४०८ वैद्यकीय पदे रिक्त; जिल्हा रुग्णालयात १२९ पदांच्या भरतीची गरज

सिंधुदुर्ग जिल्ह्यत माकडताप, लेप्टो, डेंग्यूसारख्या आजारांनी डोके वर काढले असताना जिल्ह्यात शासकीय आरोग्य यंत्रणा कोमात आहे. त्यामुळे रुग्णांच्या जीवनाशी खेळ खेळला जात असल्याने सर्व सामान्य जनता नाराज आहे. लोककल्याणकारी राज्य म्हणून महाराष्ट्राची ओळख होती, पण जिल्हय़ातील रुग्णांना गोवा, कोल्हापूर, बेळगाव व मुंबईच्या रुग्णालयावर भरोसा ठेवावा लागत आहे. जिल्हय़ात ४०८ वैद्यकीय पदे रिक्त असून एकटय़ा जिल्हा रुग्णालयात १२९ पदांच्या भरतीची गरज निर्माण झाली आहे.

जिल्हय़ातील आरोग्ययंत्रणा कोमात आहे, त्याला आघाडी सरकारच्या काळापासून सुरुवात झाली. त्या काळी अभिनव फाऊंडेशनने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती, तेव्हा आरोग्य खात्याने सावंतवाडी, कणकवली या उपजिल्हा रुग्णालयासह तरळे येथे ट्रॉमा केअर सेंटर उभारण्याची हमी न्यायालयात दिली होती पण गेली दहा वर्षे न्यायालयाच्या हमीलाही शासनाने पाने पुसली आहेत.

जिल्हय़ात डॉक्टरांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करून मागणी केली पण आरोग्य यंत्रणा कुचकामी ठरली. त्यानंतर राज्यात परिवर्तन घडले. भाजप-शिवसेनेची सत्ता आली. राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत झाले. सिंधुदुर्गाचे सुपुत्र असल्याने आरोग्य यंत्रणा सुधारेत, अशी अपेक्षा होती पण यंत्रणा कुचकामी ठरली आहे. केंद्रात वाणिज्यमंत्री सुरेश प्रभू, राज्यमंत्री व पालकमंत्री दीपक केसरकर, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण हे मंत्री आहेत पण जिल्हय़ाची आरोग्ययंत्रणा सक्षम करण्यासाठी यांची मानसिकता उपयोगी ठरत नाही. आरोग्याच्या प्रश्नावर व्हीजन ठेवून सत्ताधारी काम करीत नाहीत, त्यामुळे रुग्णांना गोवा, कोल्हापूर, बेळगाव, मुंबई येथील रुग्णालयांवर अवलंबून राहावे लागत आहे.

सिंधुदुर्ग डोंगराळ व दऱ्याखोऱ्यांचा जिल्हा आहे. दळणवळणाची साधने पाहता खडतर प्रवास करावा लागतो. स्त्री रोगतज्ज्ञ नसल्याने वैभववाडीसारख्या भागातून गर्भवती महिलांना सावंतवाडीत धाव घेण्याचे दुर्दैवी प्रकार यापूर्वी घडले आहेत.

जिल्ह्यत माकडताप, लेप्टो, डेंग्यूसारखे रुग्ण आढळतात. तसेच साधा ताप आला व अपघात घडला, भाजलेल्या रुग्णांना देखील गोवा सरकारच्या मेडिकल कॉलेजच्या बांबुळी रुग्णालयावर अवलंबून राहावे लागते. तसेच गोवा राज्यातील अन्य खासगी रुग्णालयात धाव घ्यावी लागते. गोवा सरकारने परप्रांतीय रुग्णांना फी आकारण्याचा निर्णय घेतल्यावर सत्ताधारी भाजप व शिवसेनेच्या नेत्यांनी, मंत्र्यांनी गोवा मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्याकडे धाव घेऊन मोफत उपचाराची मागणी केली पण हेच राजकीय नेते मंत्री महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याकडे एकत्रित जाऊन आरोग्ययंत्रणा सक्षम करण्याची मागणी करू शकले नाहीत, हे दुर्दैव लपून राहिले नाही. आरोग्याच्या बाबतही सत्ताधारी गोवा राज्याच्या आरोग्ययंत्रणेच्या भरवशावर श्रेय लाटण्याचा खटाटोप करीत आहेत. त्यामुळे सत्ताधारी शिवसेना-भाजपची जनताप्रिय धोरण जनतेसमोर आले. गोवा राज्यावर अवलंबून राहण्यापेक्षा आरोग्ययंत्रणा सक्षम करण्यासाठी सत्ताधारी एकत्रित आले नाहीत, हे दुर्दैव सर्वासमोर आले. सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालय, कणकवली व सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयासह जिल्हय़ात ११८२ रुग्णालयीन मंजूर पदांपैकी ७७४ पदे भरण्यात आली आहेत. मात्र ४०८ पदे रिक्त आहेत. वैद्यकीय अधिकाऱ्यांची ७० पदे रिक्त आहेत.

कणकवली, सावंतवाडी, शिरोडा, उपजिल्हा रुग्णालयात ९५ वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मंजूर पदांपैकी ४९ पदे भरली असून ४६ पदे रिक्त आहेत. तज्ज्ञांच्या १२५ मंजूर पदांपैकी ६६ पदे भरली तर ५९ पदे रिक्त आहेत. अधिपरिचारिका (नर्सिग) २८३ पदांपैकी २२४ पदे भरलेली असून ५१ पदे रिक्त आहेत. लिपिक संवर्गातील ६४ पदांपैकी ३३ पदे भरण्यात आली असून ३१ पदे रिक्त आहेत. ‘ड’ संवर्गातील २३४ मंजूर पदांपैकी १५६ पदे भरलेली असून ७८ पदे रिक्त आहेत. जिल्हा रुग्णालय ओरोस येथे अतिरिक्त जिल्हा राज्य चिकित्सक, निवासी वैद्यकीय अधिकारी, बालरोगतज्ज्ञ, मनोविकृतीतज्ज्ञ यासह वैद्यकीय अधिकाऱ्यांची २३ पदे रिक्त आहेत. जिल्हा रुग्णालयातील १२९ रिक्त पदांत तांत्रिक कर्मचारी २२ पदे, नर्सिग ३७, लिपिक १६ तर शिपाई ३१ पदे रिक्त आहेत.

ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्राची यापेक्षा अत्यंत बिकट परिस्थिती आहे. जिल्हय़ात अपवाद वगळता अनेक रुग्णालयात प्राथमिक उपचार करून गोवा, कोल्हापूर किंवा बेळगावमध्ये रुग्णांना पाठविण्यात धन्यता मानली जाते. सिंधुदुर्गाची आरोग्ययंत्रणा सक्षम करण्यासाठी सरकार पातळीवर कोणतेही प्रयत्न करण्यात येत नाहीत. त्याहीपेक्षा आरोग्य मंत्रालयाकडे पुरेसा निधीच नसल्याने जिल्हय़ातील यंत्रणा कोमात असल्याचे चित्र आहे. आरोग्याच्या प्रश्नावर सत्ताधारी एकमेकांवर टीका करण्यात धन्यता मानत आहेत. पर्यावरणातील बदलामुळे सध्या तापाच्या रुग्णांत वाढ झाली आहे. वैद्यकीय सुविधेअभावी गोवा बांबुळी रुग्णालयात रुग्णांना पाठविले जात आहे. रुग्णांना जीवघेणा ताप येऊनही नातेवाइकांना धावपळ करण्याशिवाय पर्याय नाही.