पीएमसी बँकेत लाखो रूपये अडकल्यानं तणावामुळे दोन खातेदारांचा ह्रदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी घडली होती. आता पीएमसी बँकेत १ कोटींची रक्कम असलेल्या डॉक्टर योगिता बिजलानी यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. अधेरीतील वर्सोवा परिसरात राहणाऱ्या डॉ. बिजलानी यांनी झोपेच्या गोळ्यांचं अतिसेवन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती मिळाली आहे.

गेल्या काही दिवसांपासून योगिता बिजलानी या मानसिक तणावाखाली होत्या, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली. बँक घोटाळ्याचा त्यांच्या आत्महत्येशी थेट संबंध आहे किंवा नाही हे अद्याप स्पष्ट झालं नसल्याचंही पोलिसांकडून सांगण्यात आलं. डॉ. बिजलानी यांच्या पीएमसी बँकेतील खात्यामध्ये तब्बल १ कोटींपेक्षा अधिक रक्कम असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, वर्सोवा पोलिसांनी सध्या अपघाती मृत्यूची नोंद केली आहे.

डॉ. बिजलानी या आपल्या पतीसोबत अमेरिकेत राहत होत्या. आपल्या १८ महिन्यांच्या बाळासह त्या आपल्या आई-वडिलांच्या घरी आल्या होत्या. यापूर्वीही त्यांनी अमेरिकेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली. मंगळवारी बिजलानी यांनी झोपेच्या गोळ्यांचं अतिसेवन केलं होतं. या घटनेची माहिती मिळताच त्यांच्या वडिलांनी त्वरित त्यांना रूग्णालयात दाखल केलं. परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.

आणखी वाचा- PMC Bank : निवडणुकीनंतर बँकेचा मुद्दा केंद्राकडे मांडणार : मुख्यमंत्री

आर्थिक घोटाळ्यांच्या गर्तेत सापडलेल्या पंजाब-महाराष्ट्र सहकारी बँकेमध्ये आयुष्याची मिळकत विनाकारण अडकल्याने हजारो खातेदार हवालदिल झाल्याचं दिसत आहे. गेल्या २० दिवसांपासूनच्या तणावाशी सामना करणाऱ्या दोन खातेदारांचा चोवीस तासांमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. संजय गुलाटी (५१) आणि फत्तेमुल पंजाबी (५९) अशी या खातेदारांची नावे आहेत. नोकरी गमावलेल्या गुलाटी यांचे आर्थिक गाडे बँकेत ठेवलेल्या रकमेच्या व्याजावर सुरू होते. तर व्यावसायिक असलेले फत्तेमुल पंजाबी मोठी रक्कम बँकेत अडकल्यामुळे प्रचंड चिंतेत होते. ओशिवरा येथे राहणाऱ्या गुलाटी यांच्या खात्यात जवळपास ९० लाख तर मुलुंडमधील फत्तेमुल पंजाबी यांच्या खात्यात १० लाखांहून अधिक रक्कम जमा होती. पीएमसी बँकेवर आलेल्या र्निबधांनंतर पैसे परत मिळण्याची शाश्वती वाटत नसल्याने ते दोघेही मानसिक तणावात असल्याची माहिती त्यांच्या परिचितांनी दिली.