दौंड येथे माहेरी राहणाऱ्या एका महिलेने बुधवारी पहाटे पोटच्या तीन मुलींना भीमा नदीवरील रेल्वे पुलावरून खाली फेकून दिले, त्यानंतर स्वत: नदीत उडी घेऊन आत्महत्या केली. या महिलेची सर्वात मोठी मुलगी या ठिकाणाहून पळून गेल्यामुळे वाचली. आत्महत्येचे कारण मात्र समजू शकलेले नाही.
आफरीन शेख (२६), तिची मुलगी अरशिदा (६), गुड्डू ऊर्फ आसमा (४) आणि रुक्साना (दीड वर्षे) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. दौंड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आफरीन व मेहमुद्दीन यांचा २००५ मध्ये विवाह झाला होता. त्यांना चार मुली आहेत. मेहमुद्दीन हा ट्रकचालक असून तो मूळचा राजस्थानमधील आहे. चार महिन्यांपूर्वी आफरीन ही आई-वडिलांकडे आली होती. बुधवारी पहाटे चारच्या सुमारास तिने आपल्या चारही मुलींना झोपेतून उठविले व भीमा नदीवर असलेल्या रेल्वे पुलाकडे नेले. तेथे तिन्ही मुलींना तिने नदीत टाकून दिले. तर आईचे हे कृत्य बघून मोठी मुलगी तस्कीन (७) तेथून पळून गेली. तिने घरी जाऊन कुटुंबीयांना हा प्रकार सांगेपर्यंत आफरीननेही आत्महत्या केली होती. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.