संतोष मासोळे

जिल्ह्य़ातील करोनाबळींची संख्या ३०० हून अधिक झाली आहे. यातील बहुतांश रुग्णांना वेळेवर कृत्रिमश्वसन यंत्रणा असलेल्या खाटा उपलब्ध न झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईक करीत आहेत. जिल्हा रुग्णालयातील करोना उपचार केंद्रात नियोजनाअभावी कृत्रिमश्वसन यंत्रांची सुविधा असलेल्या अनेक  खाटा रिकाम्या आहेत. खाटा आहेत, परंतु रुग्णांवर उपचारासाठी डॉक्टरच नसल्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.

सध्या शहरासह जिल्ह्य़ात करोना रुग्णांची संख्या झपाटय़ाने वाढत असून बहुतांश रुग्णांना श्वसनाचा त्रास होत आहे. या रुग्णांमध्ये ऑक्सिजनचे प्रमाण खालावत असून त्यांना ऑक्सिजन पुरवठय़ाने सुसज्ज खाटांची, तर काही गंभीर रुग्णांना कृत्रिमश्वसन यंत्रणा असलेल्या खाटांची गरज आहे. शहरातील खासगी करोना केंद्रांमधील अशा सुसज्ज खाटांची संख्या अत्यल्प असल्याने रुग्णांवर उपचार करणे तेथील डॉक्टरांसाठी आव्हानात्मक ठरत आहे.

खासगी रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन पुरवठा आणि कृत्रिम श्वसन यंत्रणा असलेल्या खाटांसाठी १५ ते २० हजार रुपये मोजावे लागत आहेत. शिवाय, औषधांचा खर्च वेगळा, असे तीन ते चार दिवसांचे दोन ते तीन लाख रुपये रुग्णाच्या नातेवाईकांना मोजावे लागत आहेत. गोरगरीब रुग्णांना खासगी रुग्णालयांचा हा खर्च परवडत नसल्याने त्यांना सरकारी रुग्णालयांमध्ये जावे लागते. सरकारी किं वा खासगी रुग्णालयांमध्ये सुसज्ज खाटा नसल्याची माहिती रुग्णांच्या नातेवाईकांना देण्यात येते. यामुळे गंभीर रुग्णांनाही अनेक करोना केंद्रांमध्ये भटकंती करावी लागते. काही रुग्णांना योग्य वेळी उपचार न मिळाल्याने जीव गमवावा लागला आहे. त्यामुळेच जिल्ह्य़ात करोना रुग्णांचे मृत्युप्रमाण वाढत असल्याचा अंदाज आरोग्य विभागातील तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत. खासगी रुग्णालयांत सुसज्ज खाटा नसल्या तरी सरकारी रुग्णालयांमध्ये अशा खाटांची कमतरता नाही. हिरे वैद्यकीय रुग्णालय आणि महापालिकेच्या अखत्यारीतील जिल्हा रुग्णालयात पुरेशा  प्रमाणात अशा खाटा उपलब्ध आहेत. यामुळे या ठिकाणी गंभीररुग्णांवर मोफत उपचार होऊ शकतात. परंतु अशा सर्व सोयीसुविधा उपलब्ध असूनही जिल्हा रुग्णालयातील करोना उपचार केंद्रात बाधितांवर उपचार करणारे डॉक्टरच उपलब्ध नसल्याची माहिती अभ्यागत मंडळाचे सदस्य सचिन शेवतकर यांनी दिली. शिवाय या ठिकाणी सुमारे ६० खाटा उपलब्ध आहेत, परंतु पुरेसे डॉक्टर उपलब्ध नाहीत. मध्यवर्ती ऑक्सिजन वाहिनी टाकण्यात आली आहे, परंतु यंत्रांना नळी लावलेली नाही. कृत्रिम श्वसन यंत्रेही पडून आहेत. त्यांची जोडणी झालेली नाही. काही डॉक्टर सोयीप्रमाणे येथे येतात आणि लगेच जातात, असे धुळ्याच्या अभ्यागत मंडळाचे सदस्य  शेवतकर यांनी सांगितले.

करोनाबाधितांवर औषधोपचारासाठी हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सर्वोपचार रुग्णालयात पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या मार्गदर्शनाखाली १०० खाटांचा अद्ययावत अतिदक्षता कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. या ठिकाणी ६० कृत्रिम श्वसनयंत्रे उपलब्ध आहेत. आतापर्यंत डायलिसिसच्या ५० रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत. लवकरच ऑक्सिजन टँकची योजना कार्यान्वित होईल.

सध्या २०६ खाटांपर्यंत ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात येत आहे. याशिवाय जिल्हा रुग्णालय आणि या रुग्णालयातील महानगरपालिकेचा कक्ष, अजमेरा आयुर्वेद रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, शिरपूर, दोंडाईचा येथे ऑक्सिजन पुरवठा असलेल्या खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे.

ऑक्सिजन आणि कृत्रिम श्वसन यंत्रणेची सुविधा असलेल्या खाटांची कमतरता असल्याची ओरड सुरू आहे, परंतु पालिकेच्या अखत्यारीत असलेल्या जिल्हा रुग्णालयातील करोना केंद्रात अशा खाटा उपलब्ध आहेत. परंतु उपचार करण्यासाठी डॉक्टरच नाहीत. सोयीप्रमाणे डॉक्टर येथे येतात.

– सचिन शेवतकर, सदस्य, अभ्यागत मंडळ, धुळे</p>

धुळे जिल्हा रुग्णालयातील कोविड उपचार कें द्रात महापालिका आणि हिरे वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्रत्येकी एका वैद्यकीय अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आली आहे. तसेच त्या ठिकाणी २४ तास सेवा देण्यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशनच्या धुळे शाखेकडून शहरातील काही डॉक्टरांचे आवर्तन पद्धतीने सहा सहा तासांचे सत्र लावण्यात आले आहे. असे एकूण ५० डॉक्टर या ठिकाणी सेवा बजावत आहेत. वैद्यकीय महाविद्यालयातून संदर्भित केलेल्या रुग्णांना या ठिकाणी ठेवण्यात येत आहे.

– डॉ. महेश मोरे, आरोग्य अधिकारी, महापालिका

धुळे जिल्हा रुग्णालयातील करोना कें द्रात डॉक्टरांची कमतरता भासत असल्याची तक्रार आमच्यापर्यंतही आली आहे. या ठिकाणी शहरातील खासगी डॉक्टरांना मानधन तत्त्वावर नेमणूक करण्याचा आमचा विचार आहे. याबाबत आयुक्तांशी चर्चा करणार आहोत. शहरातील जे काही नामवंत डॉक्टर आहेत; त्यांच्याशीही लवकरच चर्चा करणार आहोत.

– चंद्रकांत सोनार, महापौर, महानगर पालिका