पालघर : करोना आजाराने ग्रस्त गंभीर रुग्णांच्या उपचारासाठी लागणारे रेमडेसिविर लशीची मोठ्या प्रमाणात कमतरता भासत असून रुग्णांच्या नातेवाईकांना ते मिळवण्यासाठी धावपळ करावी लागत आहे. ९०० रुपयांच्या जवळपास किंमत ही लस सध्या काळ्या बाजारात १५०० रुपयांच्रूा दराने विकली जात असून येत्या काही दिवसांत जिल्ह्यात त्याचा मुबलक प्रमाणात साठा उपलब्ध होईल, असे आरोग्य विभाग व औषध विक्रेत्यांकडून सांगण्यात येत आहे.

पालघर जिल्ह्यात सध्या १५०० करोनाबाधित असून सहव्याधी असणारे किंवा वयोवृद्ध रुग्णांना फुफ्फुसाचा संसर्ग वाढल्याचे तपासणीदरम्यान निदर्शनास आले आहे. रेमडेसिविर इंजेक्शनच्या किमती सरकारने ९०० रुपयांपर्यंत निर्धारित केल्या असून करोनाची पहिली लाट संपल्यानंतर या इंजेक्शनचा मुबलक प्रमाणात साठा उपलब्ध होता. त्यामुळे एक्स- रे किंवा हाय रिझोल्युशन सिटीस्कॅनमध्ये फुफ्फुसामध्ये संसर्ग झाल्यास तसेच शरीरातील प्राणवायूची पातळी (सॅचूरेशन) कमी असल्यास या लशीचा वापर होतो.

करोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान सहजगत्या उपलब्ध असणारी ही लस सर्वसाधारण रुग्णांना उपचारादरम्यान दिरंगाई नको किंवा पुढे उपचारादरम्यान संसर्ग नियंत्रणात राहावा म्हणून सर्रास वापरले गेल्याने तिची मागणी वाढल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक यांनी सांगितले. मुळात प्राणवायूची पातळी ८५ टक्क्यांपेक्षा कमी असल्यास शासनाने निर्देशित केल्याप्रमाणे ही लस वापरणे आवश्यक असताना त्याचा सारासार वापर होत असल्याचे निदर्शनास आल्याचे सांगण्यात आले.

जिल्ह्याबाहेर अधिक किमतीत लस

या लशीची मागणी वाढली असताना दुसरीकडे पुरवठा कमी झाल्याने त्याचा लाभ काही औषधविक्रेत्यांनी घेतल्याच्या तक्रारी पुढे आल्या आहेत. लस खासगी रुग्णालयांमध्ये तसेच औषध विक्रेत्यांकडे उपलब्ध नसल्याचे रुग्णाचे नातेवाईक सांगत आहेत. जिल्ह्याबाहेरून काही रुग्ण अधिक किमतीने ही लस आणत असल्याचे सांगण्यात येत आहे.

प्रशासनाकडे पाठपुरावा

रेमडेसिविर लस मुबलक प्रमाणात उपलब्ध व्हावी यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक अन्न व औषध प्रशासनाकडे पाठपुरावा करणार असून या लशीचा पुरेशा प्रमाणात साठा उपलब्ध राहील, असे औषध विक्रेते संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.