हर्षद कशाळकर

करोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी सर्व प्रयत्न सुरू असले तरी रायगड जिल्ह्य़ात आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची वानवा तर आहेच, पण व्हेंटिलेटर्सची कमतरताही आहे.

शासकीय रुग्णालयांमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांची निम्म्याहून अधिक पदे रिक्त आहेत. त्याहून चिंतेची बाब म्हणजे शासकीय रुग्णालयात करोना बाधित रुग्णांना कृत्रिम श्वाच्छोस्वासावर ठेवण्याची वेळ आली तर केवळ आठ व्हेंटिलेटर्सच आहेत.

रायगड जिल्ह्य़ात पनवेल वगळता इतरत्र करोना बाधित रुग्ण अद्याप तरी आढळलेले नाहीत. कामोठे येथील एक रुग्ण पुर्ण बरा झाल्याने त्याला घरी सोडण्यात आले आहे, तर दुसऱ्या रुग्णावर मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती स्थिर आहे. मात्र जिल्ह्य़ातील करोना बाधितांची संख्या वाढली, तर आरोग्य यंत्रणांवरचा ताण वाढणार आहे.

अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची वर्ग-१ एकची १९ पदे मंजूर करण्यात आली आहेत. यापैकी केवळ तीन पदे भरली आहेत. त्यापैकी एक डॉक्टर गैरहजर आहे. म्हणजेच तज्ज्ञ डॉक्टरांची १७ पद सध्या रिक्त आहेत. तर वर्ग-२ साठी वैद्यकीय अधिकाऱ्यांची ३० पदे मंजूर आहेत. त्यातील २१ पदे भरण्यात आली आहेत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे बालरोग तज्ज्ञ, क्ष किरण तज्ज्ञ, भिषक (फिजीशिअन), क्षयरोग तज्ज्ञ, चर्मरोग, भुलतज्ज्ञ, शस्त्रक्रियातज्ज्ञ, शरीरविकारतज्ज्ञ, नेत्रशल्य चिकीत्सक, दंतचिकीत्सक रुग्णालयात उपलब्ध नाहीत. त्यामुळे जिल्ह्य़ात करोनाचा प्रादुर्भाव वाढला तर आरोग्य यंत्रणाच कोलमडण्याची शक्यता आहे.

दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे जिल्ह्य़ातील शासकीय रुग्णालयात केवळ ८ व्हेंटिलेटर्स उपलब्ध आहेत. त्यातील किती चालू आहेत, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. करोनाची तीव्र लक्षणे असणाऱ्या रुग्णांना कृत्रिम श्वासोच्छवासावर ठेवावे लागते. अशावेळी उपचारात व्हेंटिलेटर्स महत्त्वाची भुमिका बजावतात. मात्र सध्या शासकीय रुग्णालयात या जीवन रक्षक प्रणालीचा अभाव आहे.

जिल्ह्य़ातील खाजगी रुग्णांलयाकडे ५२ व्हेंटिलेटर्स आहेत. मात्र आपत्कालिन परिस्थितीत ते उपलब्ध होतील की नाही याबाबतही साशंकता आहे. ही बाब लक्षात घेऊन जिल्हा रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांची रिक्त पदे तातडीने भरली जावीत. तसेच शासकीय रुग्णालयांमध्ये व्हेंटिलेटर्सची संख्या वाढवीवी, अशी मागणी केली जात आहे.

जिल्हा रुग्णालयातील रिक्त पदे भरण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा सुरू आहे.  व्हेंटीलेटर खरेदीची प्रक्रीया सुरू झाली आहे. लवकरच ते उपलब्ध होतील.

डॉ. प्रमोद गवई, जिल्हा शल्य चिकीत्सक

खाजगी रुग्णालयांच्या वैद्यकीय प्रमुखांची आम्ही एक बैठक घेतली. गरज पडल्यास त्यांच्याकडे व्हेंटिलेटर उपलब्ध करून देण्याच्या सुचना करण्यात आल्या. त्यांनी तशी तयारीही दर्शवली आहे.

निधी चौधरी, जिल्हाधिकारी रायगड