सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर यात्रेच्या दुसऱ्या दिवशी, बुधवारी दुपारी सिद्धेश्वर मंदिर तलावाच्या काठी संमती कट्टय़ावर लाखो भाविकांच्या साक्षीने पारंपरिक पद्धतीने ‘अक्षता सोहळा’ संपन्न झाला. सुमारे साडेआठशे वर्षांची परंपरा लाभलेल्या या यात्रेत अक्षता सोहळा पार पडताच ‘हर बोला हर, सिद्धेश्वर महाराज की जय’च्या घोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.
दुपारी दोनच्या सुमारास नंदीध्वजांचे वाजत-गाजत संमती कट्टय़ावर आगमन होताच अक्षता सोहळा सुरू झाला. पांढरा शुभ्र बारा बंदी पोशाख परिधान केलेल्या हजारो भाविकांच्या गर्दीने या ठिकाणी जणू ‘दूधगंगा’च अवतरल्याचे चित्र पाहावयास मिळाले. गृह राज्यमंत्री राम शिंदे व सोलापूरचे पालकमंत्री विजय देशमुख यांच्यासह खासदार अ‍ॅड. शरद बनसोडे, आमदार प्रणिती शिंदे, आमदार सिद्धाराम म्हेत्रे, आमदार सुभाष देशमुख, तुळजापूरचे आमदार मधुकरराव चव्हाण, माजी आमदार सिद्रामप्पा आलुरे गुरुजी, विश्वनाथ चाकोते, महापौर प्रा. सुशीला आबुटे, उपमहापौर प्रवीण डोंगरे, पालिका सभागृह नेते संजय हेमगड्डी, पालिका स्थायी समितीचे सभापती सय्यद बाबा मिस्त्री, पालिका परिवहन समितीचे सभापती आनंद मुस्तारे, पालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार, पोलीस आयुक्त प्रदीप रासकर आदींची यावेळी प्रामुख्याने उपस्थिती होती. सिद्धेश्वर देवस्थान समितीचे अध्यक्ष धर्मराज काडादी, यात्रा समितीचे अध्यक्ष रुद्रेश माळगे, देवस्थान समितीचे विश्वस्त मल्लिकार्जुन वाकळे, अ‍ॅड. मिलिंद थोबडे, गुंडप्पा कारभारी, नंदकुमार मुस्तारे आदींनी अक्षता सोहळ्याचे नेटके नियोजन केल्यामुळे यंदा अक्षता सोहळा उशीर न होता, पूर्वनियोजित वेळेपेक्षा लवकर सुरू झाला.
बाराव्या शतकात होऊन गेलेले ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराजांनी सामाजिक सुधारणा करताना परिश्रमाला प्रतिष्ठा प्राप्त करून दिली होती. त्याकाळी त्यांनी सामूहिक विवाह सोहळेही पार पाडले होते. सामूहिक श्रमातून त्यांनी तलावाची निर्मिती केली होती. या तलावात त्यांनी गंगा, यमुना, सरस्वती, गोदावरी, सिंधू, भीमा आदी २० नद्यांतून पाणी आणून तलावात आणले होते. ते स्वत: योगी होते. त्यांनी शहराच्या पंचक्रोशीत ६८ लिंगांसह अष्टविनायक व अष्टभैरवांची प्रतिष्ठापना केली होती.
