नाणार प्रकल्पासंदर्भातील भूसंपादनाची अधिसूचना रद्द करत असल्याची घोषणा राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केली आहे. यामुळे नाणार प्रकल्पाच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

कोकण हा सेनेचा बालेकिल्ला असून राजापूर तालुक्यातून सेनेचा प्रतिनिधी विधानसभेवर सातत्याने निवडून येत आहे. हा गड शाबूत ठेवणे ही सेनेची गरज होती. मात्र, नाणार संदर्भात शिवसेनेची पंचाईत झाली होती. जागा निवडीपासून भूसंपादन करून संबंधित कंपनीला ती सुपूर्त करण्यापर्यंतची सर्व जबाबदारी उद्योग खात्यावर होती. त्यामुळे उद्योगमंत्री सुभाष देसाई काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी नाणार प्रकल्पातील भूसंपादनाची प्रक्रिया रद्द केल्याची घोषणा केली आहे.

नाणार प्रकल्पाविरोधात सोमवारी शिवसेनेने मेळावा घेतला. या मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, उद्योगमंत्री सुभाष देसाई, एकनाथ शिंदे, गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांच्यासह शिवसेनेचे १५ आमदार उपस्थित होते. या मेळाव्यात सुभाष देसाई म्हणाले, शिवसेना आणि आमच्या खात्याबाबत काही शंका उपस्थित होत होत्या. या शंकांचे मी निरसन करतो.  नाणार प्रकल्पासाठी भूसंपादनाची प्रक्रिया रद्द करण्याचे आदेश मी उद्योग खात्यातील अधिकाऱ्यांना देतो, असे त्यांनी सांगितले.