विद्युतदाहिनीच्या कमतरता; केवळ एप्रिल महिन्यात १९२ रुग्णांचा मृत्यू

भाईंदर : मीरा-भाईंदर शहरात करोना आजाराच्या वाढत्या प्रकोपामुळे भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. केवळ एप्रिल महिन्यात १९२ हून अधिक करोनाबाधितांचा मृत्यू झाल्यामुळे स्मशानभूमीत अंत्यविधीकरिता रांगा लागत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे पालिका प्रशासनाकडे विद्युतदाहिनीची कमतरता असल्यामुळे नाईलाजाने नागरिकांना अंत्यसंस्कार करण्याकरितादेखील प्रतीक्षा करावी लागत आहे.

मीरा-भाईंदर शहरात गेल्या दीड महिन्यापासून करोना विषाणूने हाहाकार केला आहे. फेब्रुवारीअखेरीस ५० च्या गतीने वाढत असलेली रुग्ण संख्या आता ५०० च्या गतीने वाढू लागल्यामुळे शहरातील आरोग्य व्यवस्थेवर मोठा ताण पडला आहे. शिवाय शासकीय व खाजगी रुग्णालय पूर्ण भरली असल्यामुळे यांचा परिणाम इतर रुग्णांच्या जिवावर होत आहे. गुरुवारी समोर आलेल्या करोना अहवालानुसार एकूण ४४३ नव्या करोनाबाधितांची नोंद करण्यात आली असून एकूण करोना संसर्ग झालेला आकडा ४३  हजार ७० वर जाऊन पोहचला आहे. तर ९ रुग्णांचा बळी गेल्यामुळे एकूण बळीचा आकडा १ हजार १९ वर जाऊन पोहचला आहे. धक्कादायक बाब म्हणजे केवळ एप्रिल महिन्यात १९२हून अधिक रुग्ण हे केवळ करोना संसर्ग झाल्यामुळे दगावले आहेत. त्यामुळे सध्या शहरातील स्मशानभूमीत अंत्यविधीकरिता मोठी रांग लागली असल्याचे चित्र दिसून येत आहे.

मीरा-भाईंदर शहरात एकूण १६ स्मशानभूमी असून यात केवळ चार स्मशानभूमींमध्ये पालिकेकडून विद्युतदाहिनीची निर्मिती करण्यात आली आहे. या विद्युतदाहिन्या मीरा रोड, काशिमीरा, भाईंदर पश्विम आणि बंदरवाडी परिसरात आहेत. सध्या करोना आजाराचा वाढता प्रादुर्भाव रोखण्याकरिता पालिका प्रशासनाकडून अंत्यविधीकरिता नियम आखण्यात आले असून अंत्यविधी केवळ विद्युतदाहिनीमार्फत करण्यात येत आहे. मात्र यामध्ये देखील वेगवेगळे अळथळे निर्माण होत आहेत. विद्युतदाहिनीच्या कमतरतेमुळे अंत्यविधीकरिता देखील प्रतीक्षा करावी लागत असल्याने मृतकाच्या कुटुंबीयांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

प्रशासनावर गंभीर आरोप

मीरा-भाईंदर शहरात वाढत्या करोनाबाधित मृत्युमुळे सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीत मरण पावलेल्या रुग्णांवर चार तासांच्या आत अंत्यविधी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र, शहरातील स्मशानभूमीत उपलब्ध असलेल्या चारही विद्युतदाहिन्या सतत व्यस्त असल्याने नव्या रुग्णावर अंत्यसंस्कार करण्याकरिता प्रतीक्षा करावी लागत आहे. तसेच शहरातील विद्युत दाहिन्यात वाढ करून त्या सुरळीत सुरू ठेवण्याची मागणी केल्या काही वर्षांपासून होत असताना देखील प्रशासनाने याकडे कानाडोळा केल्याने ही परिस्थिती पाहावी लागत असल्याचे आरोप युवक काँग्रेस जिल्हा अध्यक्ष दीप काकडेकडून करण्यात आले आहे.

ल्ल करोना अहवालानुसार एकूण ४४३ नव्या करोनाबाधितांची नोंद असून एकूण करोना संसर्ग झालेला आकडा ४३  हजार ७० वर जाऊन पोहचला आहे. तर ९ रुग्णांचा बळी गेल्यामुळे एकूण बळीचा आकडा १ हजार १९ वर जाऊन पोहचला आहे.

 

 

सध्या आपल्या चारीही विद्युतदाहिन्या सतत कार्यरत आहेत. तसेच या विद्युतदाहिन्यांत काहीही बिघाड होऊ नये किंवा कोणत्याही गोष्टीची कमतरता भासू नये म्हणून आम्ही गांभीर्याने याकडे  लक्ष देऊन आहोत.

– दीपक खांबित, कार्यकारी अभियंता (विद्युत विभाग )