आदिवासी विकास विभागाने वाऱ्यावर सोडल्याने येथील शासकीय एकलव्य पब्लिक स्कुलच्या विद्यार्थ्यांना अतोनात हाल सहन करावे लागत आहेत. मुळातच इमारत नसल्याने दुसऱ्या आश्रमशाळेत हलविण्यात आलेले या शाळेतील विद्यार्थी वर्षभरापासून अंधारात आहेत. पाण्याचा मोठय़ा प्रमाणावर वापर असलेल्या भाज्या जेवणात दिल्या जात असून  विद्यार्थी सर्वच शासकीय सुविधांपासून वचीत आहेत. शाळेतील मुलींना उघडय़ावर शौचास आणि आंघोळीला जावे लागत असल्याने टवाळखोरांकडून त्यांना त्रास देण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळेच या शाळेतील विद्यार्थ्यांंनी आता आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.
केंद्राने आदिवासी विद्यार्थ्यांंसाठी नवोदय विद्यालयांच्या धर्तीवर ‘मॉडेल स्कुल’ म्हणून एकलव्य पब्लिक स्कुल सुरू केले. आदिवासी हुषार विद्यार्थ्यांना शैक्षणीक उपक्रमाव्दारे चालना मिळावी या अनुषंगाने स्पर्धा परीक्षाद्वारे या आश्रमशाळेत प्रवेश दिला जातो. परंतु मॉडेल स्कुल म्हणून मिरवणाऱ्या या आश्रमशाळेत प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे नंदुरबारमध्ये दर्जाचा बोजवारा उडाला आहे. नंदुरबारच्या शासकीय एकलव्य पब्लिक स्कुलच्या विद्यार्थ्यांंना अतोनात हाल सहन करावे लागत आहेत. मुळातच या शाळेसाठी केंद्राकडून भरीव अनुदान येऊनही विद्यार्थ्यांंना आश्रमशाळेसाठी स्वत:ची इमारत नाही. त्यामुळेच या एकलव्य पब्लिक स्कुलच्या विद्यार्थ्यांंना नवापूर तालुक्यातील निजामपूर येथील शासकीय आश्रमशाळेच्या आवारातील एका इमारतीत हलविण्यात आले आहे. या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या खोल्यांमध्ये वर्षभरापासून वीज नसल्याने अंधारात राहावे लागत आहे. इमारतीत पाणी, शौचालय, स्नानगृह नसल्याने विद्यार्थ्यांंना शाळेलगत असलेल्या नंदीवर जावे लागते. आंघोळीसाठी नदीवर गेल्यानंतर काही टवाळखोरही येथे जमा होत असल्याने त्यांच्याकडून विद्यार्थिनींना त्रास दिला जातो. आश्रमशाळेतील सुमारे १०० मुलांना शिकवण्यासाठी अवघा एकच शिक्षक असून तोही प्रतिनियुक्तीवर आला आहे. त्यामुळेच केंद्रीय आश्रमशाळेमध्ये एकही शिक्षक नसल्याचा भयावह प्रकार समोर आला आहे. मुळातच हुषार आदिवासी विद्यार्थ्यांंना उन्नतीकडे नेण्याऐवजी अधोगतीकडे नेण्याचे काम या मॉडेल स्कुलमधून सुरु आहे. त्यातच विद्यार्थ्यांंना निकृष्ठ दर्जाचे जेवण दिले जात आहे. ठेकेदारांला भोजन ठेका दिला असताना बाजूच्या शासकीय आश्रमशाळेतील मुलांना मिळणाऱ्या जेवणातील पाणीच या विद्यार्थ्यांंना वाढण्यात येते. अधिकारी, कर्मचारी आणि ठेकेदार संगनमताने विद्यार्थ्यांंच्या जेवणाचा पैसा हडप करत असल्याची चर्चा आहे. मुलांना मिळणाऱ्या स्वेटर, चादरी, शूज, मोजे आणि इतर शैक्षणिक साहित्य अद्यापही पोहचलेले नाही. त्यामुळेच कंटाळलेल्या मुलांनी आपल्या पालकांशी संपर्क साधत बुधवारी लोकसंघर्ष मोर्चाच्या अध्यक्षा प्रतिभा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली अन्नत्याग आंदोलन केले. बुधवारी रात्री १२ वाजेपर्यत मुलांनी जेवण न करता आपल्या व्यथा मांडल्या. यावेळी या ठिकाणी दाखल झालेल्या नंदुरबार एकात्मीक आदिवासी प्रकल्प अधिकारी एम. एम. शिंदे यांना घेराव घालत या मुलांनी जाब विचारला.