हर्षद कशाळकर लोकसत्ता

अलिबाग : गणेशमुर्ती तयार करणाऱ्या कार्यशाळांची वाढलेली संख्या आणि त्यामुळे उपलब्ध झालेल्या व्यवसाय संधी यामुळे पेणच्या गणेशमुर्ती व्यवसायात कुशल कारागिरांची कमतरता निर्माण झाली आहे.  दिलेल्या वेळेत गणेशमुर्ती तयार करण्यासाठी गणेश मुर्तीकारांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यात सततच्या टाळेबंदीने गणेशमुर्तीकारांच्या समस्येत भर घातली आहे.

पेण शहराला गणेशमूर्ती बनविण्याचा मोठा वारसा लाभलेला आहे. आकर्षक रंगसंगती  आणि देखणी मुर्ती हे पेणमधील गणेशमुर्तींचे वैशिष्टय़ आहे. त्यामुळे पेणच्या गणपतींच्या मुर्तीना केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देश- विदेशातूनही मागणी वाढत आहे. पेण शहराला गणेशमूर्ती व्यवसायाच्या बाजारपेठेचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

पूर्वी पेण शहरातच गणेशमुर्ती बनविण्याचे कारखाने होते. आसपासच्या परिसरातील  कामगार या कारखान्यांमध्ये काम करण्यासाठी येत असत.  मागील काही वर्षांपासून पेण शहाराच्या  जवळ असलेल्या हमरापूर, दादर, शिर्की, कणे, आदीगावांमध्ये गणपतींचे कारखाने सुरू झाले आहेत. या गावांमधूनही मोठय़ा प्रमाणांवर गणेशमुर्ती बनविल्या जातात . पेण शहरात असलेल्या कारखान्यांमधून काम करणारे कामगार गणेशमुर्ती बनविण्याची कला शिकले व त्यांनी स्वत:चे कारखाने सुरू केले.  तसेच आसपासच्या गावांमधून येणारे कामगार जवळच्याच  किंवा स्वत:च्याच गावात काम मिळत असल्यामुळे ते पेणमध्ये काम करण्यासाठी येत नाहीत. परिणामी  पेण शहरातील गणपती कारखान्यांमध्ये काम करण्यासाठी येणाऱ्या कुशल कामगारांची संख्या कमी झाली आहे. पुरेसे कुशल कामगार नसल्यामुळे पेणमधील गणपती कारखान्यांच्या मालकांना मोठी कसरत करावी लागत आहे.पेण शहरातील सर्वच गणपती कारखान्यांना ही समस्या भेडसावत आहे.

मुर्ती घडवणाऱ्या कारागिरांची संख्या दिवसेंदिवस घटत चालली आहे. त्याच बरोबर गणेशमुर्तींच्या चेहऱ्याची आखणी करणारे कुशल कारागिर मिळेनासे झाले आहेत. त्यामुळे मुर्तीकारांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. कामगारांअभावी रंगकाम न केलेल्या गणेश मुर्तीच विक्रीसाठी पाठवण्याचे कलही वाढतो आहे. अशातच करोनाचा प्रादुर्भाव आणि त्यामुळे देशात लागू झालेली टाळेबंदी यामुळे गणेश मुर्तीकारांची परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे. पेण येथून तयार मूर्ती घेऊन त्या महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश, गोवा या राज्यांमध्ये विक्रीसाठी नेल्या जातात. या मूर्ती वेळेत तयार कराव्या लागतात. कुशल कारागीर मिळत नसल्यामुळे गणेश मूर्ती वेळेत तयार करण्यासाठी  कारखान्यांच्या मालकांना धावपळ करावी लागत आहे.

परप्रांतीय कारागीर गणेशमुर्ती व्यवसायात

स्थानिक कारागिर मिळेनासे झाल्याने गणेश मुर्ती कार्यशाळांमध्ये उत्तर प्रदेश आणि बिहार मधील कारागिर दाखल होण्यास सुरवात झाली आहे. उत्तर भारतातून आलेले अनेक तरूण कारागीर आता या व्यवासायात स्थिरावले आहेत. साच्यातून मुर्ती बनवण्यापासून तर रंगकाम करण्यापर्यंतची कला त्यांनी अवगत केली आहे. त्यांच्या कामात सातत्य आणि चिकाटी आहे. शिवाय साप्ताहिक सुट्टय़ांचा आग्रह न धरता ते काम करण्यास तयार आहेत. त्यामुळे दिवसेंदिवस या व्यवसायात परप्रांतीय कारागिरांची संख्या वाढते आहे. पण मार्च महिन्यात यातील बरेच कामगार आपापल्या राज्यात निघून गेल्याने गणपती कारखानदारांची कोंडी झाली आहे.

‘ पेणच्या गणेशमूर्तींचा व्यवसाय दिवसेंदिवस वाढतो आहे . परंतु कारागीर मिळत नाहीत . कारखान्यांची वाढती संख्या हे या मागचे प्रमुख कारण आहे . त्यामुळे अनेकदा घरातील माणसे या व्यवसायात उतरवावी लागताहेत किंवा परराज्यातून कारागीर बोलवावे लागत आहेत .

-श्रीकांत देवधर  , अध्यक्ष पेण गणेश मूर्तीकार संघटना