News Flash

माघ वारीत प्रशासनाचा भोंगळ कारभार

दर्शन रांगेतील डीपी जळाला, शहरात घाणीचे साम्राज्य

चंद्रभागा घाटाजवळ वीज वितरण कंपनीच्या डीपीने  पेट घेतला.

दर्शन रांगेतील डीपी जळाला, शहरात घाणीचे साम्राज्य

माघ वारीसाठी आलेल्या लाखो भाविकांना प्रशासनाच्या गलथान कारभाराचा फटका बसला आहे. ऐन एकादशीच्या मुख्य दिवशी विठ्ठलाच्या पदस्पर्श दर्शन रांगेजवळील वीज वितरण कंपनीच्या विद्युत रोहित्राला (डीपी ) आग लागली. त्यामुळे वारकरी गोंधळून गेले. मात्र वेळीच स्थानिकांनी आग विझवल्याने मोठा अनर्थ टळला.  शहरातील अनेक ठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरले असून वारी काळातील स्वच्छता नावालाही उरलेली नाही.  वारीतील या प्रशासनाच्या चुकीच्या नियोजनाबाबत वरिष्ठ पातळीवर दाखल घ्यावी अशी मागणी आता नागरिकांतून होत आहे.

पंढरपुरात चार वाऱ्यांसाठी राज्यभरातून लाखो भाविक देवाच्या दर्शनासाठी दरवर्षी न चुकता येत असतात. येणाऱ्या भाविकांना सोयी सुविधा देण्यासाठी प्रशासन तयारी करीत असते. आषाढी ,कार्तिकी वारीच्या  नियोजनासाठी पंढरीत, जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त या ठिकाणी बैठका घेऊन नियोजन केले जाते.

मात्र माघ आणि चैत्र वारीसाठी केवळ स्थानिक आणि जिल्हाधिकारी पातळीवर बैठक घेतली जाते. माघ वारीसाठी प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी सर्व विभाग प्रमुखांची बैठक घेतली. यात सर्व विभागांनी समन्वयाने कामे करावी, वीज वितरण विभागाने अखंडित वीज पुरवठा करावा, शहरात स्वच्छतेबाबत पालिकेने विशेष खबरदारी घ्यावी, अशा सूचना संबंधित विभागाला दिल्या.

येथील चंद्रभागा घाटाजवळून श्री विठ्ठलाची पदस्पर्श दर्शन रांग जाते. एकादशीच्या दिवशी रात्री आठच्या दरम्यान या ठिकाणी वीज वितरण कंपनीच्या  विद्युत रोहित्राने  पेट घेतला आणि या परिसरातील वीज गायब झाली. त्यामुळे दर्शन रांगेत उभे असलेले भाविक घाबरून गेले. मात्र स्थानिक रहिवाशांनी परिस्थिती पाहून तातडीने आग विझवण्यास सुरवात केली आणि अग्निशमन दलाला बोलाविण्यात आले. याच वेळी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी तथा प्रांताधिकारी सचिन ढोले घटनास्थळी आले आणि भाविकांना दिलासा देत दर्शन रांग पूर्ववत केली.

तसेच वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना बोलवून तातडीने वीज पुरवठा सुरु करण्यासंबंधी सूचना दिल्या. वास्तविक पाहता कोणत्याही वारीच्या आधी वीज वितरण विभाग आठ दिवस आधी आणि आठ दिवस नंतर शहरात अनेक ठिकाणी वारीची कामे या नावाखाली लोडशेडिंग करते. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतो.

तर दुसरीकडे शहरातील प्रदक्षिणा मार्ग,मंदिर परिसर या ठिकाणच्या स्वच्छतेची जबाबदारी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने उचलली आहे. उर्वरित ठिकाणी पालिकेने स्वच्छता करावयाची आहे. असे असताना शहरातील अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग रविवारी पहावयास मिळाले. तसेच अनेक रस्त्यावर कचरा दिसून आला. एकंदरीत या माघ वारीला प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराचा फटका भाविकांसह नागरिकांना बसला आहे. आता या बाबत वरिष्ठ पातळीवर काय निर्णय घेतले जातात याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 18, 2019 12:05 am

Web Title: lack of management in pandharpur
Next Stories
1 कुंभमेळ्याहून नागपूरला परतणाऱ्या भाविकांच्या बसला अपघात; चार ठार
2 कार्यकर्त्यांबद्दलच्या अविश्वासाने पवारांकडून घरातच उमेदवारी
3 कंगाल पाकिस्तानपुढे शरणागती का?
Just Now!
X