‘हेटेरो हेल्थकेअर’च्या इंजेक्शनना मनाई; १४०० रुग्णांकरिता फक्त ७६३ इंजेक्शन उपलब्ध

पालघर :जिल्ह्य़ातील  खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांना रेमडेसिविरचा पुन्हा तुटवडा भासू लागला आहे. हेटेरो हेल्थकेअर  कंपनीने पुरवठा केलेल्या रेमडेसिविर इंजेक्शन वापरण्यास मनाई केल्याने शुक्रवार ते  रविवार या तीन दिवसांत रुग्णालयातील सरासरी १४०० रुग्णांकरिता फक्त ७६३ इंजेक्शन उपलब्ध झाली. इंजेक्शन उपलब्ध नसल्याने इतर रुग्णाचे हाल होत आहेत. दरम्यान जिल्ह्य़ात गेल्या २४ तासांत ११५६ रुग्णवाढ झाली असून जिल्ह्य़ात सध्या १८ हजार ४६४ उपचाराधीन रुग्ण आहेत.

हेटेरो कंपनीने २८ एप्रिल रोजी जिल्ह्य़ात पुरवठा केलेल्या ६५० रेमडेसिविर इंजेक्शनच्या बॅचमध्ये तांत्रिक अडचणी असल्याचे सांगून या उत्पादन बॅचमधील इंजेक्शनचा वापर करण्यास २९ एप्रिल रोजी कंपनीने मनाई केली होती. तरीदेखील आदेश निघण्यापूर्वी त्यापैकी २३२ इंजेक्शन वापरण्यात आली होती. जिल्ह्य़ातील ४५ रुग्णालयांना दिलेली ४१८ इंजेक्शन परत मागविल्याने सध्या जिल्ह्य़ात खासगी रुग्णालयात दाखल १४०० पेक्षा अधिक रुग्णांपैकी गंभीर रुग्णांना इंजेकशनअभावी अडचण निर्माण झाली आहे.

अशा परिस्थितीत जिल्ह्य़ाला शुक्रवारच्या दिवशी १८८, शनिवारी १२५ व  रविवारी ४५० असे तीन दिवसात ७६३ रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरवठा झाला  असला तरी त्याचा तुटवडा कायम आहे.  रुग्णांच्या नातेवाईकांची इंजेक्शन मिळवण्यासाठी धावपळ होत असून इतर उत्पादकांकडून हे इंजेकशन मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगिलते आहे. जिल्ह्य़ाकडून हेटेरो कंपनीकडे पुन्हा नव्याने ७७० इंजेक्शनची मागणी करण्यात येणार असून या मागणीच्या अनुषंगाने इंजेकशन पुरवठा मंगळवारी मिळण्याचे अपेक्षित आहे.

‘आशा’ ना आवाहन

पालघर जिल्ह्य़ात  करोनामुळे गंभीर होणाऱ्या रुग्णांची संख्या लक्षणीय असून जिल्ह्य़ातील ‘आशा’ सेविकांनी  आपल्या कार्यक्षेत्रात सर्वेक्षण करून तापाचे रुग्ण आढळल्यास किंवा करोनाची लक्षण आढळणाऱ्या नागरिकांची  प्रतिजन व आवश्यकता भासल्यास आरटीपीसीआर चाचणी करून घ्यावी. तसेच आजाराचा संसर्ग झाला असल्यास रुग्णांवर तातडीने औषधोपचार सुरू करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. मानिक गुरसळ यांनी केले आहे. जिल्ह्य़ातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रातून करोना चाचणी व मोफत औषधोपचाराची सुविधा उपलब्ध असल्याचे त्यांनी आवाहन केले आहे.