सिद्धेश्वर यात्रेचा इतिहास कथन करताना एक आख्यायिका सांगितली जाते, ती अशी- योगी सिद्धेश्वर महाराज दररोज ध्यानधारणा करीत असत, तेव्हा त्यांच्या साधनागृहाबाहेर सडा-समार्जन करून रांगोळी रेखाटली जात असे. ही सेवा कोण करते, याचा शोध लागत नसे. एके दिवशी सिद्धेश्वर महाराज साधनागृहातून लवकरच बाहेर आले असता बाहेर एक सुंदर कुमारिका सडा-समार्जन करून रांगोळी घालत असल्याचे दिसून आले. सिद्धेश्वर महाराजांनी तिची विचारपूस केली तेव्हा तिने आपण कुंभारकन्या असल्याचे सांगून त्यांच्याबरोबर विवाह करण्याची इच्छा प्रकट केली. महाराजांनी विवाहास नकार दिला. परंतु कुंभारकन्येचा हट्ट पाहता अखेर सिद्धेश्वर महाराजांनी आपल्या योगदंडाबरोबर विवाह करण्यास अनुमती दिली. त्याप्रमाणे विवाह सोहळा झाला. त्यावेळी स्वत: सिद्धेश्वर महाराजांनी रचलेल्या मंगल अष्टका म्हटल्या. या विवाह सोहळ्यासाठी शहराच्या पंचक्रोशीतील सर्व देवदेवतांना आमंत्रित करण्यात आले. विवाह सोहळ्यानंतर वरात निघून सर्व देवदेवतांच्या भेटी घेण्यात आल्या. नंतर कुंभारकन्या होमकुंडात आहुती देत सती गेली. या विवाह सोहळ्यातील सर्व तपशिलांसह सिद्धेश्वर यात्रेतील विधी पार पाडले जातात.
सकाळी उत्तर कसब्यातील हिरेहब्बू मठातून नंदीध्वजांची मिरवणूक निघाली. दुपारी नंदीध्वज सिद्धेश्वर मंदिराजवळ संमती कट्टय़ावर आले. त्यानंतर अक्षता सोहळ्यास प्रारंभ झाला. सिद्धेश्वर महाराजांनी कन्नड भाषेतून रचलेल्या मंगलाष्टका शेटे घराण्यातील मानकरी सुहास ऊर्फ तम्मा शेटे यांनी म्हटल्या. अक्षतेच्या प्रत्येक टप्प्यावर भाविकांनी अक्षता टाकत सिद्धेश्वर महाराजांचा जयजयकार केला. तत्पूर्वी, सिद्धेश्वर महाराजांनी रचलेल्या मंगलाष्टकांच्या हस्तलिखितेचे पूजन करण्यात आले. या अक्षता सोहळ्याचे विलोभनीय दृश्य टिपण्यासाठी हजारो भाविकांचे मोबाइल पुढे सरसावले. अक्षता सोहळ्याचे थेट प्रसारण सोलापूर आकाशवाणी केंद्राने केले होते. तसेच स्थानिक वृत्तवाहिन्यांनीही या अक्षता सोहळ्याचे थेट प्रक्षेपण केले होते. अक्षता सोहळा संपन्न झाल्यानंतर माजी आमदार विश्वनाथ चाकोते यांनी तमाम भाविकांसाठी सिद्धेश्वर प्रशालेत महाप्रसादाची सोय केली होती.
 

ram navami, shobha yatra, akola, vishwa hindu parishad, ram navami in akola, ram navami shobha yatra, ram navami vishwa hindu parishad, marathi news, ram navami news, akola news,
अकोला : रामनवमीनिमित्त राजराजेश्वरनगरी भगवामय; शोभायात्रेची ३८ वर्षांची परंपरा
Ram Navami 2024 Sury Tilak Festival
Ram Navami: अयोध्येत प्रभू रामाच्या मूर्तीचा सूर्यतिलक! डोळ्यांचं पारणं फेडणारा सोहळा पाहण्यासाठी भाविकांची गर्दी
mahalaxmi idol conservation marathi news
महालक्ष्मीच्या मूर्तीवर संवर्धन प्रक्रिया सुरू; भाविकांना उत्सव मूर्तीचे दर्शन
Saint Balumamas Rathotsav ceremony ended today with excitement
कोल्हापूर : भंडाऱ्याच्या मुक्त उधळणीत संत बाळुमामांचा रथोत्सव उत्साहात