युवा शेतकऱ्याच्या जिद्दीला यश

डंवरलेली हिरवीगार शेती, जोमदार पिके हे चित्र कल्पनेतील नाही तर सातारा जिल्ह्यातील दुष्काळी तालुका असा शिक्का बसलेल्या खटाव तालुक्यामधील आहे. वडूजपासून तीन किलोमीटर अंतरावरच्या उंबर्डे येथील अनिल पवार या युवा शेतकऱ्याने शेततळ्यांच्या माध्यमातून शेती फुलवली आहे. भीषण दुष्काळात बटाटा, कांदा, हळद व आले अशी नगदी पिके त्यांनी घेतली आहेत. पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी ठिबक सिंचनाला प्राधान्य दिले आहे.
गेले दीड वर्ष या भागात विशेष पाऊस झालेला नाही तरी दोन शेततळ्यांच्या (संरक्षित पाणीसाठा) आधारे त्यांनी परिस्थितीचा सामना केला. शेततळ्यांच्या माध्यमातून दुष्काळावर मात करता येते हे त्यांनी दाखवून दिले आहे. अजूनही पिकांना तीन महिने पुरेल इतका पाणीसाठा त्यांच्याकडे आहे. आता परतीच्या पावसावर त्यांची मदार आहे. शासनाकडून अनुदान व त्यात स्वत:कडील लाख-दीड लाख रुपये घालून त्यांनी शेततळी केली. थोडी जोखीम व कष्टाच्या जोरावर त्यांनी ही वाटचाल केली. स्टेट बँकेच्या अधिकाऱ्यांनीही परिस्थिती ओळखून तातडीने कर्जपुरवठा केल्याचे पवार यांनी सांगितले.
दुष्काळी स्थितीतही शेततळ्यांच्या मदतीने चांगल्या उत्पन्नाची त्यांना खात्री आहे. शेतीसाठी ठिबक सिंचन पद्धतीने पाणी दिल्याने एका शेततळ्यातील साठय़ाच्या आधारे तीन महिने काढता येऊ शकतात. या संदर्भातील माहितीसाठी ९४०३ ९६८ ४५३ या क्रमांकावर संपर्क साधता येईल, असे त्यांनी सांगितले.
समूह शेतीचा फायदा
कुटुंबातील सदस्य जरी वेगळे राहत असले तरी त्यांनी त्यांची ३२ एकर शेती समूह पद्धतीने केली आहे. सर्व सदस्यांना एकत्र करून ही शेती केली जाते. त्यातून मिळणारा नफा विभागून दिला जातो.

पाणी नसते तेव्हा शेततळे हा उत्तम पर्याय आहे. दुष्काळी परिस्थितीत तर तो महत्त्वाचा आहे. तसेच शेतकऱ्यांचा समूह केल्यास तो अधिक फलदायी ठरेल.
– दुर्योधन कदम, कृषी सहायक

संरक्षित पाणीसाठय़ामुळे पिके जगवण्याची चिंता नव्हती, तर चांगले उत्पादन कसे मिळेल याचा ध्यास घेतला. दुष्काळी परिस्थितीत परिसरातील शेतकऱ्यांपुढे चिंता निर्माण झालेली असताना मला शेततळ्यांमुळे परिस्थितीवर मात करता आली.
-अनिल पवार, शेतकरी, उंबर्डे (वडूज)

शेततळे म्हणजे काय?

’सर्वसाधारणपणे शेताजवळचे विहीर, कालवा असे पाण्याचे स्रोत पाहून तसेच विजेची उपलब्धता लक्षात घेऊन शेततळे घेतले जाते.
’पाण्याचे इतर स्रोत आटले की शेती फुलविण्यासाठी शेततळे हा उत्तम पर्याय आहे.
’४१ गुणिले ४१ मीटर लांब, रुंद व तीन मीटर त्याची खोली असते. त्यामध्ये प्लास्टिकचा वापर केला जातो.
’एका शेततळ्याची दोन कोटी लिटर पाणी साठवण क्षमता असते.
’शेततळ्यासाठी सहा लाख रुपये खर्च अपेक्षित आहे.
’राष्ट्रीय फलोत्पादन योजनेंतर्गत त्याला ४ लाख ६८ हजार अनुदान मिळते.