबकेश्वर येथून उगमस्थान असलेली गोदावरी नदी अहमदनगर, औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, नांदेड या जिल्हय़ातून पुढे आंध्र प्रदेशात वाहत जाते. मराठवाडा विभागातून वाहणाऱ्या गोदावरी नदीची अंदाजित लांबी ४९९ किलोमीटर एवढी आहे. मराठवाडय़ातले ५ लोकसभा मतदारसंघ आणि २१ विधानसभा मतदारसंघातून ही नदी वाहते.

गोदाकाठच्या गावांची जमीन ही काळी आणि गाळाची असून अशा मातीची भारवाहक क्षमता कमी असते. परिणामी मराठवाडय़ातल्या गोदाकाठच्या सर्वच गावांमध्ये रस्त्याचा प्रश्न भीषण बनला आहे. गोदावरीच्या पात्रातून अपरिमित होणारा वाळू उपसा, रात्रंदिवस अवजड वाहनांची ये-जा यामुळे गोदाकाठच्या सर्वच रस्त्यांची अक्षरश: चाळणी झाली आहे. कायदा पायदळी तुडवत रात्री उशिरापासून पहाटेपर्यंत अनेक ठिकाणांहून हा वाळू उपसा चालू असतो. अधूनमधून होणाऱ्या किरकोळ कारवायांना न जुमानता वाळूमाफियांची मुजोरी काही केल्या थांबत नाही. अनेकदा गावकऱ्यांनी तक्रारी करूनही ना रस्त्यांचे प्रश्न सुटतात ना अवैध उपशाद्वारे होणारी अवैध वाळू वाहतूक थांबते. गोदाकाठाच्या दोन्ही बाजूंनी असलेल्या साखर कारखान्यांच्या ऊस वाहतुकीचा भारही या रस्त्यांवर असतो. प्रत्यक्षात या रस्त्यांची साधी डागडुजीही होत नाही. बहुसंख्य रस्ते मोठमोठय़ा खड्डय़ांनीच व्यापलेले आहेत.

गोदाकाठच्या दोन्ही बाजूंनी समांतर रस्त्यांची मागणी आता पुढे येत आहे. राष्ट्रीय महामार्गाच्या धर्तीवर माती स्थिरीकरणसारख्या तंत्रज्ञानाद्वारे हे रस्ते केल्यास ते आणखी टिकाऊ होतील आणि गोदावरीच्या दोन्ही बाजूंनी असलेल्या गावातील जनतेची गरसोय दूर होईल, असे या भागातल्या जनतेला वाटते. सध्या अस्तित्वात असलेल्या राज्य व अंतर्गत रस्त्यांना जोडून हा समांतर राष्ट्रीय महामार्ग अस्तित्वात येऊ शकतो.  या संदर्भातील आराखडा सादर करण्याचे प्रयत्नही सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत चालू झाले आहेत.

पूरप्रवण गावांचा स्मशानभूमीचा प्रश्न

मराठवाडय़ात गोदावरी नदीच्या काठावर पूरप्रवण गावांची संख्या २७४ एवढी आहे. गोदावरीला नेहमीच पूर येतो असे नाही पण सध्या पठण ते बाभळीपर्यंत गोदावरीच्या पात्रात बंधारे झाले आहेत. पुरेशा पावसानंतर आणि गोदावरीत पाणी साठल्यानंतर हे बंधारे तुडुंब भरतात. अशा वेळी दोन्ही बाजूंनी असलेल्या गावांच्या स्मशानभूमीचा प्रश्न गंभीर बनतो. गोदाकाठच्या बहुसंख्य गावांना स्मशानभूमीच नाही. त्यामुळे अंत्यविधी करायचा कुठे, असा प्रश्न गावकऱ्यांना भेडसावतो. काही वर्षांपूर्वी परभणी जिल्हय़ातील देऊळगाव दुधाटे येथील गावकऱ्यांनी अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमी नाही म्हणून एक प्रेत थेट जिल्हाधिकारी कार्यालयात आणले, त्या वेळी मोठा तणाव निर्माण झाला होता.  वाहतुकीची व्यवस्था नसल्याने आपत्कालीन रुग्णास अन्यत्र उपचारास घेऊन जाणे असो अथवा शाळकरी विद्यार्थ्यांना पायी दुसऱ्या गावी शिक्षणासाठी ये-जा करणे असो या बाबी गंभीर बनल्या आहेत. अधूनमधून गोदाकाठच्या गावांचे प्रश्न चच्रेला येतात मात्र या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी कोणताही ठोस अथवा कृतिशील कार्यक्रम आखला जात नाही.

तालुकानिहाय पूरप्रवण गावांची संख्या

पठण (१८), अंबड (१६), घनसावंगी (१८), परतूर (४), पूर्णा (१४), पाथरी (२३), गंगाखेड (१४), सोनपेठ (१५), परभणी (३), मानवत (५), पालम (१५), नांदेड शहर (१७), नांदेड ग्रामीण (१३), नायगाव (७), लोहा (५), बिलोली (२), मुदखेड (७), उमरी (६), धर्माबाद (९), गेवराई (३२), माजलगाव (२६), परळी (५) ही गोदावरी नदी काठावरील नाथसागराखालील पूरप्रवण गावे आहेत.