विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहाबाहेर जाण्याची भीती; अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस, मुदत वाढवावी अशी मागणी

निखिल मेस्त्री, लोकसत्ता

पालघर : पालघर जिल्ह्यातील ग्रामीण तालुक्यांमध्ये इंटरनेट सेवा व्यवस्थित सुरू नसल्याने  बारावी उत्तीर्ण झालेल्या व प्रथम वर्ष अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश प्रकियेत अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहाबाहेर जाण्याची भीती निर्माण झाली आहे.

परीक्षा मंडळातर्फे बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाल्याने उत्तीर्ण विद्यार्थी प्रथम वर्ष अभ्यासक्रमासाठी ऑनलाइन प्रवेशपूर्व अर्ज भरण्याची धडपड करीत आहेत. ही मुदत आज संपत आहे. असे असले तरी जिल्ह्यातील मोखाडा,जव्हार, तलासरी, विक्रमगड अशा ग्रामीण भागांत इंटरनेटसह ऑनलाइन सुविधा उपलब्ध नसल्यामुळे विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये अनेक अडथळे निर्माण होत आहेत. मुदतीत हे अर्ज भरले गेले नाहीत तर या सुविधेअभावी काही विद्यार्थी प्रथम वर्ष प्रवेशापासून दूर राहतील अशी भीती व्यक्त होत आहे. प्रवेश प्रक्रियेची ही मुदत वाढवून द्यावी अशी मागणी होत आहे.

विद्यार्थ्यांनी प्रवेशपूर्व प्रक्रिया अवलंबताना त्यांच्या जवळ स्वत:चा ईमेल आयडी व मोबाइल क्रमांक असणे अनिवार्य आहे. मात्र ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांकडे मोबाइल नसल्याने प्रवेशपूर्व अर्ज भरण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. ग्रामीणबहुल भागात इंटरनेट व ऑनलाइन सुविधा पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांना प्रवेशपूर्व अर्ज भरण्यासाठी आपले सरकार सेवा केंद्रे किंवा खासगी इंटरनेट सुविधा केंद्रांमध्ये जावे लागते. आपले सरकार सेवा केंद्रांमध्ये इंटरनेट सुविधा उपलब्ध होत नाहीत तर करोनाच्या पार्श्वभूमीवर खाजगी केंद्रे बंद आहेत. परिणामी हे दोन्ही पर्याय विद्यार्थ्यांसाठी बंद आहेत.असे असताना प्रवेशपूर्व अर्ज भरायचा कोठून असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडत आहे. तर काही विद्यार्थी मित्र-मैत्रिणींकडून अर्ज भरून घेताना दिसत आहेत. महाविद्यालये स्वत: अशा वंचित विद्यार्थ्यांना संपर्कात आणण्यासाठी प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली विशेष मदत कक्ष स्थापन केले असल्याचे समजते. प्रथम वर्ष अर्ज स्वीकारणाऱ्या महाविद्यालयांकडून अशा विद्यार्थ्यांना मदत कक्षमार्फत प्रवेश घेण्यासाठी मदत केली जात असली तरी शंभर टक्के विद्यार्थ्यांपर्यंत महाविद्यालय पोचण्याची शक्यता नाही. दहावीचाही निकाल जाहीर झाल्याने महाविद्यालयाच्या प्रवेश प्रक्रियेसाठी त्यांचीही लगबग सुरू होणार आहे. मात्र ग्रामीण भागात त्यासाठी अशा सोयीसुविधा उपलब्ध नसल्यामुळे त्यांचीही परवड होणार आहे.

ऑफलाइनमध्येही अडचणी

ऑनलाइनऐवजी ऑफलाईा अर्ज भरण्याची मुभा विद्यापीठामार्फत देण्यात आली असली तरी ग्रामीण भाग भौगोलिकदृष्टय़ा मोठा आहे. या ठिकाणी सार्वजनिक व खाजगी वाहतूक व्यवस्था करोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असल्याने विद्यार्थ्यांना या वाहतूक सुविधा उपलब्ध होत नाहीत. यामुळे ऑफलाइन पर्यायापासूनही हे विद्यार्थी वंचितच आहेत.

जागा वाढविण्याची मागणी

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना काही अभ्यासक्रम जे ग्रामीण भागात उपलब्ध नाहीत मात्र शहरी भागातील महाविद्यालयांमध्ये उपलब्ध आहेत अशा विविध अभ्यासक्रमांच्या ठिकाणी विद्यार्थ्यांची वाढती संख्या लक्षात घेता विद्यापीठाने या आवश्यक असलेल्या अभ्यासक्रमांच्या विद्यार्थी जागा वाढवून द्याव्यात, जेणेकरून एकही विद्यार्थी आयुष्यात उपक्रमास मुकणार नाही अशीही मागणी होत आहे.

अशा विद्यार्थ्यांच्या अडचणी मी समजू शकतो. विद्यार्थ्यांना सांभाळून घेणे हे आमचे कर्तव्य आहे. मुदत वाढवून देणे शक्य असल्यास मी सहकारी, अधिकारी, प्राचार्य यांच्याशी या विषयावर सविस्तर बोलतो.

– डॉ. सुहास पेडणेकर, कुलगुरू, मुंबई विद्यापीठ

इंटरनेट व ऑनलाइन सुविधांपासून वंचित राहिलेल्या ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी जिल्हा प्रशासनाशी चर्चा करून सुविधा नसलेल्या तालुक्यांमध्ये मदत व मार्गदर्शन कक्ष उभे करण्याच्या सूचना देतो. विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहाबाहेर जाणार नाही याची खात्री आहे. 

– सुनील भुसार, आमदार

ग्रामीण भागातील अनेक अडचणींमुळे प्रवेश प्रक्रियेपासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेश प्रक्रियेची मुदत वाढवून देणे अपेक्षित आहे, त्याचबरोबरीने अभ्यासक्रमाच्या विद्यार्थी जागा वाढवून देणेही अपेक्षित आहे.

– किरण सावे, प्राचार्य,सोनोपंत दांडेकर महाविद्यालय