03 June 2020

News Flash

मराठवाडय़ात लाखो साधकांची योगसाधना

वर्षांतील सर्वात मोठा दिवस, मृग नक्षत्रातील पावसाने आल्हाददायी बनलेले वातावरण, रविवारची सुट्टी आणि एकाच वेळी सर्वानी एकत्र जमून करावयाची साधना असा सुवर्णमध्य साधून मराठवाडय़ात सर्वत्र

| June 22, 2015 01:40 am

वर्षांतील सर्वात मोठा दिवस, मृग नक्षत्रातील पावसाने आल्हाददायी बनलेले वातावरण, रविवारची सुट्टी आणि एकाच वेळी सर्वानी एकत्र जमून करावयाची साधना असा सुवर्णमध्य साधून मराठवाडय़ात सर्वत्र जागतिक योगदिन मोठय़ा उत्साहात साजरा करण्यात आला. यात लहानांपासून थोरांपर्यंत सगळेच उत्स्फूर्तपणे सामील झाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेवरून संयुक्त राष्ट्रसंघाने २१ जून हा दिवस जागतिक योगदिन म्हणून साजरा करण्याचा ठराव संमत केला. या पाश्र्वभूमीवर हा दिन मोठय़ा प्रमाणात साजरा करण्याची तयारी करण्यात आली होती. यानिमित्त योग प्रात्यक्षिके, योगवर्ग, योगासंबंधी व्याख्याने अशा अनेकविध उपक्रमांचे आयोजन केले होते. विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, तसेच क्रीडा व युवक सेवा उपसंचालक कार्यालयांच्या वतीने विभागीय क्रीडा संकुलात योगदिनाचे आयोजन करण्यात आले. उपजिल्हाधिकारी संभाजी अडकुणे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध अधिकारी-कर्मचाऱ्यांनी सुमारे तासभर विविध योगप्रकारांचे प्रशिक्षण घेतले. आरोग्यदायी जीवनशैली अंगीकारण्यासाठी प्रत्येकाने दैनंदिन जीवनात योगाचा अंगीकार करावा, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट यांनी या प्रसंगी केले. जिल्हाधिकारी वीरेंद्र सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष चौधरी, उपायुक्त जितेंद्र पापळकर, डॉ. विजयकुमार फड, पारस बोरा यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. योगासनांची सचित्र माहिती देणाऱ्या फलकांचे अनावरणही या वेळी करण्यात आले.
शहरातील महात्मा गांधी मिशन व योग महासमितीतर्फे आयोजित योगदिनाच्या कार्यक्रमास विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी दीपप्रज्वलन करून प्रारंभ केला. आपला देश कृषिप्रधान, तसाच ऋषिमुनींचाही असल्याने योगदिनाचा योग घडून आला आहे, असे बागडे यांनी या वेळी सांगितले. योग महासमितीचे महासचिव गोपाळराव कुळकर्णी, उद्योगपती विजय खाचणे, अंकुशराव कदम, प्राचार्य डॉ. सुधीर देशमुख आदींची उपस्थिती होती. एमजीएम क्रिकेट मदानावर झालेल्या योगदिनाचे प्रास्ताविक सुभाष वेदपाठक यांनी, तर अश्विनी दाशरथे यांनी सूत्रसंचालन यांनी केले. योग प्रशिक्षकांनी जवळपास दोन हजार स्त्री-पुरुष, मुलांना योगाचे धडे दिले.
उस्मानाबादेत मोठा सहभाग
उस्मानाबाद- पतंजली योग समितीसह विविध शिक्षण, सामाजिक संस्थांच्या वतीने जिल्हाभरात योगशिबिर घेण्यात आले. ठिकठिकाणी झालेल्या शिबिरांतून उपस्थितांना योग प्रशिक्षण, योगासनाचे महत्त्व सांगण्यात आले. पोलीस मुख्यालय मदानावर आर्ट ऑफ लििव्हग, जिल्हाधिकारी कार्यालय, जि. प. शिक्षण विभाग, पोलीस अधीक्षक, ब्रह्मकुमारी, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, रोटरी क्लब, नेहरू युवा केंद्र, अवेअर सिटीझन फाऊंडेशन व पतंजली योग समितीच्या वतीने योग शिबिर घेण्यात आले. आमदार राणाजगजितसिंह