एसटी महामंडळाच्या दुर्लक्षामुळे प्रवाशांचे हाल

विजय राऊत, कासा

जव्हार आणि मोखाडा या तालुक्यांतील प्रवाशांच्या सोयीसाठी एसटी महामंडळाचे एकमेव आगार जव्हार येथे आहे. मात्र या आगारात प्रवाशांना पिण्यासाठी पाणी मिळत नसल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. प्रवाशांच्या सोयीसाठी आगारात पिण्याची टाकी बांधली असली तरी तेथील नळाला मात्र पाणी येत नसल्याचे चित्र आहे.

जव्हारच्या एसटी आगारातून नाशिक, पालघर, ठाणे, भिवंडी, कल्याण, जव्हार, वाडा, मोखाडा, विक्रमगड येथे जाण्यासाठी बस सुटतात. या दोन तालुक्यांसाठी एकमेव आगार असल्याने येथे नेहमीच प्रवाशांची गर्दी असते. या आगारात पिण्याच्या पाण्याची टाकी आहे. मात्र वेळेत पाणी व्यवस्था होत नसल्याने या टाकीत अनेकदा पाणी नसते. त्याशिवाय जुनाट झालेली ही टाकी गळकी असून पाणीही तिथे राहात नाही. या टाकीच्या मागील बाजूस असलेला स्लॅब पडला आहे. त्यामुळे टाकीत कचरा पडून पाणी खराब होते. या पाण्याला कधी कधी दुर्गंधी येत असल्याची तक्रार प्रवाशांनी केली आहे. या टाकीची वेळोवेळी साफसफाई केली जात नसल्याचेही प्रवाशांनी सांगितले.

आगार व्यवस्थापकाच्या दुर्लक्षामुळे प्रवाशांचे पिण्याच्या पाण्यासाठी हाल झाले आहेत. जव्हार-मोखाडा या आदिवासी तालुक्यांत एसटी प्रवासाशिवाय अन्य कुठलेही प्रवाशाचे साधन नाही. त्यामुळे जव्हारच्या या बस आगारात प्रवाशांची नेहमीच गर्दी असते. मात्र पाणीच मिळत नसल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. या टाकीत कधी कधी टँकरने पाणी टाकले जाते, मात्र हे पाणी काही तासांतच संपून जाते, असे प्रवाशांनी सांगितले.

जव्हारच्या बस आगारात प्रवाशांना पिण्यासाठी पाणी नाही. प्रवासी चार ते पाच तास बसची वाट पाहत आगारात असतात. पण त्यांना पिण्यासाठी पाणी मिळत नाही. एसटी महामंडळाला सांगूनही पिण्यासाठी पाणी उपलब्ध होत नाही.

-आण्णासाहेबर जाधव, प्रवासी

काही दिवसांतच पाण्याच्या टाकीची दुरुस्ती करणार आहोत. तोपर्यंत टँकरने या टाकीत पाणी टाकले जाणार आहे.

-सरिता पाटील, आगार व्यवस्थापक