13 December 2018

News Flash

विदर्भाच्या हक्काच्या प्रश्नांसाठी लढणारे किंमतकर

राज्यात २००० पासून निधीची पळवापळव सुरू झाली.

राज्यात २००० पासून निधीची पळवापळव सुरू झाली. विदर्भ किंवा मराठवाडय़ाच्या वाटय़ाचा निधी पश्चिम महाराष्ट्रात वापरण्यात आल्याची उदाहरणे समोर आली होती. या वेळी घटनेतील तरतुदी, ३७१(२) कलमानुसार निधीचे वाटप यावर सखोल अभ्यास करून माजी मंत्री मधुकरराव उर्फ मामा किंमतकर यांनी विदर्भाच्या वाटय़ाच्या हक्काच्या प्रश्नांसाठी यशस्वी लढा दिला होता.

घटनेच्या ३७१ (२) कलमानुसार निधीचे वाटप करण्याचे निर्देश देण्याच्या अधिकारांचा वापर २००१ पासून तत्कालीन राज्यपाल डॉ. पी. सी. अलेक्झांडर यांनी सुरू केला होता. वैधानिक विकास मंडळे स्थापन केल्याने निधीचे समन्यायी वाटप करण्याचे सारे अधिकार राज्यपालांना मिळाले. तेव्हापासून राज्यपालांच्या निर्देशानुसार सिंचन, ऊर्जा अशा नऊ विभागांमध्ये दरवर्षी निधीचे वाटप करण्यात येते. अर्थसंकल्पाबरोबरच राज्यपालांचे निर्देश विधिमंडळाला सादर केले जातात. अर्थसंकल्पात करण्यात येणाऱ्या निधीचे वाटप कसे करायचे याचे सूत्र राज्यपालांकडून निश्चित केले जाते.

राज्यपालांच्या निर्देशानुसार निधीवाटप सुरू झाल्यापासून राज्यातील विभागीय वाद सुरू झाले. पश्चिम महाराष्ट्रातील काही चाणाक्ष नेत्यांनी सरकामध्ये असलेल्या महत्त्वाच्या खात्यांच्या आधारे जास्तीत जास्त निधी कृष्णा खोरे किंवा पश्चिम महाराष्ट्रला कसा मिळेल यावर भर दिला. त्यातूनच निधीची पळवापळव सुरू झाली. तेव्हा मधुकरराव किंमतकर यांनी अभ्यास करून त्रुटी निदर्शनास आणून दिल्या होत्या. काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडीचे सरकार सत्तेत असताना हा वाद वाढला होता. वित्त, सिंचन ही महत्त्वाची खाती राष्ट्रवादीकडे असल्याने काँग्रेसच्या विदर्भातील नेत्यांचा नाईलाज झाला होता. विदर्भाच्या निधीच्या मुद्दय़ावर काँग्रेस, भाजपचे आमदार एकत्र आले होते. तेव्हा या आमदारांना मार्गदर्शन मधुकरराव किंमतकर करीत असत. आमदारांच्या सचिवालय जिमखान्यात होणाऱ्या बैठकांमध्ये किंमतकर यांना निमंत्रित केले जात असे.

विदर्भ वैधानिक विकास मंडळाचे सदस्य म्हणूनही किंमतकर हे विदर्भाच्या विकासाच्या मुद्दय़ावर आग्रही असायचे. कोणत्याही परिस्थितीत विदर्भावर अन्याय होता कामा नये, अशी त्यांची भूमिका असायची. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांनंतर विदर्भासाठी पंतप्रधानांनी पॅकेज जाहीर केले होते. त्याचा विनियोग किंवा विदर्भातील पाण्याचा प्रश्न व सिंचन यावर किंमतकर यांचा दांडगा अभ्यास होता. यामुळेच विदर्भातील सर्वपक्षीय नेते आणि आमदारांना किंमतकर यांचा आधार असायचा. विधानसभेत भाषण करण्यापूर्वी अनेक आमदार किंमतकर यांच्याकडून माहिती घेत असत. विदर्भावर अन्याय होऊ नये वा विदर्भाला हक्काचा निधी मिळावा यासाठी किंमतकर यांचा कायम आग्रह असायचा.

First Published on January 4, 2018 1:49 am

Web Title: lack of development in vidarbha