28 February 2021

News Flash

नवीन वीज मीटरची कमतरता

वीज मीटर उपलब्ध होत नसल्याने काही ग्राहक हे सातत्याने महावितरणच्या कार्यालयात विचारणा करण्यासाठी येत आहेत.

(संग्रहित छायाचित्र)

हजारो नवीन वीज जोडणीचे अर्ज प्रलंबित

वसई: मागील काही महिन्यांपासून वसई-विरारच्या महावितरण विभागात नवीन मीटरची कमतरता भासू लागली आहे. नवीन वीज जोडणीसाठी अनेकांनी पैसे भरून अर्ज केले आहेत. परंतु अजूनही वीज मीटरची उपलब्धता होत नसल्याने हजारो अर्ज प्रलंबित राहिले आहेत. महावितरणाकडून नवीन वीज मीटर उपलब्ध होत नसल्याने अनेक जण चोरीच्या मार्गाने वीज मिळवतात तर इतराना खाजगी कंपनीकडून वीज मीटर घ्यावे लागते. त्याचा आर्थिक भुर्दंड ग्राहकांना सहन करावा लागत आहे

वसई-विरार शहराचे झपाट्याने नागरिकरण होऊ लागली आहे. त्यातच नवीन सदनिकांमध्येही वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे नव्याने  वीजजोडण्या घेण्याची मागणीही तितकीच वाढली आहे.यामध्ये  घरगुती,व्यावसायिक, शेतीसाठी लागणाऱ्या वीजमीटरसाठी अर्ज करून मागणी केली आहे. परंतु मागील काही महिन्यांपासून महावितरण विभागात नवीन मीटरचा तुटवडा जाणवू लागला आहे. ज्या ग्राहकांनी नवीन मीटर मिळावे यासाठी अर्ज केले होते त्यांनाही  महावितरणच्या विभागीय कार्यालयात फेऱ्या माराव्या लागत आहेत. मीटर आज- उद्या येतील असे सांगून या ग्राहकांना रिकाम्या परतावे लागत असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

सध्या स्थितीत वसई विभागात  ४ हजार १०३ तर विरार विभागात ३ हजार ५६५ नवीन वीज पुरवठा व वीज मीटरसाठी पैसे भरून अर्ज करण्यात आले आहे. परंतु यातील बहुतांश वीज ग्राहकांना अजूनही नवीन वीज मीटर उपलब्ध झाले नाहीत.

वीज मीटर उपलब्ध होत नसल्याने काही ग्राहक हे सातत्याने महावितरणच्या कार्यालयात विचारणा करण्यासाठी येत आहेत. परंतु महावितरणच्या कार्यालयातच मीटर नसल्याने अनेकांना बाजारातून वीज मीटर खरेदी करून योग्य ती तपासणी करून बसवून घ्या असा सल्ला दिला जात आहे.परंतु बाजारातही सहजासहजी वीज मीटर मिळत नाही. आणि मिळाले तरीही अतिरिक्त पैसे देऊन ते खरेदी करावे लागत आहे. वीज मीटरच्या तुटवड्यामुळे अजूनही वसई-विरार मधील हजारो वीज ग्राहकांना ताटकळत राहावे लागले आहे.

पुन्हा वीजचोरीचे प्रकार वाढण्याची शक्यता

वसई-विरार शहरात पुरेश्या प्रमाणात नवीन वीज मीटर उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे अनेकांना वीज जोडणी मिळाली नाही.त्यामुळे ग्राहकांना विजेविना राहावे लागत आहे. जर वीज मीटर व वीज जोडण्या ग्राहकांना मिळाल्या नाहीत तर नाइलाजाने वीज चोरी करून वीज वापर केला जाण्याची शक्यता नागरिकांनी वर्तविली आहे. यासाठी ग्राहकांना वेळेत वीज मीटर मिळण्याची सुविधा उपलब्ध करावी अशी मागणी करण्यात येत आहे.

कारवाईमुळे वीज ग्राहक संख्या वाढली

महावितरण विभागाच्या वीज चोरी पथकाने मागील काही महिन्यांपासून वीजचोरी करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उचलला होता. कारवाईचा बडगा उचलताच आकडे टाकून, व छुप्या मार्गाने वीजचोरी करणाऱ्यांना मोठा दणका बसला आहे. याच कारवाईमुळे आता नव्याने वीज जोडण्या घेण्याकडेही ग्राहकांचा कल वाढला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 23, 2021 12:27 am

Web Title: lack of new electricity meters akp 94
Next Stories
1 वसईतील ग्राहकाला ८० कोटींचे वीज देयक
2 अखेर घोडबंदर टोलनाका मध्यरात्रीपासून बंद
3 फेब्रुवारीतच वसईकरांना पाणीटंचाईच्या झळा
Just Now!
X