पाटील, जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे, पोलीस अधीक्षक अभिषेक त्रिमुखे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. उपजिल्हाधिकारी शिल्पा करमरकर, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी सुमन रावत, शिक्षणाधिकारी शिवाजी जाधव, पतंजली योग समितीचे राज्य प्रभारी नितीन तावडे, भाजप जिल्हाध्यक्ष नितीन काळे आदींची उपस्थिती होती. भारतीय संस्कृतीला जगाने मान्यता दिली, ही अभिमानाची गोष्ट आहे. योग व प्राणायाम देशापुरता मर्यादित न ठेवता जगापर्यंत गेला. प्रत्येकाने आपले जीवन आनंदी व आरोग्यदायी ठेवण्यासाठी सातत्याने योग करावा, असे आवाहन आमदार पाटील यांनी केले.
परभणीत उत्साहात साजरा
परभणी- शहर व जिल्ह्यात योगासनांची प्रात्यक्षिके, जनजागृती रॅली, परिसंवाद व चर्चासत्र असे विविध कार्यक्रम उत्साहात पार पडले.
सकाळी प्रियदर्शनी इंदिरा गांधी स्टेडियम, जिल्हा क्रीडा संकुल येथे मुख्य कार्यक्रमास नागरिक, विद्यार्थी तसेच विविध विभागांचे अधिकारी-कर्मचारी यांनी उपस्थिती दर्शवून योगासने केली. आमदार डॉ. राहुल पाटील, जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल, मनपा आयुक्त अभय महाजन, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी सुभाष डुंबरे, अतिरिक्त जिल्हाधिकारी संभाजी झावरे आदींनी सहभाग नोंदविला. जिल्ह्यातील विविध योग संघटना, शिक्षण विभागाच्या माध्यमातून शाळा-महाविद्यालये, शासकीय कार्यालयांमध्येही कार्यक्रम झाले. प्रियदर्शनी इंदिरा गांधी स्टेडियम येथून रॅलीही काढण्यात आली.
बीडला एक लाखाचे बक्षीस
बीड- शिव सांस्कृतिक भवनात राजधानी दिल्लीतील योगाचे थेट प्रक्षेपण, पंतप्रधान मोदी व रामदेव बाबा यांच्या योगक्रियेबरोबर उपस्थित हजारो नागरिकांनी योगासने केली. दरम्यान, योगदिनानिमित्त उत्कृष्ट काम केल्याबद्दल केंद्र सरकारने बीड जिल्ह्यास १ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले.
जिल्ह्यातील शाळांमध्ये पतंजली योग समितीच्या केंद्रांवर पहाटे पाचपासूनच शिक्षकांसह नागरिकांनी योगासनांना हजेरी लावली. सुमारे सात लाखांपेक्षा अधिक नागरिकांनी एकाच दिवशी एकाच वेळी योगसाधना केल्याने रविवारची सकाळ योगमय झाल्याचा दावा पतंजली समितीचे अॅड. श्रीराम लाखे यांनी केला. अॅड. लाखे यांच्या नेतृत्वाखाली मागील १५ दिवसांपासून जिल्ह्यात ६ हजार शिक्षकांना योग प्राणायामाचे प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षण झालेल्या शिक्षकांनी रविवारी तालुका ते गावपातळीवर शाळा-महाविद्यालयांसह महत्त्वाच्या ठिकाणी सकाळी सात ते साडेसात या वेळेत योगसाधना केली. जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव ननावरे, डॉ. भारतभूषण क्षीरसागर, भाजप जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे, अॅड. सर्जेराव तांदळे आदी उपस्थित होते. पतंजली योग समितीने तयार केलेली चित्रफीत दाखविण्यात आली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 22, 2015 1:40 am

Web Title: lakhs of ascetic yoga penance in marathwada
Next Stories
1 दारूच्या व्यसनापायी पतीकडून पत्नी व दोन चिमुकल्यांचा खून
2 सर्वपक्षीय युतीविरोधात मेटेंचे गोपीनाथ मुंडेंच्या नावाने पॅनेल
3 दांडीबहाद्दर शिक्षकांवर कारवाईचे आदेश
Just Now!
X